Mohe Rang De - The story of Azharpur in Kutch, the extraordinary refreshing colors here and the stories of the people who fill their garments with this year's 'Deepostav'! | मोहे रंग दे- गोष्ट  कच्छमधल्या अजरखपूरची .. कापडात रंग  भरणा-या माणसांची .

मोहे रंग दे- गोष्ट  कच्छमधल्या अजरखपूरची .. कापडात रंग  भरणा-या माणसांची .

-मृदुला बेळे

कच्छमध्ये रणरणत फिरत होते गेले काही दिवस. तिथल्या गावागावात भटकले. वैराण पसरलेलं वाळवंट, वाळवंटात मधूनच उगवलेले निवडुंगाचे फरकाटे, यातून सरपटत जाणारा चकचकीत डांबरी रस्ता, रस्त्यावर हुलकावणी देणारं मृगजळ, आणि सतत येणार्‍या वाळूच्या वादळांमुळे नजरेसमोर तसल्या उन्हात पसरणारं धुकं.
पण या अशा रखरखाटात राहूनही इथल्या माणसांनी आपली कलात्मकता कशी शाबूत ठेवली असेल कुणास ठाऊक? 
या रेगिस्तानात एकमेव रंग आहे यांनी रंगवलेल्या वस्रांचा, यांनी विणलेल्या गोधड्यांचा, यांनी भरतकाम केलेल्या ओढण्यांचा. झाडांना फुलवणारी हिरवी बोटं असतात ना, तशी या रखरखाटात रंग भरणारी रंगीत बोटं यांची ! कुठून आल्या असतील या प्रेरणा यांच्यामध्ये? आयुष्यातलं हे वाळवंट रंगीत करायला हे या कला शिकले असतील का?
इथल्या बायकांचे कपडे आणि दागिनेही किती रंगीत . आणि किती तर्‍हातर्‍हांचे ! इतके वैशिष्ट्यपूर्ण की नुसत्या दागिन्यांवरून बाई अहिर आहे की रबारी की मेघवाल ते लग्गेच समजावं ! अगदी चिमुकल्या मुलींच्या गळ्यातही त्यांच्या जातीची खूण असलेले हे दागिने. 

 

कसं आयुष्य असेल या बायकांचं? 

आधुनिकतेचा स्पर्शही यांना झालेला दिसत नाही! साधा फोटो काढायलाही इथल्या छोट्या छोट्या मुली नाही म्हणतात. का तर म्हणे हे फोटो कुणी इंटरनेटवर पाहिले तर लग्न व्हायला अडचण होईल.
घरातली कामंधामं आवरून, रांधून-वाढून-उष्टी काढून या आपल्या डोक्यावरून हातभर घुंघट ओढून भरतकाम करत बसलेल्या असतात. हातातले मणामणाचे कडे आणि  गळ्यातल्या किलोकिलोच्या माळा सांभाळत. कानातली चांदीची भली थोरली कर्णफुले आणि नाकातल्या ओठांवर रुळणा-या नथी सावरत. पाठीवर माझी धोपटी टाकून मोकाट फिरणारी मी आणि दागिने, कपडे आणि परंपरांची ओझी वाहणा-या माझ्या या आयाबहिणी ! मान खाली घालून कष्टानं संसार करणार्‍या आणि फावल्या वेळात आपल्या बोटांनी रंगाचे मळे फुलवणा-या ! आपल्या कच्च्याबच्च्यांसाठी स्वप्नं विणणा-या !
इथल्या जुन्या बाजारातून मी आज काही जुने दागिने घेऊन आले. कुणाचे असतील हे दागिने? का विकले असतील ते तिने? मुलांना चार बुकं शिकवायला? नव-याला नखभर जमीन घेऊन द्यायला? की लेकीला उजवायला? विकून खूश झाली असेल ती अंगावरचं ओझं उतरलं म्हणून, की आसवं गाळली असतील आपलं हे स्रीधन विकताना तिनं?
तिथून घेतलेलं गळ्यातलं मी गळ्यात घालून पाहिलं आणि ते जिचं होतं तिच्या जगण्याची सगळी धडपड, तिचं हासू, तिचे आसूच मी गळ्यात घातले. जरासं ओलं, थंड लागलं ते मला. तिचे त्यावरचे अश्रू  अजून सुकले नसतील का? इथलं अजरखकाम आणि भुजोडी वीणकाम पहाताना दिसलेल्या रंगाच्या भल्याथोरल्या काहिल्या. जमिनीत पुरून ठेवलेल्या रांजणासारख्या भांड्यात फसफसून वर आलेला हसरा निळा रंग. निळ्या रंगाच्या हजारो छटा. मंजिष्ठ आणि मेंदी आणि हळद या सारख्या वनस्पतींच्या वासाने घमघमणारे इथले रंगीत कपडे. या रंगात रंगलेल्या हातानीच माझ्याशी गप्पा मारणारे सुफियान, औरंगजेब, जुनैद आणि हाजी इस्माईलभाई. त्यांच्या डोळ्यात या रंगीत कपड्यांची प्रतिबिंबं मोठी मोहक दिसतात खरं. पण तरी हे रंग त्यांच्या डोळ्यातले अश्रू   लपवू शकत नाहीत. 2001च्या भूकंपात त्यांची झालेली दैना, काळाच्या पोटात गाडले गेलेले सगेसोयरे, खचलेली घरं, उद्ध्वस्त झालेले कारखाने आणि सोडायला लागलेलं आपल्या वाडवडिलांचं गाव. या सगळ्याचं दु:ख त्या रंगांआडूनही त्यांच्या डोळ्यात डोकावत राहतं. 
आणि तरी यातून सावरत ही माणसं पुन्हा जोमाने उभी राहिलीयेत. नवा गाव नवं घर वसवून पुन्हा कापडं रंगवायला लागलीयेत. 
पुन्हा आपल्याला ल्यायला ही तलम वस्रं बनवायला लागलीयेत. आणि आपल्या या विशालकाय देशाचा हजारो वर्षं जुना पारंपरिक वारसा आपल्याशी जोडून देण्याचं काम अव्याहतपणे पुढे चालवू लागलीयेत. 
कच्छमधल्या अजरखपूरची, इथल्या विलक्षण सतेज रंगांची आणि ते रंग कापडात भरणा-या  माणसांची मी पाहिलेली, अनुभवलेली आणि लिहिलेली ही कहाणी वाचा यावर्षीच्या ‘दीपोत्सव’मध्ये !

(शिकण्या-शिकवण्यात रमणा-या  लेखिका प्राध्यापक आहेत.)

mrudulabele@gmail.com

 

-------------------------------------------------

प्रसिद्ध झाला !

 

अंकाविषयी अधिक माहिती 

deepotsav.lokmat.com

अंक कसा आणि कुठे मिळेल?
ऑनलाइन खरेदी- deepotsav.lokmat.com

व्हॉट्सअँप मेसेज पाठवून प्रत मिळवा- 955-255-0080

इमेल- sales.deepotsav@lokmat.com


 

 

 

 

 

 

 

Web Title: Mohe Rang De - The story of Azharpur in Kutch, the extraordinary refreshing colors here and the stories of the people who fill their garments with this year's 'Deepostav'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.