मैत्री म्हणजे आयुष्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी नातं. आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो, त्यांच्या विचारांचा आणि स्वभावाचा परिणाम नकळत आपल्या मनावर होत असतो. म्हणूनच मैत्री करताना केवळ साथ मिळतेय म्हणून नाही, तर त्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे ही महत्वाचं असतं. (Stay away from women who have these 5 habits, because they are bad for your mental health )अशा काही मैत्रिणी दूरच बऱ्या ज्यांच्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतात. ही ५ लक्षणे किंवा सवयी असलेल्या लोकांपासून लांबच रहा.
१. सतत नकारात्मक बोलणाऱ्या मैत्रिणींपासून विशेषतः सावध राहायला हवं. अशा व्यक्ती प्रत्येक गोष्टीत समस्या शोधतात, तक्रारी करतात आणि नकळत तुमच्याही मनात नकारात्मक विचार पेरतात. काही काळानंतर तुम्हालाही प्रत्येक गोष्ट अवघड वाटू लागते आणि आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे अशा वातावरणापासून दूर राहणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं असतं.
२. फक्त कपडे, मेकअप आणि बाह्य सौंदर्य याच विषयांभोवती फिरणारी मैत्रीही फार काळ टिकणारी आणि समाधान देणारी नसते. जीवनात अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात, स्वप्नं, ध्येय, भावना, अनुभव पण अशा मैत्रीत या गोष्टींना स्थानच मिळत नाही. त्यामुळे नातं उथळ असतं आणि खरा भावनिक आधार मिळत नाही.
३. काही मैत्रिणी अशा असतात ज्या तुमच्या यशाकडे सकारात्मक नजरेने पाहू शकत नाहीत. तुमचं कौतुक करण्याऐवजी त्यांचा जळफळाट होतो किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. अशा नात्यामुळे तुमचा उत्साह कमी होतो आणि स्वतःबद्दल शंका निर्माण होऊ लागते. खरी मैत्रीण मात्र तुमच्या यशात मनापासून आनंदी असते.
४. गॉसिप करणाऱ्या आणि इतरांची निंदा करणाऱ्या मैत्रिणींपासूनही सावध राहणं आवश्यक आहे. ज्या व्यक्ती इतरांबद्दल सतत वाईट बोलतात, त्या उद्या तुमच्याबद्दलही तसंच बोलू शकतात. अशा नात्यात विश्वास टिकत नाही आणि मनात असुरक्षितता वाढते.
५. फक्त स्वतःपुरतीच मैत्री करणाऱ्या व्यक्तीही नातं कमकुवत करतात. ज्या मैत्रिणीला फक्त स्वतःच्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, जी तुमचं ऐकत नाही किंवा तुमच्या भावनांना समजून घेत नाही, अशा नात्यात तुम्ही एकटे पडल्यासारखं वाटू लागतं. मैत्री इतर नात्यांप्रमाणेच दुतर्फा असणं गरजेचं आहे.
खरं पाहता, मैत्रीचा आपल्या आयुष्यावर खूप खोल परिणाम होत असतो. चांगल्या मैत्रिणी तुमचं मनोबल वाढवतात, योग्य सल्ला देतात आणि कठीण प्रसंगी आधार होतात. त्यांच्या सहवासात तुम्ही अधिक सकारात्मक, आत्मविश्वासी आणि आनंदी होता. उलट चुकीच्या मैत्रीमुळे ताण, नकारात्मकता आणि चुकीचे निर्णय यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच मैत्री करताना संख्या नाही, तर गुणवत्ता महत्त्वाची आहे. कमी पण खऱ्या, समजून घेणाऱ्या आणि सकारात्मक मैत्रिणी आयुष्य समृद्ध करतात.
