Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > Valentine's Day 2026: बाई गं, तुझं स्वत:वर प्रेम आहे का सांग! बोल, तुझी काळजी कोण घेतं..

Valentine's Day 2026: बाई गं, तुझं स्वत:वर प्रेम आहे का सांग! बोल, तुझी काळजी कोण घेतं..

Valentine's Day 2026 Special: व्हॅलेण्टाइन्स डे : इतरांवर नंतर, आधी आपण स्वत:वर तर प्रेम करायला हवं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2026 18:12 IST2026-02-11T18:11:09+5:302026-02-11T18:12:01+5:30

Valentine's Day 2026 Special: व्हॅलेण्टाइन्स डे : इतरांवर नंतर, आधी आपण स्वत:वर तर प्रेम करायला हवं..

Valentines Day 2026: Girl, first love yourself, tell me do you love yourself! Tell me, who takes care of you.. | Valentine's Day 2026: बाई गं, तुझं स्वत:वर प्रेम आहे का सांग! बोल, तुझी काळजी कोण घेतं..

Valentine's Day 2026: बाई गं, तुझं स्वत:वर प्रेम आहे का सांग! बोल, तुझी काळजी कोण घेतं..

वैद्य राजश्री कुलकर्णी (एमडी. आयुर्वेद)

स्वत:वर प्रेम करा! खरंतर आजच्या युगातदेखील असं सांगावं लागतंय हीच गोष्ट आश्चर्य वाटण्यासारखी आहे. त्याचं कारण असं आहे की स्वतःवरसुद्धा प्रेम करायचं असतं हेच काही महिला विसरून गेलेल्या असतात. आणि मग येतो फेब्रुवारी महिना, जगभर “प्रेमाचा महिना” म्हणून ओळखला जातो. पण प्रेम ही भावना केवळ पुरुष व स्त्री यांच्याच दरम्यान असते असं नाही. जगातल्या अनेक नात्यांमध्ये प्रेम असणं गरजेचं असतं; पण सर्वांत आधी आपलं स्वतःवर पण असणं गरजेचं असतं.पण स्वत:साठी वेळ, स्व:वर प्रेम हे अनेकींच्या वाट्यालाच येत नाही.

 

स्त्री नेहमीच कुटुंबाचा केंद्रबिंदू. अनेक पदरी नात्यांमधून ती विविध भूमिका बजावत असली तरी तिच्यासाठी मात्र कायमच कुटुंब प्रथम आणि महत्त्वाचे असेच सांगितले-शिकवले जाते. या भावनेमुळे नेहमीच नवरा, मुलं, घरची इतर मंडळी, सासू-सासरे, त्यांची सोय, त्यांच्या वेळा पाळणं हीच मोठी जबाबदारी समजून महिला त्या सगळ्यालाच प्राधान्य देतात. आणि स्वत:ची काळजी घेणंच विसरतात. स्वत:वर प्रेम नसल्यानंही मग महिलांना अनेक आजार छळतात.

अगदी उदाहरणच बघायचं झालं तर अश्विनी होममेकर. दिवसभर घरातलं सगळं काम करत राहायची. त्यात तिचं वजन सातत्याने वाढत होतं. डॉक्टरांनी सांगितलं की व्यायाम करणं, फिरायला जाणं अतिशय गरजेचं आहे; पण इतकी साधी छोटी गोष्ट ती स्वतःसाठी करू शकत नव्हती. म्हणे वेळच नसतो. वेळ नसतो, कारण स्वतःचा विचार न करता सतत इतरांना प्राधान्य देणं! सकाळी मुलांचं करणं, नवरा व मुलांचे डबे यातच दहा वाजून जातात. संध्याकाळी व्यायाम करायचा म्हटलं तर नवरा घरी येतो, त्याचं चहापाणी करावं लागतं, सासऱ्यांना आठच्या ठोक्याला जेवायला वाढावं लागतं, अशी न संपणारी कारणं….
होममेकर असो, नोकरी असो, की उत्तम करिअर, इतरांना वेळ आणि प्रेम, माया देताना स्वत:वर प्रेम करणं अनेकींचं राहूनच जातं.
आता व्हॅलेंटाईन डे जवळ आला, यंदा आपण आपल्यावर प्रेम करायला शिकूया..

 

हे का होतं?

स्वतःचा विचार करणं, स्वतःवर प्रेम करणं ही खरं तर फार अवघड गोष्ट नाही. त्यासाठी पाहिजे माइंडफूलनेस अर्थात सजगता. स्वत:ला सांगणं की मीही स्वतंत्र, सुंदर व्यक्ती आहे. मला जे पाहिजे ते करण्याची मुभा आहे हा आत्मविश्वास. स्वतःचं शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य जपणं आणि हे करताना स्वतःबद्दल थोडी करुणा, प्रेम बाळगणं म्हणजे सेल्फ लव्ह…
हे करताना स्वतःच्या मर्यादा ओळखणं, आपले व्यक्तिमत्त्व जाणून घेणं, त्याचे प्लस पॉईंट्स माहिती असणं हेही आवश्यक आहे.
स्वतःची एनर्जी कुठे आणि किती प्रमाणात वापरायची, कुठे थांबायचं, कुठे ठामपणे “नाही” म्हणायला शिकायचं हाही स्वतःवर प्रेम करण्याचाच भाग आहे. आपण आपली स्वतःची किंमत चांगली ठेवणं गरजेचं आहे; कारण तुम्ही ती ठेवली नाही तर कोणीच ठेवणार नाही.


