जयपूरमधल्या तुरूंगातल्या महिलांनी तयारकेली आपली एक नवीन ओळख!

जयपूरमधल्या तुरूंगातल्या महिलांनी तयारकेली आपली एक नवीन ओळख!

- प्रतिनिधी

कोरोनामुळे अनेकांच्या हातातलं काम गेलं. पण याच कोरोनामुळे काही हातांना स्वत:ची ओळख बदलण्याची, नवीन ओळख तयार करण्याची संधीही मिळाली. हे हात आहेत महिलांचे आणि या महिला आहेत जयपूर तुरुंगातील महिला कैदी.
समाज आपल्याकडे केवळ गुन्हेगार म्हणून बघत असल्याची खंत होती. समाजाचा दृष्टिकोन बदलावा असं त्यांना मनापासून वाटत होतं. पण ते कसं हा मार्ग मात्र मिळत नव्हता. हा मार्ग त्यांना कोरोनाविरुद्धच्या लढय़ानं त्यांना दिला. आजर्पयत या जयपूर तुरुंगातील महिला कैद्यांनी 70,000  मास्क  शिवले आहेत. काही मशिनद्वारे तर काही हातानं सुईच्या साहाय्यानं. या महिलांनी तयार केलेल्या मास्कची गुणवत्तासुद्धा उत्कृष्ट असल्याची खात्री या तुरुंगाच्या निरीक्षक मोनिका अगरवाल देतात. जयपूर तुरुंगातील महिला कैद्यांच्या कामाची बातमी संपूर्ण देशभरात पसरली आणि अनेक जेलमधील महिला कैद्यांना  नवीन काम करण्याची संधी मिळाली. 
सेंट्रल जेलमधील पॉवरलूमच कापड या महिला कैद्यांना दिलं गेलं आणि त्यापासून उत्तमप्रतीचे मास्क या महिलांनी शिवले. तुरुंग निरीक्षकांच्या मते एक मास्क साधारण 8 रुपयाला पडतं. महिलांनी शिवलेल्या मास्कची एकूण रक्कम तुरुंगातल्या बॅँक खात्यात जमा केली गेली. या महिलांनी तुरुंगातील आर्थिक उत्पन्नात मोलाची भर तर टाकलीच शिवाय तुरुंगातल्या कामालाप्रतिष्ठाही मिळवून दिली. जयपूर तुरुंगात तयार  झालेल्या या मास्कला विविध सरकारी संस्थांकडून मोठी मागणी येत आहे. तुरुंग निरीक्षक सांगतात की, कोरोनाच्या संकट काळात मास्क शिवण्याचं एक महत्त्वाचं काम करण्याची आणि कित्येक वर्षापासून गुन्हेगारीचा शिक्का पुसण्याची संधी मिळाल्यामुळे या महिला कैदी अत्यंत आनंदी आहे. किमान यामुळे तरी लोकांची आपल्याकडे बघण्याची मानसिकता बदलेल असं त्यांना वाटतं.
जयपूरच्याच जवळच्या उदयपूरमधील महिला तुरुंगातील महिला कैद्यांनी चार मास्क शिवले.  उदयपूरमधील महिला बंदी सुधारगृहात 42 महिला आहेत. सध्या दिवसभर येथील महिला मास्क शिवण्याच्या कामात गुंतलेल्या असतात. ठरवून दिलेला कोटा पूर्ण करण्यासाठी अगदी मध्यरात्रीर्पयतही त्या काम करतात. यातल्या कितीतरी महिला वयस्कर आहेत. त्यांना नीट दिसत नाही; पण या संकट काळात मदत करण्याची जिद्द पक्की असल्यामुळे इतर महिलांना त्या जमेल ती मदत करत राहातात. 
संकटकाळही संधी देतो ती अशी!

 

 


 

Web Title: A new identity created by the women prisoners in Jaipur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.