lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > तुमची मुलं ‘अशी’ वागताहेत का? कोरोनाकाळात घरबंद मुलांच्या अस्वस्थतेवर उपाय काय?

तुमची मुलं ‘अशी’ वागताहेत का? कोरोनाकाळात घरबंद मुलांच्या अस्वस्थतेवर उपाय काय?

मुलं घराबाहेर खेळत होती, चिखलात माखत होती, धुळीत लोळत होती, गुडघे, ढोपरं फोडून घेत होती... आता हे सगळं बंद झालं आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 03:52 PM2021-06-08T15:52:00+5:302021-06-08T16:22:49+5:30

मुलं घराबाहेर खेळत होती, चिखलात माखत होती, धुळीत लोळत होती, गुडघे, ढोपरं फोडून घेत होती... आता हे सगळं बंद झालं आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय कराल?

your children behavior changed in corona time, they are restless, violent or very sad? | तुमची मुलं ‘अशी’ वागताहेत का? कोरोनाकाळात घरबंद मुलांच्या अस्वस्थतेवर उपाय काय?

तुमची मुलं ‘अशी’ वागताहेत का? कोरोनाकाळात घरबंद मुलांच्या अस्वस्थतेवर उपाय काय?

Highlightsकोरोनामुळे आप्तस्वकीयांचा मृत्यू झाल्यास मुलांना कल्पना द्या; पण चर्चा लांबवू नका.

डॉ. कल्पना सांगळे

कोरोनाच्या काळात मुले त्यांच्या वयाच्या मनाने खूप स्थित्यंतरं अनुभवत आहेत, ह्याची आपल्याला जाणीव आहे का? दीड वर्षाआधी बेफिकीर, आनंदी, उत्साही असलेली आपली मुलं आज शाळा बंद, टीव्ही बंद, बाहेर खेळणं बंद, इतर मुलांमध्ये मिसळणं बंद अशा अवस्थेत केवळ घरात स्क्रीनसमोर बंद आहेत ! मुलं घराबाहेर खेळत होती, चिखलात माखत होती, धुळीत लोळत होती, गुडघे, ढोपरं फोडून घेत होती, पतंगाच्या मांजाने हात कापून घेत होती; आता हे सगळं बंद झालं आहे. मुलांवर याचा परिणाम झाल्याची काही चिन्हं तुम्हाला दिसतात का? कोरोनाचा काळ हा सर्वांवर आलेला आहे, संपूर्ण जग त्याच्यामुळे थांबले आहे, ह्याची जाणीव आपल्याला असणे गरजेचे आहे. आपण अनेक गोष्टी ठरवतो; पण त्या सगळ्या तडीस जात नाहीत. आपण विचारही केलेला नसतो अशा गोष्टी घडतात आणि आपले प्लॅन्स फसतात; पण त्यामुळे आपण खचून न जाण्याची जाणीव मुलांना छोट्या छोट्या गोष्टीतून करून द्या. हा धडा त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा धडा असणार आहे. फक्त तुम्ही त्यांच्यापुढे खचून जाऊ नका !
मुले आई-वडिलांच्या मन:स्थितीचा अंदाज फार अचूक लावत असतात ! आईच्या कपाळाची एक आठी देखील त्यांना चिंतित करू शकते ! बोलता न येणारे बाळही आपल्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्यानुसार रिॲक्ट होत असते. त्यामुळे आपल्या वागण्यातून बोलण्यातून शक्य तितकी सकारात्मकता मुलांना दिसू द्या ! त्यामुळे दोन गोष्टी होतील : एक म्हणजे मुले आनंदी राहतील आणि मोठ्यांची चिडचिड जरा आटोक्यात येईल.
बरेचदा रागाच्या भरात मुलांना मारलेला एक धपाटा खरे तर आपण आपल्या नियतीला मारलेला असतो, तो बसतो आपल्या मुलांच्या पाठीत, एवढंच!

तुमची मुलं ‘अशी’ वागताहेत का?

१.अति चिडचिड करणे किंवा खूपच शांत बसणे.
२. अंगठा चोखण्याची नव्याने सवय लागणे.
३. आहार कमी किंवा नेहमीपेक्षा जास्त होणे.
४. सतत आई-वडिलांना चिटकून राहणे.
५.कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट न वाटणे, बोलायची / interact करायची अजिबात इच्छा न होणे.
६. घाबरून राहणे, कारण नसताना उगाच रडत बसणे.
७. झोपेच्या वेळा बदलणे. रात्रीची झोप लागत नाही त्यामुळे मग दिवस लोळत घालवणे.


तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय करू शकता ?

१. मुलांबरोबर वेळ घालवावा, ह्याचा अर्थ मुलांशेजारी बसून आपण मोबाइलमध्ये डोके घालावे, असा नाही, तर त्यांच्याशी बोलावे, त्यांचे ऐकून घ्यावे.
२. सदा सर्वदा सल्ले देण्याच्या, शिकविण्याच्या मोडमध्ये राहू नये, तर कधी कधी नुसते ऐकून त्यावर काहीतरी मजेशीर कमेंट करावी.
३. इतर मुलांबरोबर सारखी सारखी तुलना करू नये ! आपले लेकरू युनिक आहे त्याची जाणीव ठेवावी.
४. मुलांचा दिनक्रम आखून ठेवावा, घरातील कामांमध्ये त्यांना सामील करून घ्यावे. जेवायला ताटे वाढून घेणे, पाण्याचे ग्लास घेणे, अशी कामे सोपवावी.
५. थोडी मोठी मुले असल्यास त्यांना घरातील स्वच्छता ठेवायला मदतीला घ्या, चादरी-पडदे कसे बदलतात ते शिकवा, पांघरुणाच्या घड्या करायला शिकवा, घरातील छोटे छोटे हिशेब त्यांना करायला लावा. ह्या कामाचे त्यांना बक्षीसही द्या!
६. मुलांची मित्र मंडळी त्यांना झूमसारख्या व्हर्चुअल साधनांमधून भेटतील, असे पाहा.
७. मोठ्यांनाही खूप ताण आहेच; पण तो मुलांसमोर उघड करू नका. मुलांसमोर भांडण टाळा.
८. कोरोनामुळे आप्तस्वकीयांचा मृत्यू झाल्यास मुलांना कल्पना द्या; पण चर्चा लांबवू नका.

(लेखिका बालरोग तज्ज्ञ आहेत.)
kalpana_sangale@yahoo.co.in

Web Title: your children behavior changed in corona time, they are restless, violent or very sad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.