lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा ! - असं सांगूनही 'तो' कुकरच्या शिट्ट्या मोजतच नाही कारण..

तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा ! - असं सांगूनही 'तो' कुकरच्या शिट्ट्या मोजतच नाही कारण..

mental load - ‘त्याला’ सांगितलेलं साधंसं कामही तो धड करत नाही, स्वत:हून जबाबदारी घेऊन काम करणं तर दूरच. मग ती कटकट नाही करणार? तर काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 01:14 PM2021-05-13T13:14:55+5:302021-05-13T13:31:51+5:30

mental load - ‘त्याला’ सांगितलेलं साधंसं कामही तो धड करत नाही, स्वत:हून जबाबदारी घेऊन काम करणं तर दूरच. मग ती कटकट नाही करणार? तर काय करणार?

mental load- managing kids, house work-cooking, and problem wigh devision of work. | तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा ! - असं सांगूनही 'तो' कुकरच्या शिट्ट्या मोजतच नाही कारण..

तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा ! - असं सांगूनही 'तो' कुकरच्या शिट्ट्या मोजतच नाही कारण..

Highlights तुम्ही ऑफिसमध्ये असं ‘एखादं’ काम विसरत नाही. तिथे तुमचा परफॉर्मन्स मोजून घ्यावा असा असतो. मग हे घरातलं ‘एखादं’ काम नीट का करू शकत नाही?

गौरी पटवर्धन

‘एखादं’ काम विसरलं तर घरातल्या बायका त्यावरून इतकी कटकट का करतात?
याचं सरळ आणि थेट उत्तर म्हणजे पुरुषांना मुळात घरातलं ‘एखादंच’ काम सांगितलेलं असतं.ते ‘एखादं’ काम आपणहून करण्याचं नवऱ्याला किंवा मुलाला सुचलेलं नसतं, तेही तिने सांगितलेलं असतं. त्यावाचून तिची पुढची कामं अडणार असतात, आधीच घरातल्या न संपणाऱ्या कामांमध्ये अजून काही कामांची भर पडणार असते. एक सिमला मिरची बाजारातून आणायला नवरा विसरला तर तिचं एवढं काय अडलेलं असेल बरं सिमला मिरचीवाचून? तर तिने सकाळी मुलांना न आवडणारी पण पौष्टिक कुठलीतरी भाजी केलेली असते, दुपारी मुलांच्या इन्स्टंट नूडल्सची मागणी फेटाळून लावलेली असते, दिवसभर मुलांना अभ्यासाला बसवलेलं असतं, त्याचवेळी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे दिवसभर ऑफिसची कामं केलेली असतात, त्यामुळे तिला मुलांचे लाड करायला किंवा त्यांच्याशी खेळायला वेळ झालेला नसतो. मग आई नुसतीच अभ्यासाला बसवते, आमच्या मनासारखं काहीच करत नाही असं म्हणून मुलं तिच्यावर नाराज असतात, सासू सासऱ्यांना दिवसभर सून दिसते, पण ती तिच्या तिच्या कामात असल्याने त्यांची काहीतरी तक्रार असते. या सगळ्याचं सगळ्यांना आवडणारं एक उत्तर म्हणून तिने रात्री पावभाजी आणि पुलाव करणार असल्याचं जाहीर केलेलं असतं. त्यामुळे सगळ्या आघाड्यांवर शांतता प्रस्थापित झालेली असते. ती घरात बघते तेव्हा बाकी सगळ्या भाज्या घरात असतात, फक्त सिमला मिरची नसते. आता सिमला मिरचीशिवाय पावभाजी आणि तवा पुलाव कसा करणार म्हणून ती ‘अहोंना’ विचारते की “ऑफिसमधून येतांना सिमला मिरची आणाल का?”
‘अहोंनी’ मोठ्या जोरात होकार कळवलेला असतो.
तरी त्यावर तिने ‘नक्की आणा, विसरू नका’ असं बजावलेलं असतं.
त्यावर ‘अहोंनी’ अजून स्मार्ट काहीतरी उत्तर दिलेलं असतं.

