अंकिता बॅनर्जी (समुपदेशक)
प्रोक्रॅस्टिनेशन हा शब्द आजकाल जो तो वापरतो. सोशल मीडियातले रिल्स हे प्रोक्रॅस्टिनेशन कसं कमी करायचं, याविषयी सतत सांगत असतात. मोटिव्हेशनल स्पीकर बोलत असतात आणि नंतर नंतर ते रिल पाहण्याचा किंवा त्या विषयावर काही ऐकण्याचाही इतका कंटाळा येतो की, ते पाहणंही लांबणीवरच पडत जातं. तर आता हे प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय तर अळमटाळम, चालढकल, कामं लांबणीवर टाकण्याची, करू करू म्हणण्याची सवय!
अनेकांना ही सवय असते आणि आपल्याला ही सवय आहे म्हणून आपलं टाइम मॅनेजमेंट फसतं, आपली कामं वेळेवर पूर्ण होत नाहीत, ज्यात त्यात उशीरच होतो, असं बरंच काही म्हणत स्वत:ला दोष दिला जातो. (The serious disease of not completing any work on time, relationships break down, humiliation occurs, and even promotion is not possible, all because of this.)थोडक्यात काय तर आपली ढकलगाडी होते. आपण कामं पुढे ढकलतो आणि कामाचा डोंगर वाढत गेला की, त्या दबावाखाली आपला ताणही वाढतो. मग आता प्रश्न असा की, आपली अशी ढकलगाडी का होते? सगळं काही कळत असूनही आपण कामं वेळच्यावेळी न करता अळमटळम का करतो?
मुळात आपण अळमटळम का करतो?
१. तर या त्रासाची काही शास्त्रीय कारणंही हल्ली सांगितली जातात. म्हणजे काही जणांना आपण जे काम करतोय त्या कामात अपयश येण्याची, आपल्याला जमलं नाही तर लोक काय म्हणतील, असं वाटून काम सुरूच करण्याची धास्ती वाटते.
२. कशाला करायचं काम असंही वाटतं, ते काम करण्याची काही ठोस प्रेरणाच नसते.
३. डिस्ट्रॅक्शन फार असतं म्हणजे एक काम करायला गेलं की दुसरं दिसतं की तिसरं दिसतं की चौथं. एकही धड होत नाही.
४. काही भावनिक प्रश्नही असतात. आत्मविश्वास कमी असतो, स्ट्रेस खूप असतो. अनेक कामं केल्याने मानसिक थकवा आलेला असतो.
५. योग्य टाइम मॅनेजमेंट जमत नाही. त्यामुळेही महत्त्वाची कामं म्हणत अनेक कामं मागे राहतात.
त्यामुळे होतं काय?
कामं वाढत राहतात. त्यामुळे प्रचंड स्ट्रेस येतो.
अपराधीही वाटतं की, हे काय आपली क्षमता असूनही आपण काम करत नाही.
एकूण उत्पादन क्षमतेवरही प्रचंड परिणाम होतो आणि कामं चटचट हातावेगळी न झाल्याने अनेक संधी गमवाव्या लागतात.
मानसिक, शारीरिक आजारही होतात. काही आजार तर नैराश्यातूनही होतात.
नातेसंबंधांवर त्याचा परिणाम होऊन खोटं बोलणं, ते भांडणं होणं असे अनेक त्रास उद्भवतात.
मनाने कच खाल्ली की..?
कामं पुढे ढकलण्याची आपल्याला अशीच सवय झाली की मोडता येत नाही. लवकर सुटत नाही. कळतं पण वळत नाही, अशी स्थिती होते.
त्याचं कारण शून्य स्वयंप्रेरणा.
नवीन काही करायची ऊर्जा कमी कमी होत जाते. कामातले सातत्य तर प्रचंड कमी होते.
रोज उठून काही काम करणं हीच शिक्षा वाटू लागते आणि आपल्याकडून फार काम होत नाही, याचा दोष इतरांना देणं सुरू होतं. इतरांच्या कामात चुका काढण्याची, टिंगल करण्याची सवय लागते आणि हीच सवय आपल्याला आपलं ध्येय ठरवूही देत नाही आणि जे ध्येय ठरवलं आहे ते गाठण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण करते. आपल्यासाठीच मारक ठरते. आपल्याला व्हायचे बरेच काही असते, करायचेही खूप काही असते. पण प्रत्यक्ष आपण कोणीच होऊ शकत नाही आणि काहीच करत नाही. कारणं सांगत आला दिवस रेटतो आणि मला खूप काम आहे, मला कशालाच वेळ नाही. इतर लोक कशी मजा करतात, मला तर कशालाच वेळ नाही म्हणत आपण आला दिवस गेला दिवस करत जगतो.
खरंतर एक लहानसं काम ठरवून ते नीट शांतपणे आपण ठरवलेल्या वेळेत करणं, आनंदानं करणं असा सराव केला तर आपल्यालाच बाधक ठरणारी ही सवय सोडता येते. मंत्र तोच आधी करायचं, विचार कमी-कृती जास्त करायची!
अळमटळम कमी कसं करायचं?
१. मान्य करायचं की, आपल्याला कामात अळमटाळम करण्याची सवय आहे.
२. हे ही मान्य करायचं की, आपल्याला खरंच खूप काम आहे. आपण आळशी नाही पण काहीतरी चुकतंय आणि जे चुकतंय ते सुधारणं शक्य आहे.
३. स्वत:ला दोष देऊन लगेच शिक्षा करायची नाही.
४. मोठ्या कामाचे लहान लहान तुकडे करून, रोज त्या कामासाठी ठरलेला ३० मिनिटं वेळ द्यायचाच.
५. एकदम मोठ्या कामाचा विचार न करता लहान टप्प्यात काम करायचं.
६. कामांची यादी करून रोज महत्त्वाची कामं आधी उरकून टाकायची.
७. ‘फर्स्ट इन, फर्स्ट आऊट’ हे सूत्र जर जमलं तर अजून चांगलं.
८. सगळी कामं एकदम करायला जायची नाही तर एकेक काम हातावेगळं करायचं.
९. कामांना डेडलाइन अर्थात मुदत लिहिण्याची सवय लावायची की, अमूक एका मुदतीत हे काम पूर्ण झालंच पाहिजे.
१०. प्रोक्रॅस्टिनेशनचा त्रास आहे की नैराश्याचा त्रास आहे, याचा अंदाज घेऊन आवश्यक तिथे वैद्यकीय मदत नक्की घ्यायची. जाणकारांचा सल्लाही घेणं आवश्यक.
११. आपल्याला केवळ प्रोक्रॅस्टिनेशनचा त्रास आहे की, अन्य काही मानसिक व्याधी आहेत. योग्य उपचारांची गरज आहे हे आपणच न ठरवता तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि त्यावर सावकाश एकेक उपाय करणंही गरजेचं असतं!