Lokmat Sakhi >Mental Health > आपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही ? स्वत:चा रागराग करता ?

आपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही ? स्वत:चा रागराग करता ?

स्वत:त काहीच चांगलं दिसत नाही पण इतरांचे मात्र सगळे गुण दिसतात, सतत मनाशी तुलना होते आणि मग आपण काही खास नाही असं वाटू लागतं, पण असं नेमकं का होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 02:50 PM2021-03-27T14:50:01+5:302021-03-27T16:08:48+5:30

स्वत:त काहीच चांगलं दिसत नाही पण इतरांचे मात्र सगळे गुण दिसतात, सतत मनाशी तुलना होते आणि मग आपण काही खास नाही असं वाटू लागतं, पण असं नेमकं का होतं?

do you think that I am not beautiful, not presentable, do you hate yourself? | आपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही ? स्वत:चा रागराग करता ?

आपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही ? स्वत:चा रागराग करता ?

Highlightsतुम्ही केसांची कोणती स्टाईल केलीये, तुम्ही उंच आहात की बुटके आणि गोरे आहात की काळे सावळे, काहीही फरक पडत नाही.

प्राची पाठक

मी दिसायला छान नाही. मी बुटकी आहे. ती गोरी आहे. ही कसली मस्त सावळी आहे. नाहीतर मी पांढरीफटक.
तिच्याकडे फॅशन करायला पैसे आहेत. माझ्याकडे नाहीत. माझे वजन खूपच कमी आहे. मला हे कपडे सूट होतात का? माझ्याच चेहऱ्यावर पिंपल्स आहेत.
असे आपले भिंग कायम दुसऱ्याकडे काय? बरे आहे आणि त्यात काय? खोट काढता येते, इथेच रोखून धरलेले असते. त्यामुळे, दुसऱ्याचे सुख आहे त्यापेक्षा मोठे होऊन आपल्यावर आदळते. त्यात आपण दुरून ते बघत असतो. ज्याला आपण दुसरा सुखात आहे, असे म्हणतोय, ते खरेच तसे नसूही शकते. आपल्याला त्याच्यावर संशोधन करायचे आहे की काय? समजा केले, तर उपयोग काय? ह्याच्या त्याच्यात खोट काढायचा चाळाच लागतो आपल्याला. म्हणजे फोकस सगळा दुसऱ्यावरच! असे का? होते? कारण आपल्यातली कमतरता आपण जाणून घेत नाही. तिच्यावर काम करत बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या यशावर, सुखावर ताशेरे ओढणे सोप्पे असते. मला एखादा विषय नीट कळत नाही, मी त्यावर हवी तितकी मेहनत घेत नाही म्हणून मार्क्स कमी मिळतात, हे सत्य असते. पण दुसरा कसा वशिल्याने पुढे गेलाय, याचे गॉसिप केले की त्याला आपल्याच? रांगेत आणून बसविता येते. तुम्ही गुप्तहेर आहात का? कसा शोधला त्याचा वशिला? की मनाचा खेळ आहे हा आपल्याच? मान्य आहे, असे होतेही कधी. पण आपण आपली रेषा मोठी करण्यात वेळ घालवावा. दुसऱ्याच्या बऱ्या- वाईटावर भिंग लावून बसून आपले प्रश्न सुटणार नसतात.


