One school changed the whole village .. How? | एका शाळेनं अख्खं गाव बदललं.. ते कसं?

एका शाळेनं अख्खं गाव बदललं.. ते कसं?

-ऋचिका सुदामे-पालोदकर


औरंगाबाद शहरातील देवळाई गावापासून कचनेरकडे जाणा-या मार्गावर अगदी 17 - 18 कि.मी. अंतरावर डाव्या हाताला ‘गाडीवाट’ची वाट फुटते. त्या वाटेनं गावात प्रवेश केला की, अगदी 100 ते  150 पावलांवर उजव्या हाताला ‘जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, गाडीवाट’ हा फलक आपलं लक्ष वेधून घेतो. पहिली ते आठवीपर्यंत असणा-या या शाळेचे प्रवेशद्वार ओलांडून एकदा आत प्रवेश केला की मग सुरुवात होते एका वेगळ्याच विश्वाची. आदर्श शाळेची. 

ही शाळा केवळ गावातील विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित नाही, तर गावातील प्रत्येकजण या शाळेशी जोडलेला आहे.  या शाळेने गावातील भांडणतंटे दूर तर केलेच, पण संपूर्ण गावाला एका मोठय़ा कुटुंबात बांधले आहे. या शाळेमुळे अख्खे गाडीवाट आज एकत्रितपणे  नांदते आहे. एरव्ही शाळेकडे ढुंकूनही न पाहणा-या अनेक पालकांना आज शाळेत एक चक्कर मारल्याशिवाय करमत नाही. हे असं का, यामागे एक गोष्ट आहे. गाडीवाटची शाळा घडण्याची गोष्ट.
ही गोष्ट या शाळेतील प्रयोगशील शिक्षक दादासाहेब नवपुते सांगतात, शाळेतल्या या बदलाला नुकतेच काही महिने झालेत. जून 2019 मध्ये शालेय वर्षाला सुरुवात झाली तेव्हा मुख्याध्यापक  यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक मिळून एक स्वप्न पाहत होते. आपल्या शाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावरची शिक्षण पद्धती सुरू करायची. ही गोष्ट म्हणायला सोपी पण प्रत्यक्षात यायला मात्र अवघड होती. यासाठी जेवढा बदल शिक्षण पद्धतीत करणं गरजेचं होतं तेवढाच बदल शाळेतील पायाभूत सुविधांमध्ये होणंही गरजेचं होतं. त्यामुळे यासाठी खूप मोठय़ा पाठबळाची गरज होती. केवळ शिक्षकांच्याच प्रयत्नांवर भागणार नव्हतं. त्यामुळे याकामी गावक-याची मदत घेण्याचं ठरलं.

त्यानुसार शाळा सुरू झाल्यावर लगेचच शिक्षणविस्तार अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आणि पालकांची मिळून एक  बैठक घेतली.  ‘तुमच्यासाठी काय महत्त्वाचं,’ असा प्रश्न करताच बहुतांश पालकांनी ‘बस आमले मूल चांगले शिकले पाहिजे’ असं उत्तर दिलं. याचाच धागा पकडून शिक्षकांनी पालकांना शाळेसाठी मदत करण्याचं आवाहन केलं.  अनेकांनी ही गोष्ट नुसतीच ऐकून घेतली, तर काहींनी दुर्लक्ष केलं. 
आपल्या मुलांसाठी चांगली शाळा असणं किती महत्त्वाचं आहे, हे पटवून देण्यासाठी शिरूर (पुणे) येथील वाभळेवाडीच्या शाळेत या पालकांची एक अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. पालक आणि शिक्षकांच्या मदतीनं अवघ्या काही दिवसांत वाभळेवाडी शाळेचा झालेला कायापालट पालकांनी पाहिला आणि आपल्यालाही अशीच शाळा निर्माण करायची, असा निर्धार केला. सुरुवातीला फक्त दोन ते तीन पालकांनीच शाळेत यायला सुरुवात केली. रिकाम्या वेळेत हे पालक शाळेत येत होते आणि शाळेतील कामास हातभार लावत होते. सगळ्यात पहिलं काम म्हणजे शाळेला चांगलं मैदान नव्हतं. खोल खड्डे, चिखल असं हे पटांगण आधी व्यवस्थित करायचं ठरलं. दोघा-तिघांचं काम पाहून  गावातील इतर लोकंही बिचकत बिचकत शाळेत यायला लागली. काहीतरी चांगलं काम होत आहे, असं पाहून आपोआपच मग येणा-या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत गेली.