स्वतःवर प्रेम कसं करायचं?

१. सर्वप्रथम इतरांशी तुलना करणं बंद करा. प्रत्येकाचा आयुष्याचा प्रवास वेगळा असतो हे मान्य करून पुढे जा.

२. अगदी जवळच्या ते दूरच्या नातेसंबंधामध्ये तुम्ही कोणत्या थरापर्यंत एखादी गोष्ट ताणू शकता किंवा स्वीकारू शकता हे नक्की ठरवून ते निश्चितपणे पाळा, ठाम रहा.

३. स्वतःचं शरीर व मन यांना जपा, त्यांची काळजी घ्या. त्यांच्या गरजा ओळखून त्या पुरवण्याचा प्रयत्न करा. मुख्य म्हणजे हे करताना मनात कोणताही अपराधी भाव नको. जसं की अगदी बरं नसताना रक्ताची तपासणी करा असं सांगितलं तरी आपल्यावर उगीचच पैसे खर्च होतायेत असं अनेकींना वाटतं.

४. अगदी एखाद दिवशी सकाळी उशिरा जाग आली, घरातलं टाईम टेबल बिघडलं तरी दिवसभर या स्वतःला दोष देत राहतात. अशा वेळी स्वतःला माफ करायला शिकलं पाहिजे. छोटी चूक झाली तर तेवढी करण्याची स्वतःच स्वतःला परवानगी द्यायला हवी.

 

५. चांगले विचार असणाऱ्या, पॉझिटिव्ह माईंडसेट असणाऱ्या लोकांमध्ये राहावं म्हणजे आपोआप आपलंही मन पॉझिटिव्ह होतं. आपल्या प्रत्येक कृतीच्या योग्ययोग्यतेचं दुसऱ्याकडून प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा करू नका.

६. रोजच्या आयुष्यात जो एकसुरीपणा येतो त्यातून मोकळं होण्यासाठी थोडा ब्रेक घेणं, बाहेर जाणं, मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळणं गरजेंचं आहे. स्वतःच्या आवडी, छंद जोपासणं, त्यासाठी वेळ काढणं ही चैन नसून गरज आहे हे आधी स्वतःला पटलं पाहिजे.

७. सतत काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत रहा. त्यामुळे मन गुंतून राहते व कोणत्याही निगेटिव्ह भावना मनात येत नाहीत.

८. व्यायाम, योग, ध्यान यांच्या माध्यमातून निरोगी राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे मनही आपोआप शांत, रिलॅक्स राहील. योग्य आहार व विश्रांती हेही तितकेच महत्त्वाचे 
आहे हे लक्षात ठेवा.

९. स्वतःवर विश्वास ठेवा, सतत स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून स्वतःला नावं ठेवणं, टीका करणं बंद करा. याउलट स्वतःचं व्यक्तिमत्त्व प्रभावी व्हावं म्हणून ज्या सपोर्टिव्ह गोष्टी करायला हव्या त्या करा. स्वतःचा स्वतःशी असणारा संवाद पॉझिटिव्ह ठेवा.

फायदे काय?

यामुळे आत्मविश्वास वाढतो, आपण जे करतो आहोत ते योग्य आहे आणि गरजेचेदेखील आहे याची खात्री पटते.
मनावरील ताण कमी होतो व आपण आनंदी राहू लागतो, साहजिकच याचा परिणाम घर, कामाची जागा सगळीकडे दिसून येतो. आपल्या भोवतीचे वातावरण प्रसन्न होते.
सर्वच प्रकारचे नातेसंबंध सुधारतात. त्यामुळे स्वतःवर आधी प्रेम करायला शिका. कारण ती नैसर्गिक, स्थिर भावना आहे, जी तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजण्यासाठी गरजेची आहे.

rajashree.abhay @gmail. com

 

Web Title : वेलेंटाइन डे 2026: क्या आप खुद से प्यार करते हैं? आपकी परवाह कौन करता है?

Web Summary : इस वेलेंटाइन डे पर, आत्म-प्रेम को प्राथमिकता दें। महिलाएं अक्सर परिवार पर ध्यान केंद्रित करते हुए खुद को उपेक्षित करती हैं। खुशहाल, स्वस्थ जीवन के लिए खुद को महत्व देना, सीमाएं निर्धारित करना और अपनी भलाई का पोषण करना सीखें।

Web Title : Valentine's Day 2026: Do you love yourself? Who cares for you?

Web Summary : This Valentine's Day, prioritize self-love. Women often neglect themselves, focusing on family. Learn to value yourself, set boundaries, and nurture your well-being for a happier, healthier life.