- अवंतिका कोरान्ने (समुपदेशक)
तासनतास आपण फोन हातात घेऊन बसतो. मनात असतं निवांत बसू, झोप काढू. दिवसभर सतत काम करून जीव शिणलेला असतो. पण मग फोन हातात येतो आणि आपण काहीही कारण नसताना तासनतास स्क्रोल करतो. ते पाहून पाहून मनावर एकप्रकारचा ताण येतो. कुणी काहीतरी टीका केलेली असते, कुणी आपला आनंद साजरा केलेला असतो, कुणाचा संताप, कुणाची शिवीगाळ, कुठं रडगाणी. हा सारा अनावश्यक माहितीचा धबधबा आपल्यावर कोसळतो आणि आपलं डोकं भणभणतं.मूड जातो. उदास होतो. चिडचिड होते. स्वत:चाच राग येतो की, आपण असा अनावश्यक वेळ का वाया घालवला. पण त्याचं काही उत्तर नसतं आपल्याकडे आणि फोनची चटक काही सुटत नाही.कुणाला तरी काहीतरी फॉरवर्ड करा. नाहीतर फुकटचे गुड नाइट, गुड डेचे मेसेज पाठवा. मनावरचा ताण त्यानं वाढत जातो. काहींना तर अतिशय एकेकटंही वाटतं.
असं का होतंय, विचार केलाय?
आपण असतो एकटेच, पण माहितीच्या रूपात माणसं आणि त्यांच्या मतांच्या गराड्यात सापडतो. अनावश्यक माहिती आपला मेंदू प्रोसेस करतो, त्या माहितीचं काय करायचं हे त्याला कळत नाही. पण माहितीच्या पुरात मन, मेंदू गटांगळ्या खातातच.जे मोठ्यांचं होतं, तेच लहान मुलांचंही होतं. मुलांना तर कळत नाही की, आभासी जगातलं खोटं काय नि खरं काय?अवतीभोवती असलेली माणसं बोलत नाहीत, संवाद नाही. पण सोशल मीडियात भरपूर संपर्क ही तर टीनएजर मुलांची समस्या आहेच.त्यातून मग अनेकजण आतल्या आत कोलमडूनही पडतात. कुणीच बोलायला नाही, मनातलं सांगता येत नाही. जो तो सल्ले देतो, पण ऐकून घेत नाही असा सगळा प्रकार.जो मोठ्यांच्या बाबतीत होतो तसाच तरुण मुलांच्या बाबतीतही!त्यामुळे आपण आता स्वत:लाच विचारलं पाहिजे की, तासनतासचा स्क्रीन टाइम मला नक्की काय देतो? कशामुळे आपण असे माहितीच्या पुरात भरकटल्यासारखे करतोय? आपलं डोकं का जड झालंय?