आपल्या दिसण्याबाबत आत्मविश्वास न येण्याचे, छान न वाटण्याचे मूळ कारण आपण आपल्याला नीट समजून घेत नाही, हेच असते. सततची तुलना सुरु असते. मनापासून आनंदी राहणे, स्वच्छतेचे बेसिक भान असणे, आरोग्य जपणे इतके सुद्धा आपला लूक मस्त एनहान्स करू शकते. त्यासाठी डिझाइनर कपड्यांची गरज नाही की येता जाता पार्लर वारीची आवश्यकता नाही. आपले आयुष्य आपल्या हिमतीवर मार्गी लावले की करू की ही पण मजा. पण आता मी अमक्याच घरात जन्माला आलो आणि माझी परिस्थितीच अशी आहे इथपासून कशाला सुरु करायचे रडगाणे? त्यात एकही गोष्ट चांगली सापडत नाहीये का? आपल्यावर स्वतःवर हे भिंग कधी रोखणार? तुम्ही जे काही आहात, त्याहीबद्दल जेलस वाटणारे कोणी ना कोणी असणार. ह्या भिंग प्रकारात एक त्रुटी पण असते. दुसऱ्याचे केवळ एकाच गोष्टीतले चांगले अथवा वाईट खूप मोठे होऊन दिसते. ती एकच गोष्ट म्हणजे सगळे आयुष्य नसते. त्या एका गोष्टीसाठी त्याने बरेच काही गमावलेले देखील असू शकते. खूप कष्ट घेतलेले असतात. आपण फक्त एन्ड प्रॉडक्ट बघत बसतो. तुलनेनेच बेजार होतो.
सेल्फी प्रकारामुळे आपण अमुकच अँगलने छान दिसतो, असेही लोक डोक्यात पक्के करून टाकतात. छान हसायची संधी असते. पण फोटोसमोर उभं राहिलं की आपण दात न दिसू द्यायची काळजी घ्यायला लागतो. नाहीतर, खोटे- खोटे हसायला तरी लागतो. अमुकच तिरप्या अँगलने उभे राहिले की आपण बरे दिसतो, असे काहीतरी डोक्यात फिक्स करून टाकतो. मग सगळे फोटो तिरपे तिरपे! प्रत्येकाची एक थिअरी होऊन जाते, आपण कोणत्या अँगलने बरे दिसतो ही. मग ते तसेच उभे राहतात फोटोला. आपल्यापेक्षा अमक्याचे फोटो किती भारी येतात नाही, असे सुरु होते मग. आपल्या मनात आपला एक फोटो असतो. तो अभावांनीच नटलेला असतो अनेकदा.
खरेतर, दिसण्याविषयीचा किंवा एकूणच न्यूनगंड आपल्यात सुधारणा करायला कामी लावता आला पाहिजे. न्यूनगंडातून प्रेरणा घेता अली पाहिजे. ते बाजूलाच राहते, आपले भिंग दुसऱ्याचेच आयुष्य सतत तपासत बसते! लोक एकीकडे म्हणतात, "फर्स्ट इम्प्रेशन, बेस्ट इम्प्रेशन". दुसरीकडे तेच लोक म्हणतात, "का रे भूललिया वरलिया रंगा". मग आपण आपल्या सोयीने "का रे भूललिया" मध्ये तरी जातो किंवा महागडे कपडे, पार्लर वाऱ्या आणि अंधानुकरण सुरु करतो.


"का रे भूललिया" मध्ये अजून एक लोचा असतो. आपण खरंच जर आहेत त्यात पण बरे राहत नसू, तर आळशीपणाच सोकावतो. आहे ते छान आहे म्हटले, की सुधारणेला काही वावच राहत नाही. दुसरीकडे, अंधानुकरण केले, तर ते आपल्याला सूट होईलच असेही नसते आणि पैसे जातात ते वेगळेच. दुसऱ्या आपल्या लुक्सबद्दल काय म्हणाला, ह्याचेही किती बर्डन आपण घेऊन फिरत असतो. मालवाहक गाडी होऊन जाते आपली. इतरांची आपल्याविषयीची मते वाहणारी! आपले आपल्याविषयी काही मत असते की नाही?
आपण कमी आहोत हे "जाणणे" आणि आपण कमी आहोत असे वाटणे ह्यात खूप फरक आहे. आपण कमी आहोत, हे जाणले, तर कमी भरून काढता येते. आपण कमी आहोत, असे बसल्या -बसल्या नुसते वाटतच राहिले, तर त्याने कमतरता अजून वाढतच राहिल.


ताठ मानेने चालणे, प्रसन्न राहणे आणि समोरच्याला नीट ऐकू येईल इतपत आत्मविश्वासाने बोलणे, असा प्रयोग करून बघा आठ दिवस. तुमच्या अंगावर कोणते कपडे आहेत, ते किती भारी अथवा बोगस आहेत, तुम्ही केसांची कोणती स्टाईल केलीये, तुम्ही उंच आहात की बुटके आणि गोरे आहात की काळे सावळे, काहीही फरक पडत नाही. लोक तुमचे मुद्दे ऐकू लागतील. तुम्ही तुम्ही म्हणून कसे आहात, ते समजू लागतील.
ट्राय तर करा!

(लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीव शास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: do you think that I am not beautiful, not presentable, do you hate yourself?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.