सध्याच्या जगात कोणतेही नाते बघा, ते फार काळ टिकत नाही. नात्यात वाद विवाद होऊ शकतात पण संवादाची जागा विसंवादाने घेतली की नाते तुटते, दुरावते, देहाने आणि मनानेही! यामागे कारण काय असू शकते? तर अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनी खऱ्या नात्याची इमारत ज्या भक्कम पायावर उभी असते त्याच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. कोणत्या ते जाणून घेऊ.
प्रेम हे केवळ नवरा बायकोच्या नात्यात नाही तर इतर कोणत्याही नात्यात असू शकते, नव्हे तर ते असलेच पाहिजे. मायेचा, जिव्हाळ्याचा ओलावा त्यात नसेल तर नाते फार काळ टिकणार नाही. मुळातच नात्याचा पाया स्वार्थ असेल तर नात्याची एक्स्पायरी डेट ठरली आहे हे समजून जा. स्वार्थ साधला की नाते संपुष्टात येणारच! मात्र नाते तेव्हाच टिकते जेव्हा त्यात पुढील तीन गोष्टी असतात-
समर्पण : महाराजांच्या मते, खरे प्रेम ते आहे ज्यात तुम्ही दुसऱ्याच्या उणिवा, चुका आणि कमकुवतपणा स्वीकारून त्याच्या बरोबर राहता. त्याला आपले मानता. त्याच्या सवयी, स्वभावासकट त्याला आपले मानता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर खऱ्या अर्थाने प्रेम करता.
निरंतरता : प्रेमानंद महाराज म्हणतात, सच्चा प्रेमाचा भाव तात्पुरता, क्षणिक असू शकत नाही. प्रेम निरंतर असावे लागते. केवळ सुखाच्या क्षणी जवळ येणे आणि संकटाच्या, अडचणीच्या काळात त्या व्यक्तीला दूर लोटणे, याला प्रेम म्हणत नाहीत. खरे प्रेम स्थिर असते, निरंतर असते.
निःस्वार्थता : प्रेमाचे तिसरे लक्षण म्हणजे निस्वार्थीपणा, जिथे माणूस आपल्या प्रियकराच्या आनंदात स्वतःला विसरतो. स्वतः आधी त्याच्या प्रेमाचा विचार करतो. महाराज म्हणतात, की खरे प्रेम आत्मसमर्पणाच्या पातळीवर पोहोचते आणि स्वार्थ आणि अपेक्षांपासून मुक्त असते. देवाप्रती भक्तीचा मार्ग देखील या निःस्वार्थ प्रेमातून जातो. जर आपण आपल्या नातेसंबंधांमध्ये हे ३ गुण अंगीकारले तर वैयक्तिक जीवनात आणि अध्यात्मात संतुलन राखता येईल.
जो आत्म्याला ओळखतो तोच खरा प्रेम करू शकतो. प्रेमानंद महाराजांच्या मते, आजकाल ज्याला बरेच लोक प्रेम म्हणतात ते प्रत्यक्षात आसक्ती किंवा स्वार्थाचे एक रूप आहे. महाराज स्पष्ट करतात की, जोपर्यंत एखादी व्यक्ती तुमच्या दिसण्याने, क्षमतेने किंवा सुविधांनी खूश असते तोपर्यंत तो तुमच्यावर प्रेम करण्याचा आव आणतो. परंतु परिस्थिती प्रतिकूल होताच तीच व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या प्रवचनात म्हटले - 'जो तुम्हाला ओळखत नाही तो तुमच्यावर प्रेम कसे करू शकतो?' या विधानामागे एक खोल आध्यात्मिक समज आहे. खरे प्रेम केवळ अशा व्यक्तीद्वारेच केले जाऊ शकते जो तुमच्या आत्म्याला ओळखतो, फक्त शरीर किंवा बाह्य गुणांना नाही.
देव हाच खरा प्रेमी आणि मित्र आहे:
प्रेमानंद जी महाराज असेही सांगतात की या जगात असा एकच साथीदार आहे जो आपल्यावर खऱ्या निस्वार्थ भावनेने प्रेम करतो आणि तो स्वतः देव आहे. तो आपले गुण किंवा आपले दोष पाहत नाही. आपल्या सर्वात मोठ्या गुन्ह्यावरही त्याचे प्रेम कमी होत नाही. ते म्हणतात की, 'देव आपल्या शरीरावर नाही तर आपल्या अस्तित्वावर प्रेम करतो.' महाराज तरुणांना हा संदेश देतात की जेव्हा सर्व नाती तुटतात तेव्हा देवाचा सहवास जीवनाचा सर्वात मोठा आधार बनतो. म्हणूनच, जीवनात खरे समाधान आणि प्रेम केवळ देवाशी जोडल्यानेच शक्य आहे.