भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज स्मृती मानधना ही तिच्या अक्रामक फलंदाजीसाठी जितकी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या शांत आणि सकारात्मक स्वभावासाठीही प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या मैदानावर तिच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार येत आहेत आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातही. कधी तिचा फॉर्म बिघडला तर कधी अपेक्षित धावा झाल्या नाहीत. कोणीही तिच्यावर टीका केल्या तर कोणी साथ सोडून गेले. पण या सगळ्यातून तिने केलेलं पुनरागमन म्हणजे खऱ्या अर्थाने मानसिक ताकदीचा नमुना आहे. तिला पाडून 'कमबॅक असावा तर असा' असे म्हणावेसे वाटते. तिच्या मुलाखतींमध्ये ती कामच हसत आणि सकारात्मक असते.
अशाच एका ऑनफिल्ड मुलाखतीत स्मृती हसत म्हणाली होती, " खरं सांगू का? माझ्या नावाचा अर्थ आठवण किंवा स्मरणशक्ती असा असला तरी माझ्या काहीच लक्षात राहत नाही. मी गोष्टी पटकन विसरुन जाते. लोकं म्हणतील किती विरोधाभास आहे पण एका अर्थी विसरण्याची सवय चांगलीच म्हणावी. कारण कितीही वाईट अनुभव आले तरी मी रात्री निवांत झोपते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्रेश असते" तिचं हे विधान वरवर पाहता साधं वाटतं, पण त्यामागे मोठा मंत्र दडलेला आहे. खेळाडू म्हणून प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करायची इच्छा असली तरी एखादा दिवस खराब जातोच, एखादी इनिंग अपयशी ठरतेच. त्याचा विचार मनात ठेवून पुढच्या सामन्यात उतरलं तर आत्मविश्वास कमी होऊ शकतो. स्मृतीने हे ओळखलं. त्यामुळे ती अपयशातून शिकते, पण त्यात अडकून राहत नाही.
तिने स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला. जुने सामने, चुकलेल्या संधी किंवा झालेली टीका मनात साठवून ठेवली नाही. प्रत्येक सामना तिने नव्या सुरुवातीसारखा खेळला. परिणामी पुन्हा मोठ्या धावा, महत्त्वाच्या खेळी आणि संघासाठी निर्णायक योगदान तिच्याकडून पाहायला मिळालं. तिचं पुनरागमन केवळ आकडेवारीत मोजण्यासारखं नाही, तर ते मानसिक स्थैर्याचं प्रतीक आहे.
बीत गई सो बात गई असं वागता येणं म्हणजे ताकद आहे. या विचारातून एक स्पष्ट संदेश मिळतो की भूतकाळ कायम मनात ठेवणं नेहमीच फायद्याचं नसतं. चुका लक्षात ठेवून त्यातून शिकणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःला माफ करुन पुढे जाणं अधिक महत्त्वाचं आहे. आयुष्यातही अनेकदा आपण जुन्या गोष्टी, अपयश किंवा इतरांनी केलेली टीका मनात साठवून ठेवतो आणि त्यामुळे पुढची पावलं उचलताना संकोच करतो. स्मृतीचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे, ती प्रत्येक दिवसाला नवी संधी मानते. असंच कायम सकारात्मक राहता आलं पाहिजे.
