Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > आजी-आजोबा हरवले तर, शोधणार कसं? विस्मरणाचा त्रास असलेल्या आजीआजोबांना मदत करणारा उपाय

आजी-आजोबा हरवले तर, शोधणार कसं? विस्मरणाचा त्रास असलेल्या आजीआजोबांना मदत करणारा उपाय

ज्येष्ठ नागरिक-स्मृतिभ्रंशाचा त्रास असलेल्या व्यक्ती यांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:18 IST2025-12-03T16:49:25+5:302025-12-03T20:18:32+5:30

ज्येष्ठ नागरिक-स्मृतिभ्रंशाचा त्रास असलेल्या व्यक्ती यांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यकच!

If grandparents are lost, how do you find them? A solution to help grandparents with forgetfulness | आजी-आजोबा हरवले तर, शोधणार कसं? विस्मरणाचा त्रास असलेल्या आजीआजोबांना मदत करणारा उपाय

आजी-आजोबा हरवले तर, शोधणार कसं? विस्मरणाचा त्रास असलेल्या आजीआजोबांना मदत करणारा उपाय

भक्ती बिसुरे

पुण्यातील एक वृद्ध आजी हरवल्याची माहिती सोशल मीडियात बरीच व्हायरल झाली. त्या आजींना डिमेन्शिया असल्याची चर्चा त्यावेळी झाली. त्यांना डिमेन्शिया होता की नव्हता हे निश्चित कळले नाही, पण त्यानिमित्ताने ज्येष्ठांना होणाऱ्या या त्रासाविषयी मात्र बोलले पाहिजे. काही कारणाने घराबाहेर पडल्यावर पुन्हा घरी जायचे तर घर न सापडणे, आपले नाव किंवा पत्ता नीट सांगता न येणे, कुटुंबियांना फोन करायचा असेल तर फोन नंबर पाठ नसणे किंवा न आठवणे आणि बाहेर पडल्यानंतर गर्दी, वाहनं, ट्रॅफिक या गदारोळाने गोंधळून जाणे अशा अनेक कारणांमुळे घरी परतता न येणे, पर्यायाने भरकटणे हे अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडते. वृद्ध माणसे, स्मृतिभ्रंश किंवा इतर तत्सम विकार असलेल्या व्यक्तींना हा त्रास जास्त होतो.

अशावेळी त्यांना कुणाची योग्य मदत किंवा दिलासा मिळाला नाही तर संभ्रम वाढतो. त्यांचे घरी परतणे लांबते. कुटुंबातील व्यक्तींना त्यांचा शोध घेणे अवघड होते. तो शोध लागेपर्यंत हरवलेल्या व्यक्तीला तसेच कुटुंबाला मनस्तापही होतो. हरवलेल्या व्यक्तीचा माग वेळेत काढता आला नाही तर त्यातून काहीतरी वेडेवाकडे होऊन बसण्याचे प्रकारही होतात.

कुटुंबात विस्मरण, अल्झायमर, डिमेन्शियासदृश आजाराचे रुग्ण असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना घराबाहेर जाऊ न देणे, थोडक्यात त्यांना घरातच बंदिस्त ठेवणे हा एकमेव उपाय आहे, असे सल्ले संबंधित कुटुंबियांना दिले जातात. हे सल्ले देण्यामागची भावना चांगली असली, तरी तो सल्ला प्रत्यक्षात आणणे मात्र कर्मकठीण असते. घरातील नोकरदार मंडळी कामानिमित्त बाहेर पडतात. केअरटेकर ठेवणे शक्य नसेल तर अशावेळी त्या रुग्णांना किंवा वृद्ध व्यक्तींना घरातच गुंतवून ठेवणे अशक्य होते. खिशात नाव-पत्ता-फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी ठेवणं, हातावर मेहेंदीने कुटुंबियांचे फोन नंबर लिहिणे, जीपीएस ट्रॅकरसारखी उपकरणे कपड्यांना अडकवणे असे अनेक सल्ले दिले जातात. पण हे सल्ले अमलात आणणे नेहमीच शक्य असतेच, असे नाही.

नाव, पत्ता, फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी काढून टाकण्यापासून अनेक उद्योग आजाराच्या, मानसिक अवस्थेच्या भरात केले जाऊ शकतात किंवा आपल्याला काहीच होत नाही म्हणून सगळ्या गोष्टी नाकारल्याही जातात.
तंत्रज्ञान आता पुढारलेले आहे, एआयची चर्चा सर्वत्र आहे, जीपीएस ट्रॅकिंग शक्य आहे. अशावेळी घरातील ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घेणे, ते हरवणार नाहीत, रस्ता चुकणार नाहीत आणि चुकलेच तर लवकर सुरक्षित त्यांना घरी आणता येईल, असे पर्याय शोधायला हवे.

