lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > ....  म्हणून मी डॉक्टर  झाले!

....  म्हणून मी डॉक्टर  झाले!

महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत समाजाकडून होणारं अक्षम्य दुर्लक्ष मला एक डॉक्टर म्हणून माझी भूमिका काय याचा विचार करण्यास भाग पाडत होतं. एक डॉक्टर म्हणून मी महिलांच्या आरोग्यावर काम करावं असा विचार मी करू लागले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:46 PM2021-03-12T17:46:58+5:302021-03-13T18:27:04+5:30

महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत समाजाकडून होणारं अक्षम्य दुर्लक्ष मला एक डॉक्टर म्हणून माझी भूमिका काय याचा विचार करण्यास भाग पाडत होतं. एक डॉक्टर म्हणून मी महिलांच्या आरोग्यावर काम करावं असा विचार मी करू लागले.

..So I became a doctor! | ....  म्हणून मी डॉक्टर  झाले!

....  म्हणून मी डॉक्टर  झाले!

Highlightsस्वतःच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी प्रभावीपणे करता येतो हे मला निर्माणमध्ये समजलं.- महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत समाजाकडून होणारं अक्षम्य दुर्लक्ष मला एक डॉक्टर म्हणून माझी भूमिका काय याचा विचार करण्यास भाग पाडत होतं.- औरंगाबाद येथेच इंटर्नशिप करताना येणारे अनुभव माझा महिलांसाठी काम करण्याचा निश्चय दृढ करत गेले.- महिलांनी ठरवलं तर अनेक छोट्या गोष्टी करून परिस्थिती बदलण्याची सुरुवात होऊ शकते हे खरं आहे.

-डॉ. स्मिता मोरे

माझे  वडील कृषी अधिकारी होते . मी त्यांना शेतकर्‍यांसाठी काम करताना पाहिलं आहे.  त्यामुळे  माझी  देखील इच्छा होती की युपीएससी करून शासकीय अधिकारी व्हावं आणि मराठवाड्यातील लोकांसाठी काही करावं.  युपीएससीसाठी पदवी अनिवार्य असल्यानं वडिलांच्या सल्ल्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे एमबीबीएसला प्रवेश घेतला. एमबीबीएसला असतानाच मोठ्या बहिणीच्या सल्ल्यानुसार मी निर्माणच्या शिक्षण प्रक्रियेत सहभागी झाले आणि तिथून माझ्या विचारांचं स्थित्यंतर सुरु झालं. निर्माणचं तिसरं शिबीर पूर्ण करता करता मला  माझ्या  आयुष्यातील हेतू काय हे स्पष्ट झालं होतं.


निर्माणने मला माझ्या आयुष्यातील ‘का’ शोधायला मदत केली. अगदी निर्माण शिबिराच्या प्रवेशासाठी असलेल्या मुलखतीपासून मी युपीएससीच्या स्वप्नाबद्दल स्वतःलाच प्रश्न विचारू लागले. अनेक प्रशासकीय मर्यादा सांभाळून लोकांच्या आयुष्यात गुणात्मक बदल घडवणं एक मोठं आव्हानच वाटत होतं.
आयुष्याला दिशा प्राप्त होत असताना माझ्या  मनात अजून एका गोष्टीबद्दल सल होती. ती गोष्ट म्हणजे स्त्रियांवर होणारा अन्याय, विशेषतः घरगुती हिंसाचार. माझ्या घरी परिस्थिती चांगली असली तरी मी लहानपणापासून आजूबाजूला घरगुती हिंसाचार पाहिला होता. लहानपणी जवळच्या व्यक्तीसोबत झालेली बाल लैंगिक छळाची घटना ऐकली होती. आणि माझ्या मावशीनं घरगुती हिंसाचाराला कंटाळून केलेली आत्महत्या या दोन घटनांनी माझ्यावर खोलवर परिणाम केला होता. पण त्यावर कधीच कुठे विस्तृत चर्चा झाली नाही. त्यातून पुरुषांबद्दल मनात प्रचंड चीड तयार झाली होती. परंतु 'निर्माण'मध्ये आल्यामुळे अशा समस्यांवर चर्चा करता आली. डॉ. अभय बंग यांनी मला माझी ऊर्जा पुरुषांचा द्वेष करण्याऐवजी महिलांसाठी काम करण्यावर खर्च करण्याचा मोलाचा सल्ला दिला. निर्माणमुळे माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. मला माझं आयुष्य कोणत्या कारणासाठी द्यायचं आहे ते समजलं.