सकाळच्या वेळी शाळेत यायचं, असतील ती कामं करायची आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जायचं. काम झाल्यावर सायंकाळी एकदा परत शाळेत चक्कर मारायची आणि उद्या काय काम करायचं याचं नियोजन करायचं, असं चक्र सुरू झालं. पाहता-पाहता ही शाळा सगळ्या गावाचीच होऊन गेली. अवघ्या दोन ते अडीच महिन्यांत शाळेत आमूलाग्र बदल झाला. पटांगण तयार करणं, संरक्षक भिंत बांधणं, शाळेत बगिचा फुलवणं, वर्गखोल्यांची डागडुजी आणि रंगकाम करणं, तुटक्या फरशा नीट करणं, अद्ययावत किचन शेड उभारणं यासारखी शाळेची अनेक कामं लोकसहभागातून पूर्ण झाली. लोकसहभाग देणा-या इथल्या प्रत्येकाचंच हातावर पोट; पण यासाठी कोणीही कसलंही मानधन घेतलं नाही. वर्गखोल्यांपासून ते स्वच्छतागृहांच्या साफसफाईपर्यंतची अनेक कामं पालकांनी आपापसात  वाटून घेतली आहेत.
घरातली, शेतातली कामं आटोपली की महिला दुपारच्या वेळी शाळेत येतात आणि माध्यान्ह भोजनासाठी आलेलं  धान्य निवडून स्वच्छ करणं, खरकटी भांडी घासणं, किचनशेड स्वच्छ करून ठेवणं अशी कामं स्वत:हून करतात. या गावात आधी खूप गट-तट होते. कशावरूनही राजकारण व्हायचं. पण मागील दोन-तीन महिन्यांपासून या शाळेनं लोकांना आपापसातले भांडणं, तंटे, वादविवाद  विसरायला लावलेत आणि सर्वांना एकत्र आणलं. सगळ्या गावाची किरकिरच यानिमित्तानं थांबली. कधी एकमेकांशी न बोलणारे लोकही मतभेद विसरून शाळेसाठी एकत्र आले. 
आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या ध्येयानं इथला प्रत्येकजण गावातील शाळेला जोडला गेला आहे. या शाळेसाठी आपल्या कष्टाचे आणि प्रयत्नांचे योगदान देत आहे.  
आपल्या मुलांना भविष्यात एक चांगला माणूस बनवण्यासाठी आपल्या गावची शाळा ‘आदर्श’ करण्याचं स्वप्न गावातला प्रत्येकजण बघत आहे.

----------------------------------------------------------------------

सकाळी साडेनऊ ते रात्री साडेनऊ
शाळेची वेळ स. 9:30 ते 4:30 अशी असली तरी स. 8 ते रात्री 9- 9:30 पर्यंत विद्यार्थी, पालक आणि ज्यांना शक्य होईल ते शिक्षक शाळेच्या आवारातच असतात. सकाळी 8 ते 9:30 यावेळेत इयत्ता 5 वी ते 8 वीचे विद्यार्थी लहान वर्गातील मुलांचा गृहपाठ पूर्ण करून घेतात आणि त्यांना अभ्यासादरम्यान आलेल्या अडचणी सोडवण्यास मदत करतात. अशा विद्यार्थ्यांना ‘विषयमित्र’ म्हणून संबोधलं जातं. शाळेत असे एकूण 20 ‘विषयमित्र’ आहेत. 
4:30 वा. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी तासाभरासाठी घरी जातात, जेवतात आणि पुन्हा शाळेच्या आवारात येऊन खेळत बसतात. सायं. 6 ते रात्री 9 यावेळेत गावातील पदवीधर पालक, काही माजी विद्यार्थी मुलांना ‘स्पोकन इंग्लिश’, अवांतर वाचन, व्यक्तिमत्त्व विकास, नवीन तंत्रज्ञान, संगणक, उपयुक्त मोबाइल अँप्स अशा गोष्टींविषयी माहिती देतात. दर रविवारीसुद्धा ही शाळा भरते आणि मुलांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांचा अधिकचा सराव करून घेतला जातो. जी मुलं अभ्यासात कच्ची आहेत, त्यांच्यासाठी विशेष वर्ग आयोजित केले जातात.

----------------------------------------------------------------

भांडी घासण्यापासून ते चित्रपट पाहण्यापर्यंत 
गारखेडा येथील जि. प. शाळेत नियुक्ती असतानाही साधारण दोन ते अडीच वर्षांपूर्वी  दादासाहेब नवपुते या प्रयोगशील शिक्षकांनी मुलांसाठी आईसोबत भांडी घासण्यापासून ते शाळेच्या आवारात पालक आणि विद्यार्थ्यांना एकत्रितपणे चित्रपट दाखविण्यापर्यंंतचे अनेक उपक्रम राबवले होते. ‘चला आईसोबत भांडी घासूया..’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मुलांना कामाचं महत्त्व आणि कोणतंही काम कमी दर्जाचं नाही, ही समज देण्याचा प्रय} केला होता. मुलांसोबत पालकांनाही शाळेविषयी आत्मीयता वाटावी म्हणून नवपुते यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी शाळेच्या आवारात सामूहिकपणे चित्रपट पाहण्याचा उपक्रमही घेतला. यामध्ये महिन्यातून एक चित्रपट दाखविला जायचा. याचा परिणाम म्हणजे पालक शाळेसोबत जोडले गेले आणि त्यांनी स्वखचार्तून शाळेला व्यासपीठ बांधून दिलं. 

--------------------------------------------------------------------------

शाळेसाठी जमवला 6.5 लाखांचा निधी
गाडीवाट गावाची लोकसंख्या अवघी 3229. इथल्या 90 टक्के लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय. डोंगराळ भागातील गाव असल्यामुळे 12 महिने पाण्याचं दुर्भिक्ष. त्यामुळे बहुतांश लोक रोजंदारी करून दैनंदिन खर्च भागवतात. अशा परिस्थितीतही या पालकांनी शाळेच्या विकासकामासाठी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तब्बल 6.5 लाखांचा निधी शिक्षकांकडे सुपुर्द केला.  

(लेखिका लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत  वार्ताहर/उपसंपादक आहे.)
 

Web Title: One school changed the whole village .. How?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.