मंगला पोखरे (समूपदेशक)
अलकाला सतत स्वतःचे फोटो काढायला फार आवडतात. तशी तिला फोटोग्राफीची काही आवड नव्हती, पण गेल्या काही वर्षांत तिचा सोशल मीडियावरचा वावर वाढला आणि स्वत:चे अनेक फोटो ती अपलोड करू लागली. मग नवऱ्यासह, फिरायला गेल्याचे, हॉटेलात जेवणाचे, घरच्या पदार्थांचे, मुलांचे, साड्यांचे
दणादण फोटो काढून अपलोड करणं सुरू ! त्यातही सेल्फीचं वेड फार. दणादण रोजच सेल्फी. आता यात चूक काय, आवडतं ते करण्याचं स्वातंत्र्य तर सर्वांनाच आहे. तिच्या या सवयीचा कुणाला काही त्रासही होत नव्हता.
मात्र अलका काही दिवसांनी अत्यंत चिडचिडी झाली. ती प्रत्येक गोष्टीवर नाराज नाखुश दिसू लागली. ज्यात त्यात तिला चुका दिसत. जवळचे नातेवाईक मैत्रिणी यांच्यावरही ती नाराज असे. थोडक्यात तिच्या मनानं हळूहळू असं गृहित धरलं की आपल्याला चांगलं म्हणायची बाकीच्यांची तयारीच नसते. असं का झालं?
चुकलं कुठं? काय?
१. हळूहळू अलकाला प्रत्येक गोष्टीत फोटो दिसू लागला. दिवसातून कित्येक सेल्फी नी फोटो काढले जाऊ लागले ते अपलोडही होऊ लागले.
२. सोशल मीडियात आपल्या फोटोंना किती लाइक, कमेंट येतात हे मोजण्याचा चाळा लागला.
३. आपले कौतुक कुणीतरी करावं असं वाटणं गैर नाही, पण त्यासाठीच सतत काहीतरी करत राहणं. आणि कौतुक केलं नाही कुणी की चिडणं, रागावणं, स्वत:ला त्यावरच जोखणं अत्यंत गैर.
४. आपले फोटो पाहून आपल्याला अपेक्षित कौतुक झालं नाही तर असुरक्षित वाटत असेल तर फारच धोकादायक.
५. यासगळ्यात प्रश्न असतो तो आपल्या प्रायव्हसीचा, आपण आपला किती खासगी तपशील जाहीर करणार, स्वत:ला विचारा.
६. सोशल मीडियात मिळणारं अटेंशन आणि त्यानं होणारा आनंद हेदेखील एकप्रकारचं व्यसनच आहे. त्या व्यसनाची चटक आपला तिथला वेळ वाढवत नेते.
७. आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी संवाद कमी होऊन व्हर्च्युअल जगातलाच वावर वाढला असेल तर मात्र ती धोक्याची घंटा समजावी.
८. महिला-पुरुषच नाही तर वयात येणाऱ्या मुलांच्या बॉडी इमेजचे प्रश्नही त्यातून तयार होत आहेत.