miss-Ukraine-banned-from-miss-world | घटस्फोटित आहेस? मूल आहे?- मग ‘मिस वर्ल्ड’ विसर! -मिस युक्रेनला ब्युटीवर्ल्डचा भलताच धडा!
घटस्फोटित आहेस? मूल आहे?- मग ‘मिस वर्ल्ड’ विसर! -मिस युक्रेनला ब्युटीवर्ल्डचा भलताच धडा!

ठळक मुद्देलग्न झालेलं असणं, मूल असणं हा बाईचा दोष आहे, हे कोण ठरवतं?

सखी ऑनलाइन टीम

बाईचं लग्न  झालेलं असलं किंवा ती घटस्फोटित असली किंवा तिला मुलं असली म्हणजे हा सारा तिचा दोष आहे का? तिच्या करिअरमध्ये हे सारं अडथळा ठरतं का? आणि तसं असेल तर तुम्ही उद्या सेरेना विल्यम्सलाही सांगणार का, तुला बाळ आहे त्यामुळे आता यापुढे तुला टेनीस नाही खेळता येणार, बंदी तुझ्यावर?- हे असे सारे प्रश्न मिस युक्रेन असलेल्या वेरोनिका डिडूसेंको या तरुणी सौंदर्यवतीने जाहीरपणे इन्स्टाग्रामवर उपस्थित केले आहेत. मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी मिस युक्रेन म्हणून निवडल्या गेलेल्या वेरोनिकाचा सन्मान परत घेण्यात आला. त्यामुळे चाललेल्या लढाईत तिनं आपली जाहीर भूमिका मांडली आहे.
2018 मध्ये वेरोनिकाची सार्‍या युक्रेनमध्ये मोठी लोकप्रियता होती. सर्वाधिक सुंदर तरुणी म्हणून ती निवडली गेली. तिच्या डोक्यावर सौंदर्यस्पर्धेत मिस युक्रेनचा ताजही आला. आता मिस वर्ल्डच्या आयोजकांनी मिस युक्रेन स्पर्धा आयोजित करणार्‍यांना सांगितलं की, तिनं खोटी माहिती दिली. तिचा क्राऊन, सन्मान आणि 12 हजार डॉलर्स ही बक्षीसाची रक्कम परत घ्या. तसं त्यांनी केलंही.
त्यावर वेरोनिका कायदेशीररित्या भांडते आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते की, लगA झालं, गरोदर आहे किंवा मुलं आहेत म्हणून बायकांशी भेदाभेद करणं आता तरी जगानं थांबवलं पाहिजे. मुळात हा भेद करणंच चूक आहे. मी काही अर्जात चुकीची किंवा खोटी माहिती दिलेली नव्हती. तिथं मॅरीड की सिंगल असाच पर्याय होता. मी सिंगल असा निवडला कारण माझा घटस्फोट झालेला होता. मूल असण्यानसण्याविषयी माहिती द्यायला तिथं काही जागाच नव्हती. म्हणून मग मी ती माहिती त्या तक्तयात भरायचंही काही कारण नव्हतं. तसा पर्यायच नव्हता तर मी माहिती देणार कशी?’
यावर मिस वर्ल्डने दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, मिस वर्ल्डने जगभर प्रवास करणं आवश्यक असतं. अगदी अल्पअवधीत प्रवासाची सूचना मिळते आणि निघावं लागतं.नैसर्गिक आपत्तीसह अनेक ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे आम्ही असे नियम केले आहेत की मिस वर्ल्डही अविवाहित असावी.’
अर्थात हे नियम पटणारे आहेत की नाहीत हा वेगळ्या चचेचा मुद्दा आहे. मात्र वेरोनिकाचंही तेच म्हणणं आहे की, बाईला मूल आहे किंवा तिचं लग्न  झालेलं आहे हा तिचा कच्चा दुवा कसा ठरतो. उद्या तुम्ही सेरेना विल्यम्सलाही म्हणाल, आम्ही नियम बदलले आता मूल असणार्‍यांना विम्बलडन नाही खेळता येणार!

जगभर या विषयाची चर्चा सुरु आहे. बाईच्या करिअरच्या वाटेत टिपीकल पुरुषी मानसिकता येते का? मूल असणं, लग्न  झालेलं असणं म्हणजे करिअरच्या वाटेत अडथळे, बाईचा विक पॉइण्ट हे आजही का मानलं जातं, हे प्रश्न चर्चेत आले आहेत.
दुर्देव म्हणजे त्यांची उत्तरं आजही सोयिस्कर टाळली जात आहेत.

Web Title: miss-Ukraine-banned-from-miss-world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.