तंत्रज्ञानाची मदत

१. ज्येष्ठ नागरिक, स्मृतिभ्रंशासारखे आजार असलेले रुग्ण यांच्या सुरक्षिततेसाठी ‘स्मार्ट ट्रॅकिंग वेअरेबल्स’ हा एक सक्षम पर्याय ठरू शकतो. जीपीएस असलेली स्मार्ट वॉच आणि पेंडंट हा एक उपयुक्त पर्याय आहे. हे पर्याय घरातील सेन्सर्स आणि मोबाईल ॲप्सच्या मदतीने काम करतात. घराबाहेरील हालचाली ‘ट्रॅक’ करण्यासाठी ब्लू टूथ लो एनर्जी ब्रेसलेट्सचा उपयोग होऊ शकतो. नर्सिंग होम्स किंवा वृद्धाश्रमात राहणाऱ्या व्यक्तींचे ‘इनडोअर ट्रॅकिंग’ करण्यासाठी अल्ट्रा वाइडबँड टॅग्जही उपयुक्त ठरतात.

२. या व्यतिरिक्त सेन्सरवर चालणारे दरवाजे, डोअर किंवा फ्लोअर मॅट्स आणि स्मार्ट लॉक्स यांचा वापर केला तर रुग्ण, वृद्ध व्यक्ती घराबाहेर पडल्यास लगेच त्याबाबतची सूचना ‘केअरटेकर’ किंवा ‘केअरगिव्हर’ला नोटिफिकेशनच्या स्वरूपात मोबाइलवर मिळू शकते. पर्याय निवडताना रुग्ण, वृद्ध व्यक्तीच्या हालचाली आणि परिसर यांचा विचार करता येतो. जीपीएस स्मार्ट वॉच आणि जिओफेन्सिंगच्या मदतीने व्यक्ती ठराविक परिसराबाहेर गेल्यास नोटिफिकेशन मिळण्याची सोयही करता येते. या पर्यायांच्या मर्यादाही आहेत. चार्जिंग संपणे, जीपीएसला नेटवर्क नसणे हे वारंवार घडते. रुग्ण किंवा वृद्ध व्यक्तीकडून स्मार्ट वॉच, पेंडंट काढून टाकले जाण्याचाही धोका असतो. शिवाय हे पर्याय खर्चिकही असतात.

३. त्यामुळे एक स्वस्त आणि सोपा उपाय म्हणून ‘माय वंडर लूप’चा वापर करणे सोयीचे ठरू शकते. पुण्यातील राजा नरसिंहन यांनी काही वर्षांपूर्वी चमकणाऱ्या सिलिकॉन बँडचा पर्याय शोधला. या सिलिकॉन बँडला रुग्णाचा नाव पत्ता, कुटुंबियांचा फोन नंबर अशी माहिती देणाऱ्या क्यूआर कोडची जोड देऊन रुग्ण किंवा वृद्धांचा शोध सुकर करण्याचा एक पर्याय त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. ‘माय वंडर लूप’ या नावाने हा बँड ओळखला जातो. ३०० रुपयांहून कमी किमतीत तो मिळत होता.

४. अर्थात असे पर्याय अजूनही काही असतील. मात्र गॅजेट्स, तंत्रज्ञान यांचा उपयोग करून ज्येष्ठांची काळजी घ्यायला हवी. पुण्यातल्या आजी हरवल्या तेव्हा सोशल मीडियावर त्यांचा शोध घेण्याचे आवाहन करणाऱ्या असंख्य पोस्ट व्हायरल झाल्या. शहरभर असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे आणि स्मार्ट यंत्रणा हाताशी असूनही त्यांचा शोध लावण्यात अनेक अडचणी आल्या. त्यातूनच विस्मरण किंवा त्यासारखे आजार असलेल्या, वयोमानाप्रमाणे घराचा पत्ता न सांगता येणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांची माहिती अचूक देऊ शकेल, अशा उपयुक्त उपायांची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

५. आजचा काळ हा जगण्यातील प्रश्नांवर स्मार्ट उपाय शोधण्याचा आहे. डिमेन्शिया, अल्झायमरसारखे विकार असलेल्या किंवा वयोमानाप्रमाणे विसरायला लागलेले घरातील वृद्ध, त्यांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएसवर चालणारे स्मार्ट टॅग, बँड्स किंवा वॉच हा एक उपाय ठरू शकतो.

Web Title : खोए हुए बुजुर्गों को ढूंढना: स्मृति हानि वाले वरिष्ठ नागरिकों की मदद के उपाय

Web Summary : प्रौद्योगिकी स्मृति समस्याओं वाले खोए हुए बुजुर्गों को खोजने में मदद करती है। जीपीएस ट्रैकर, स्मार्टवॉच और क्यूआर कोड बैंड समाधान प्रदान करते हैं। सुरक्षा को प्राथमिकता देना उनकी भलाई और घर वापसी सुनिश्चित करता है।

Web Title : Finding Lost Elders: Solutions for Aiding Seniors with Memory Loss

Web Summary : Technology aids in finding lost elders with memory issues. GPS trackers, smartwatches, and QR code bands offer solutions. Prioritizing safety ensures their well-being and swift return home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.