Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > ऐन सणावारी घरात कचकच? वाद-भांडणं-रुसणे-चिडणे आनंदाच्या क्षणी कसे टाळाल?

ऐन सणावारी घरात कचकच? वाद-भांडणं-रुसणे-चिडणे आनंदाच्या क्षणी कसे टाळाल?

दिवाळी असो की दसरा किंवा ईद की ख्रिसमस.. ऐन सणावारी घरात वाद भांडणं कशामुळे होतात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2025 18:40 IST2025-10-30T18:38:40+5:302025-10-30T18:40:30+5:30

दिवाळी असो की दसरा किंवा ईद की ख्रिसमस.. ऐन सणावारी घरात वाद भांडणं कशामुळे होतात ?

Is there a lot of tension in the house during the festive season? How do you avoid arguments, fights, anger, and irritation in moments of joy? | ऐन सणावारी घरात कचकच? वाद-भांडणं-रुसणे-चिडणे आनंदाच्या क्षणी कसे टाळाल?

ऐन सणावारी घरात कचकच? वाद-भांडणं-रुसणे-चिडणे आनंदाच्या क्षणी कसे टाळाल?

Highlightsमुद्दा आहे मनुष्य स्वभावाचा. जो कधीही पूर्ण समाधानी तृप्त नसतो. ऑनलाइन कोर्स किंवा चार दिवसांचे शिबिर यातून मनशांती मिळत नाही.

शुभा प्रभू साटम (खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक)

दिवाळी झाली. सोशल मीडियात तरुण मुलांच्या अनेक पोस्ट दिसल्या. काही विनोदी की बाकीच्यांची दिवाळी कशी हसरी, आनंदी अशी आणि माझ्या घरात दिवाळीत भांडणं, कटकट, क्लेश ! काही मुलांनी चक्क पोस्ट केलं की पालक अशा सणावेळी इतके भांडतात की वाटते नको हे सण.
दिवाळी, ख्रिसमस, थँक्स गिव्हिंग, ईद अशा सणावारी अनेक घरात वाद होतात. जवळपास ८०% घरात वाद होतात आणि वातावरण बिघडून जाते. रुसवे, फुगवे, भांडणं दिसतात. मग प्रश्न उरतो का ?
सणावारी इतके ताणतणाव का ?
तर सर्वांत आधी पूर्ण आनंद, सणाचा आनंद, एकत्र येणे, हसणे, दिवस घालवणे यातून मनाला आनंद मिळतो हे पूर्ण मिथक आहे. प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या जाहिराती, समाज माध्यमावर दिसणाऱ्या चकमकीत पोस्ट्स यातून हुशारीने रुजवलेला विचार आहे.


साधे लक्षात घ्या, अगदी ३०/३५ वर्षे आधी इतका संपर्क नव्हता. पत्र, फोन आणि वर्तमानपत्र इतकेच. कॅमेऱ्याने कधीतरी फोटो काढले जायचे. एकत्र येऊन उत्सव हा आनंद होता.
आता कढईत रवा भाजायला घेतला ते कसा लाडू खाल्ला इथंपर्यंत सर्व सर्वांना कळते. अमूकने वाहन घेतले, तमूकने घरचे इंटिरिअर केले, हिने पैठणी घेतली, तिने शालू, याने आयफोन आणला, त्याने नवे प्ले स्टेशन, याच्या दारात इतकी रोषणाई, त्याच्या घरावर इतकी तोरणे, याच्या घरात इतका फराळ, त्याच्याकडे इतकी मिठाई... यादी खूप मोठी.
आणि नकळत मग आपण कुठे आहोत या सर्वांत असा विचार मूळ धरतो. त्याला FOMO असे नाव आहे. घराघरात हा फोमो वाढला.
आणि हे फक्त हिंदू सणात असते असे नाही, सर्वधर्मीय सणात पण असते. नाताळ काळात आत्महत्या वाढतात, नैराश्य, उदासीनता येते. सत्य आहे.
त्यात कामाचा ताण, संवाद कमी, वाद वाढले यातून अनेक घरात सणावारी तणाव वाढलेला दिसतो.
अगदी दहा वर्षे आधी जी जीवन शैली होती तिचा आता मागमूस दिसत नाही. दिसते ते सर्व चकचकीत छान छान लख्ख प्रकाशाचे वैभव दाखवणारे आयुष्य आणि ते पण दुसऱ्याचे. साठेक वर्ष आधी म्हणजे माझ्या लहानपणी दिवाळी म्हणजे नवे कपडे आणि फराळ हे समीकरण होते. नंतर मग हळूहळू खूप फटाके घेणे आले, नंतर मग नवे वाहन, दागिने घेणे, मग नवी वास्तू अथवा तत्सम. मग दिवाळी वेळी होणारे प्रदूषण नको म्हणून बाहेरगावी जाणे आले, नकळत दिवाळी बदलली. दुसऱ्यांचे झगमगीत आयुष्य उठता बसता दिसू लागले, वर्तमानपत्रातून जाणवू लागले. राजाला रोजची दिवाळी हे आज अनेकांच्या बाबतीत खरे ठरू लागले आहे.
एक बघा, सण येणार हे आता जाहिराती सांगतात. कोणताही सण असो, खरेदी करून सण साजरा करा हे इतके बिंबवले जाते की विचारता सोय नाही. आपण नकळत त्यात गुंतून जातोय, आपल्याला खंत वाटू लागते आहे की मी यात कुठे आहे ? आनंद खरेदीशी जोडला जातोय.