त्या भरवशावर तिने ढीगभर कांदा टोमॅटो चिरून ठेवलेला असतो. बटाटे आणि इतर भाज्या उकडून ठेवलेल्या असतात. तांदूळ भिजवून ठेवलेले असतात, घरासमोरच्या बेकारीतून पाव आणून ठेवलेले असतात. आणि मग…
मुद्दलात उशिरा आलेले ‘अहो’ शांतपणे सांगतात की ‘मी सिमला मिरची आणली नाही. कारण मी जाईपर्यंत बाजार बंद झाला होता.’
यावर सकाळी सहा वाजल्यापासून स-त-त कामात असणाऱ्या बायकोने शांतपणे ते समजून घ्यावं अशी त्यांची अपेक्षा कशी काय असू शकते? बरं, तिने अगदी समजूतदारपणा दाखवायचा ठरवला, तरी त्या कांदा टोमॅटोच्या ढिगाचं काय करायचं? उकडलेले बटाटे कामी येतात एकवेळ, पण फ्लॉवर, कोबी, गाजर, मटार या शिजवून ठेवलेल्या आणि पुलावासाठी चिरून ठेवलेल्या भाज्यांचं काय करायचं?
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना केलेल्या पावभाजीच्या प्रॉमिसचं काय करायचं? ऐनवेळेला तितकं इंटरेस्टिंग काय खायला करायचं? आणि ‘अहो’ ‘एखादं’ काम विसरले म्हणून तिने हे सगळं का करायचं?
जी कथा सिमला मिरचीची तीच कथा उतू गेलेल्या दुधाची!
‘माझ्या हातून दूध उतू गेलं ना? मी सगळा ओटा धुवून देतो… मग तर झालं?’ या पश्चात-समजूतदारपणाचा कधीच उपयोग होतांना दिसत नाही. आणि मग मी घातलेला घोळ मी निस्तरून देतोय तरी हिला त्यावरून कटकटच करायची असते असा ग्रह नवरेमंडळी किंवा मुलं करून घेतात. कारण या पश्चात-समजूतदार ऑफरवर सामान्यतः “काही नको. केलात तेवढा वाढवा पुरे आहे. मी बघते काय करायचं ते! अजून डोक्याला ताप नकोय माझ्या…” असं तिखट उत्तर मिळतं. त्याचा तिखटपणा झोंबतो, पण हे कळत नाही की तुम्ही दिलदारपणे जो ओटा धुवून देऊ करताय तो ऐन कामाच्या वेळात आहे. बायकोने तुम्हाला दुधाकडे लक्ष द्यायला सांगितलं त्यावेळी स्वयंपाकघरात काय परिस्थिती होती?
कणिक मळून ठेवलेली असते, एकीकडे भाजी फोडणीला टाकलेली असते, दुसऱ्या गॅसवर दूध तापायला ठेवलेलं असतं, आणि तिसरा गॅस असेल तर त्यावर कूकर ठेवलेला असतो. गॅसवरचे सगळे पदार्थ व्हायला अजून पाचेक मिनिटं लागतील तेवढ्यात बायको मुलाचं शाळेचं दप्तर किंवा स्वतःची ऑफिसला जाण्याची पर्स भरून ठेवायला गेलेली असते. तुम्ही मोबाईल घेऊन ओट्यापाशी उभे राहता आणि तुमच्या समोर दूध उतू जातं.
आता अशा वेळेला तुम्ही तो ओटा धुणार म्हणजे किमान दहा पंधरा मिनिटं लागणार. सकाळच्या गडबडीत तिच्याकडे अशी उधळायला पंधरा मिनिटं असती, तर तिने तुम्हाला ओट्याशी कशाला उभं केलं असतं? शिवाय दूध उतू जातं म्हणजे वरची साय उतू जाते. एक लिटर दुधावरची साय वाया गेली तर पुढचं सायीच्या विरजणाचं आणि लोणी-तुपाचं गणित बिघडतं.
‘तीन शिट्ट्या झाल्यावर कूकर बंद कर.’ ही जगातली सगळ्यात सोपी सूचना आहे… द्यायलाही आणि पाळायलाही! पण कधी? जेव्हा आपलं कूकरच्या शिट्ट्यांकडे लक्ष असतं तेव्हा. समजा तीन ऐवजी पाच किंवा सहा शिट्ट्या झाल्या तर काय बिघडतं?
तर संपूर्णतः कूकरमध्ये शिजायला काय ठेवलेलं आहे आणि त्याचा पुढे काय पदार्थ बनवायचा आहे यावर अवलंबून आहे. कूकरमध्ये बटाटे असतील आणि त्याची भाजी करायची असेल आणि तुम्ही तीनच्या ऐवजी पाच शिट्ट्या केल्या, तर ते बटाटे गाळ शिजतात. मग त्यांची भाजी कशी करणार? किंवा उसळ असेल आणि जास्त शिट्ट्या केल्या तर ती गाळ शिजते. भात मऊ होऊन जातो. डाळ पाण्यात एकजीव होऊन जाते. अशा तांदुळाचा पुढे जिरा राईस करायचा प्लॅन असेल तर? दालफ्राय साठी डाळ शिजलेली, पण न मोडलेली हवी असेल तर?
तुमच्या ‘एखादं’ काम नीट ना करण्याने तुम्ही स्वयंपाकाची सगळी लाईन बिघडवून टाकता. आणि ते तुम्ही का करता? कारण तुमचं त्या ‘एखाद्या’ कामाकडे पुरेसं लक्ष नसतं. कारण तुम्ही ऑफिसमध्ये असं ‘एखादं’ काम विसरत नाही. तिथे तुमचा परफॉर्मन्स मोजून घ्यावा असा असतो. मग हे घरातलं ‘एखादं’ काम तुम्ही नीट का करू शकत नाही?
ते फार अवघड असतं का?
तर नाही...
तुम्ही ते करू शकत नाही, कारण तुम्ही त्या कामाचा, त्या कामाबद्दल विचारच करत नाही.
आणि मग त्यावर कटकट चिडचिड ती करते, कारण तिचा मेण्टल लोड वाढलेला असतो..

(लेखिका पत्रकार आहेत.)

Web Title: mental load- managing kids, house work-cooking, and problem wigh devision of work.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.