Join us

नवरात्र स्पेशल : शांतपणे आपणच डोकवून पाहूया की आपल्या भावनाविश्वात; कदाचित नव्याने उलगडतील काही गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 09:55 IST

Navratri 2022 Special How to Become Calm an Quiet : तळ्याकाठी बसून पाण्यात पोहणाऱ्या स्वतःकडेच बघितल्यासारखं स्वतःच्या भावनांना बघायला शिकूया

ठळक मुद्दे एखाद्या वेळी, एखादी भावना नियंत्रणात आणता येणार नाही, हे सुद्धा मान्य करायला हवं. तळ्याकाठी बसून पाण्यात पोहणाऱ्या स्वतःकडेच बघितल्यासारखं स्वतःच्या भावनांना बघायला शिकू.

सुचेता कडेठाणकर 

गेले ८ दिंवस आपण ८ वेगवेगळ्या भावनांबद्द्ल थोडा विचार केला. सर्व भावना महत्वाच्या, कोणतीच भावना निरुपयोगी नाही हा विचार महत्वाचा. आपण भावनांबद्दल विचार करायला लागलो की लगेचच आपण भावनेच्या ओघात वाहत न जाता, तिच्याकडे विवेकी दृष्टीने बघायला लागतो. योगाभ्यासात हा सद्सद्विवेक खूप महत्वाचा आहे. सत् - असत् विवेक याचा अर्थ काय? सत्- म्हणजे “आहे”आणि असत् - म्हणजे “नाही”.सत्-असत् विवेक म्हणजे नक्की ही भावना काय आहे आणि काय नाही याचा अर्थ उमगणं. नाहीतर, अनेकवेळा साधी काळजी वाटत असते पण आपण ती भीतीच्या पातळीवर नेऊन तिची तीव्रता वाढवतो आणि मग ताण निर्माण होतो (Navratri 2022 Special How to Become Calm an Quiet).

(Image : Google)

या ताणाच्या विरोधी भावना आहे, शांततेची. ही भावना समजून घेताना असा विचार करुन बघू -

१. गोंधळातून बाहेर पडण्यासाठी शांतता हवी आहे, असं नसतं. मुळात आपलं मन शांतच असतं. आपण जन्माला येताना काही अस्वस्थ जन्माला येत नाही. पण जगाशी संपर्क आला की, आपला प्रतिसाद ज्या मनोभूमिकेमधून दिला जातो, त्यामुळे अस्वस्थता येते. म्हणजे, पहिला मुद्दा असा की आपण स्वभावतः शांतच असतो. अस्वस्थता निर्माण होते. आपण स्वभावतः अस्वस्थ आहोत आणि आता आपल्याला शांततेचा शोध घ्यायचा, असं नसतं.

२. शांततेची ही भावना आपल्याला आजूबाजूच्या परिसरात शांतता निर्माण करुन मिळणार नाही. काही काळ शांत परिसरात जाऊन राहिल्यामुळे कदाचित शांत भावनेचा अनुभव येईलसुद्धा. पण ती शांतता टिकणारी नसेल. कारण त्या शांततेचा आधीर आपल्या बाहेर असेल. 

३. गेले आठ दिवस आपण ज्या भावनांचा विचार केला, त्यांचे नियोजन करायला शिकणं म्हणजेच एक प्रकारे आपल्या मूळच्या शांतता, समाधानी स्वभावातकडे जाणं. 

(Image : Google)

४. या सर्व भावनांचं नियोजन करताना, आपल्याला हे एका फटक्यात जमायला हवं असा हट्टाग्रह सोडणं सर्वात महत्वाचं. एखाद्या वेळी, एखादी भावना नियंत्रणात आणता येणार नाही, हे सुद्धा मान्य करायला हवं. पण ते एकदा जमलं नाही, म्हणून निराश होऊन दुसऱ्या वेळी प्रयत्नच करायचा नाही, असं मात्र करायचं नाही. 

आंखे मूंद किनारे बैठो, मन के रक्खे बंद किवाडया प्रमाणे, तळ्याकाठी बसून पाण्यात पोहणाऱ्या स्वतःकडेच बघितल्यासारखं स्वतःच्या भावनांना बघायला शिकू. कल्पना करुन बघा, शांततेचा अनुभव येऊ लागेल.

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)

sucheta@kohamschoolofyoga.com

 

टॅग्स :मानसिक आरोग्यनवरात्री