Join us

मूल होत नाही म्हणून डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या महिलांचे प्रश्न गंभीर; त्यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 17:16 IST

लग्नानंतर लगेच मुलींना विचारणा सुरु होते, काय मग गोड बातमी कधी? पण त्या प्रश्नाचं उत्तरच जेव्हा देता येत नाही तेव्हा अनेकजण खचतात

ठळक मुद्देतिला पाहिला प्रश्न विचारला जातो कि " काही गोड बातमी आहे का...?(सर्व छायाचित्रे- गुगल)

डॉ. निलेश मोहिते

मागच्या आठवड्यात माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीचा फोन आलेला रडतं रडतं ती सांगत होती की ती नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचा विचार करतेय. तीचा हा निर्णय ऐकून मला आश्चर्य वाटले कारण मी तीच्या नवऱ्याला आणि तिला बऱ्याच वर्षांपासून ओळखत होतो. एकमेकांना समजून घेणारे आणि परस्परांवर खूप प्रेम करणारे जोडपे म्हणून मी त्यांना ओळखत होतो. त्यांच्या लग्नाला आता सहा वर्ष होऊन गेले होते पण या सुखी संसाररूपी वेली वर फुल लागतं नव्हते. खूप प्रयत्न करूनही त्यांना अजून अपत्पप्राप्तीचं सुख नव्हतं. बऱ्याच आधुनिक उपचार पद्धती वापरून सुद्धा फार उपयोग झाला नाही. खूप औषध घेऊन तिच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम झाला. प्रचंड मानसिक खच्चीकरण झाले. घरच्यांकडून आणी कुटुंबियांकडून सारखी विचारणा व्हायची. लोकांच्या प्रश्नांना कंटाळून त्या दोघांनी बाहेरच्या कार्यक्रमांना जाणेच सोडून दिले. सगळे उपाय थकल्यावर सासू सासऱ्याचं मन राखण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या पूजा आणि नवसही करुन झाले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिचा नवरा खूपच समंजस होता आणी प्रत्येकवेळी तिच्या सोबत होता पण तरी सुद्धा तिच्यामध्ये गिल्ट(अपारधीपणाची भावना)निर्माण झाली. आपण आपल्या प्रेमळ  नवऱ्याला बाप होण्याचं सुख देऊ शकत नाही हा विचार तिला सारखा बोचत रहायचा. काही दिवसांपासून तिच्या मनात आत्महत्येचे विचारसुद्धा यायला लागलेले. शेवटी आत्महत्या न करता वेगळे होऊयात असा विचार ती करायला लागलेली. ही अवस्था शहरात राहणाऱ्या एका उच्च शिक्षण घेतलेल्या डॉक्टर तरुणीची आहे तर गावातल्या कमी शिकलेल्या किंवा समाजाच्या बंदिस्त चौकटित जगणाऱ्या तरुणीचीं काय अवस्था होत असेल ह्याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.

 बऱ्याच वेळा मूल न होण्यामागे पुरुषोमधले काही रोगसुद्धा कारणीभूत असतात किंवा दोघांमध्ये एकत्रित काहीतरी समस्या असू शकतात पण प्रत्येकवेळी मूल न होण्यामागे स्त्रीलाच दोषी ठरवलं जातं. त्यांना बऱ्याच वेळा भेदभावाची वागणूक दिली जाते. अजूनही मूल न झालेल्या स्रियांना वांझ म्हणून हिणवलं जातं. त्यांना कौटुंबिक कार्यक्रमात बोलावले जातं नाही. आई होणं हे जणू स्री आयुष्याचे एकमेव आणि अंतिम ध्येय आहे असे समजले जाते. अश्या स्रिया मग आपलं सत्व हरवून बसतात. सतत स्वतःला दोष देत रहतात. मातृत्वासाठी झूरत रहतात. त्यातूनच मग त्या डिप्रेशन मधे जाऊन आत्महत्या सुद्धा करतात. काही स्रियाना विविध कारणांमुळे आई होण्याची इच्छा नसते पण समाज आणि कुटुंब त्यांच्यावर जबरदस्ती मातृत्व लादते. स्वतःच्या मातृत्वाचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडे नसतो. मूल दत्तक घेऊन यातून मार्ग काढता येऊ शकतो किंवा सरोगसी पद्धतीचा उपयोग करता येऊ शकतो. दुर्देवाने अजूनही आपल्या समाजात अजूनही ह्या पर्यायांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. आई किंवा वडील होणे ही फक्त शारीरिक प्रक्रिया नसून प्रामुख्याने मानसिक प्रक्रिया आहे. बाळाच्या आगमनानंतर आलेल्या जबाबदारीने, प्रेमाने आणी घ्याव्या लागणाऱ्या काळजी आणी कष्टाने माणूस खऱ्या अर्थाने पालक बनत असतो. फक्त मूल जन्माला घालून पालक बनता येत नाही. अजून भारतात असंख्य अनाथ मुले प्रेमळ आणि जबाबदार पालकांच्या प्रतीक्षेत आहेत. मूल दत्तक घेणे ही बऱ्याचशा जोडप्यांसाठी मानसिक परीक्षाच असते. दुसऱ्याच्या मुलांना स्वतःचे समजून त्याचा प्रेमाने सांभाळ करणे कठीण असते पण पालक होण्यासाठी झूरत राहण्यापेक्षा नक्कीच कमी क्लेशदायक असते.        आपल्या देशातल्या अनेक स्रियांना ह्या त्रासातून जावे लागते ह्यासाठी कारणीभूत असते समाजाची मातृत्वाबद्दलची चुकीची धारणा आणी अट्टाहास. आपल्या सगळ्यांनाच या सामाजिक मानसिकतेमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अजूनही लग्न होऊन जेंव्हा मुलगी माहेरी येते तेंव्हा तिला पाहिला प्रश्न विचारला जातो कि " काही गोड बातमी आहे का...?मात्र यासाऱ्यात तिच्या मनाचा विचार करणंही शिकलं पाहिजे.. नाहीतर हे नैराश्य अनेकींचं जगणंच पोखरुन टाकतं. 

(डॉ. निलेश मोहिते कम्युनिटी सायकिॲट्रिस्ट असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या दुर्गम भागात मानसिक आराेग्य विषयात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :महिलामानसिक आरोग्यआरोग्य