आणि नेमके हेच कारण असते सणादिवशी प्रसंगी होणाऱ्या वाद विवादाचे. त्यांची मुले बघा कशी आईबाबांना भेट देतात, त्यांच्या घरातील बघा कशी सर्व कामे एकत्र करतात, आमच्याकडे मी मरायचे. हिला अशी ओवाळणी मिळाली, त्याला इतका बोनस, त्याने हे घेतले तिने ते खरेदी केले. बातम्या येत राहतात आणि नकळत ताण साचत जातो.
आता स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम होताहेत, आपल्या हक्काबद्दल जागरूक, त्यांच्या आज्याआयांनी जे कर्तव्य, संस्कृती, ओझे बिनबोभाट वाहिले होते त्याला सरळ नाकारू लागल्यात, पण पुरुष मात्र अजून आई करायची तो फराळ आणि बायकोने सर्वांशी नम्र वागावे, रीत सांभाळावी या विचारात अडकून राहिलेत. सर्व नाही पण अनेक. लहान म्हणजे साधारण १०/१५ वर्षांच्या मुलांचे भावविश्व कुठल्याकुठे विस्तारित झाले आहे. मुले बघतात त्यांचे मित्र-मैत्रिणी बाहेर फिरायला जातात, पालक भरपूर भेटी देतात आणि नकळत तुलना सुरू होते. मी वर्षभर आई-बाबांना सांभाळतोय; पण केंद्रस्थान मात्र वर्षातून एकदा येणाऱ्या भावंडांना. गावाकडील मुलगा सून असाच विचार करतात आणि अपरिहार्य वाद, भांडणे आणि हे जगभरात होते. फक्त भारतात नाही.
थोडक्यात काय की पूर्वी ज्या गोष्टींनी आनंद व्हायचा त्या आता तितक्याशा आकर्षक वाटत नाहीत. पूर्वी करंजी चकली फक्त दिवाळीत असायची आज कोपऱ्याकोपऱ्यावर मिळते.
एक लक्षात घ्या मला आमच्यावेळी असे उमाळे बिलकुल काढायचे नाहीत. एक करंजी चारजण खायचो आणि एक फटाका दहाजण उडवायचो अशी रडगाणी मला बिलकुल आवडत नाहीत.
मुद्दा आहे मनुष्य स्वभावाचा. जो कधीही पूर्ण समाधानी तृप्त नसतो. ऑनलाइन कोर्स किंवा चार दिवसांचे शिबिर यातून मनशांती मिळत नाही. आधीच दैनंदिन आयुष्यात कटकटी अडचणी ताणतणाव भरपूर असतात. माणूस थकत चाललाय, हताश होतोय, दमून जातोय. एक टप्प्यावर सारे असह्य होते आणि मग वाद वाढतात. ताणही वाढतात.

ही कोंडी कशी फोडायची ?

१. गरजा आणि चैन यात स्पष्ट निवड करून आपल्या आयुष्याचे प्राधान्य ठरवून, कुटुंबात स्पष्ट संवाद साधून !
२. शंभर टक्के सुखी कोणीही नसते. आपल्याला जे दिसते किंवा दाखवले जाते ते खरे नसते.आभास आणि वास्तव यातील फरक ओळखायला हवा.
३. दुसऱ्याच्या घरावरील झगमगीत रोषणाई बघून खट्टू होण्यापेक्षा आपल्या घरातील पणती आणि फराळ आणि जीवाभावाची माणसं मोलाची.

 

Web Title : त्योहारी झगड़ों से बचें: उम्मीदों को प्रबंधित करें, तुलना नहीं, खुशी पर ध्यान दें।

Web Summary : त्योहारी झगड़े सोशल मीडिया की तुलनाओं से प्रेरित अवास्तविक अपेक्षाओं से उपजे हैं। परिवार को प्राथमिकता दें, इच्छाओं को प्रबंधित करें, और पहचानें कि खुशी भौतिक संपत्ति के बारे में नहीं है। वास्तविक कनेक्शन पर ध्यान दें।

Web Title : Avoid festive fights: Manage expectations, focus on joy, not comparisons.

Web Summary : Festive fights stem from unrealistic expectations fueled by social media comparisons. Prioritize family, manage desires, and recognize that happiness isn't about material possessions. Focus on genuine connections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.