स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी प्रभावीपणे करता येतो हे देखील मला निर्माणमध्येच समजलं. मला मराठवाड्यात शेतकर्‍यांसाठी काम करायचं असल्यामुळे निर्माणमधून मला आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची मुलाखत घेण्याचा एक टास्क देण्यात आलं होतं. परंतु त्या मुलाखतीतून असं समजलं की आरोग्य सुविधांचा आर्थिक भार पेलता न आल्यानेदेखील शेतकरी आत्महत्या करतात. एक डॉक्टर म्हणून मी या समस्येवर काय करू शकते याचा विचार मी करू लागले.
 याच दरम्यान, मला एमबीबीएसच्या विषयांमध्ये रुची निर्माण होऊ लागली. याशिवाय, गरोदरपणातील तब्बल ६० टक्के मृत्यू हे योग्य व वेळेत उपचार मिळाल्यास टाळता येऊ शकतात हे वास्तव अस्वस्थ करणारं होतं. विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत समाजाकडून होणारं अक्षम्य दुर्लक्ष मला एक डॉक्टर म्हणून माझी  भूमिका काय याचा विचार करण्यास भाग पाडत होतं. ग्रामीण भागात अपुर्‍या असलेल्या आरोग्य सुविधांमुळे लोकांचे होणारे हाल मला दिसले. इथे मी टाळता येणारे मृत्यू पाहिले. प्राथमिक आरोग्य सुविधाच लोकांना नीट मिळत नाही याचा अनुभव मला आला. विशेषकरून महिलांचे आरोग्याचे प्रश्न खूप गंभीर आहेत हे जाणवलं. निर्माणमध्ये मी माझ्या आयुष्यातले डॉटस कनेक्ट  करू शकत होते. एक डॉक्टर म्हणून मी महिलांच्या आरोग्यावर काम करावं असा विचार मी करू लागले.
औरंगाबाद येथेच इंटर्नशिप करताना येणारे अनुभव  माझा महिलांसाठी काम करण्याचा निश्चय दृढ करत गेले. मी स्वतः औरंगाबाद ते लातूर प्रवास करताना अनेकवेळा अनुभव घेतला होता की महिलांना सलग आठ ते दहा तास शौचालयाला न उतरता प्रवास करावा लागतो. आम्हालाही गरज लागू शकते किंवा त्रास होऊ शकतो याची पुसटशीदेखील कल्पना पुरुष सहप्रवाशांना असलेली मला दिसली नाही. शेवटी मी स्वतः गाडी थांबवून उतरायचा आग्रह करू लागले तशा गाडीतील इतर महिलांचा पाठिंबा मला मिळू लागला.
निर्माणमधे काम करताना महिलांवरील अन्याय, अत्याचारामुळे  त्यांना आरोग्याच्या बाबतीत काय किंमत मोजावी लागते याचाही अनुभव मला येत होता.


आमच्याकडे येणार्‍या महिला रुग्णांची अवस्था पाहून मी अस्वस्थ झाले. आम्हाला एका भाजलेल्या महिलेची केस आली होती. जवळपास संपूर्ण भाजलेली असताना देखील ती महिला आम्हाला मोबाइलवर तिच्यासोबत झालेली घटना रेकॉर्ड करायला सांगत होती कारण तिला तिच्या पतीनं जाळलं होतं. जेव्हा न्याय मिळवण्यासाठी जीवाची किंमत मोजावी लागते तेव्हा काय भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल हे महिलांना समजतं.  आम्ही तसे केले आणि  तिच्या पतीला शिक्षा देखील झाली. तशीच आणखी एक महिला रुग्ण होती जिच्या पतीनं तिला मारहाण केल्यामुळे तिच्या लिव्हरला जबरदस्त इजा झाली होती. स्त्रियांना समाजात असणारं दुय्यम स्थान, त्याच मानसिकतेतून होणारा अन्याय, मारहाण आणि  त्यांच्या आरोग्याविषयीच्या अत्यंत मूलभूत समस्या मला अस्वस्थ करत होत्या. या समस्या मला दिसत होत्या आणि  माझ्याकडे काहीतरी करण्याची क्षमता असल्यानं त्या समस्यांवर काम करणं हे मी माझं कर्तव्य समजू लागले. आणि   स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावर काम करायचं असा निश्चय मी केला.
एमबीबीएस झालेल्यांना एक वर्ष आरोग्य व्यवस्थेला द्यावी लागणारी सेवा (एमओशिप) मी गडचिरोलीला सर्च येथे जाऊन पूर्ण करायचे ठरवलं.  गडचिरोलीला जाण्यावरून घरात थोडे मतभेद झाले. पण माझे विचार स्पष्ट होते आणि निर्णय ठाम होता. कालांतरानं राहिलेला विरोधदेखील मावळला आणि माझ्या घरच्यांना माझा निर्णय पटला. आता मला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे.
आता माझा  पुढचा प्रवास देखील निश्चित झाला आहे.  पुढे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रमध्ये पोस्ट ग्रॅजुएशन करून ग्रामीण भागातील महिलांच्या समस्येवर मला काम करायचं आहे. समस्या माझ्यासमोर आहेत. माझ्या क्षमता आणि माझं कर्तव्य मला कळत असताना मी दुर्लक्ष कसं करू? मी चांगल्या घरात जन्मले आणि  माझ्या पालकांनी मला चांगलं शिक्षण दिलं याचा लाभ मला मिळाला. आता वेळ आहे की मी तो लाभ इतर स्त्रियांपर्यंत पोहोचवायला हवा. शौचालयासाठी गाडीतून उतरण्याची कृती असो किंवा भाजलेल्या महिलेचे मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करणे असो, ही दोन्ही पावलं छोटी होती पण त्यांचा परिणाम मोठा झाला. महिलांनी ठरवलं तर अनेक छोट्या गोष्टी करून परिस्थिती बदलण्याची सुरुवात होऊ शकते हे खरं आहे. त्याचा अनुभव मी घेतला आहे.


(स्मिता या गडचिरोली येथील सर्च संस्थेत मेडिकल ऑफिसर आहेत. )
(smita.more9197@gmail.com)

Web Title: ..So I became a doctor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.