lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > आपल्याला स्वतःभोवती फक्त व्हर्च्युअल, खोटं जग उभं करायचं आहे का? सावरा, त्या जगात आपण कुणाला फसवतोय..

आपल्याला स्वतःभोवती फक्त व्हर्च्युअल, खोटं जग उभं करायचं आहे का? सावरा, त्या जगात आपण कुणाला फसवतोय..

डिजिटल फॅशनचं नवं जग. व्हर्च्युअल कपड्यांची नवीन फॅशनेबल दुनिया. लॉकडाऊनच्या घरबंद काळात ती अजून बदलते आहे. पण इथे आपल्याला हौसेसाठी पैसे मोजायचे आहेत. म्हणजे ते पैसे कुठून आणणार? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:27 PM2021-04-23T12:27:36+5:302021-04-23T12:33:03+5:30

डिजिटल फॅशनचं नवं जग. व्हर्च्युअल कपड्यांची नवीन फॅशनेबल दुनिया. लॉकडाऊनच्या घरबंद काळात ती अजून बदलते आहे. पण इथे आपल्याला हौसेसाठी पैसे मोजायचे आहेत. म्हणजे ते पैसे कुठून आणणार? 

digital fashion, digital designer , virtual world and fomo | आपल्याला स्वतःभोवती फक्त व्हर्च्युअल, खोटं जग उभं करायचं आहे का? सावरा, त्या जगात आपण कुणाला फसवतोय..

आपल्याला स्वतःभोवती फक्त व्हर्च्युअल, खोटं जग उभं करायचं आहे का? सावरा, त्या जगात आपण कुणाला फसवतोय..

Highlightsडिजिटल डिझायनर नावाचं ‘नसलेलं’ जग

प्राची पाठक

तुम्ही एकदम भारीतले स्टायलिश कपडे निवडता. तुमच्या मापाचे खास असे बनवून घ्यायचे असतात. त्यासाठी तुम्ही तुमचे फोटो, माप वगैरे सगळं डिझाइनरला देता. डिझाइनर त्यावर काम करतात. तुम्ही त्याचे पैसे डिझाइनर - टेलरला मोजतात. मग, तुमचे कपडे तयार होऊन येतात. हे कपडे परिधान करून झकास फोटोशूट वगैरे करतात. वेगवेगळ्या साईट्सवर, ग्रुप्समध्ये तुमचे फोटो नावाजले जातात. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, मिरवणं सगळं साध्य झालं. तरी काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं. का? कारण हे कपडे घालून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. त्यांना स्पर्शाने फील करू शकत नाही. त्यांचा पोत तुम्हाला जाणवू शकत नाही. कारण हे असतात डिजिटल कपडे. अगदी तुमच्या मापाचे, आवडीचे; पण व्हर्चुअल. म्हणजे कपडे असतात पण प्रत्यक्ष कपडे नसतातच. तुम्ही कपड्यांचे नाही, तर डिजिटल फॅशन या कलेचे पैसे मोजता. कपडे विकत तर घेता, पण ते कपडे प्रत्यक्ष घालू शकत नाही. ते घातलेत असं भासवून ती स्टाईल, तो ट्रेंड पूर्ण एन्जॉय करू शकता. ते झालं की तेवढ्यापुरतं. पुन्हा पुढचा ट्रेंड येतोच. एकेक आठवड्यात, एकेक महिन्यात बदलणाऱ्या ट्रेंड्समुळे नवी डिजिटल फॅशन येते. मग पुन्हा नवे डिजिटल कपडे. बरं यातली सोपी गोष्ट काय तर आधीच्या ट्रेंडचे कपडे घरात डम्प करून, कपाटं भरून ठेवावे लागत नाहीत. त्यांचा पसारा झालाच, तर तो तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या स्पेसमध्ये होतो. सगळंच व्हर्च्युअल. आहे ना भारी!
हीच ती डिजिटल फॅशन. डिजिटल फॅशन हा चांगला तोडगा सध्याच्या लॉकडाऊन काळात आणि एरवीसाठीदेखील आहे.

तसेही आपल्याला बाहेर कुठे जायचे नाहीच आहे. तरीही नवनवीन फॅशन ट्रेंड्स आपल्यावर कसे दिसतील, हे आपण ट्राय करू शकतो. “माझ्या मापाचे धड कपडेच मिळत नाहीत,” अशी तक्रार असणाऱ्या बारीक किंवा जाड लोकांना तर ही चांगली सोयच आहे. तुम्हाला साजेसे असे कपडे, त्यातले स्टायलिश फोटो तुम्ही बनवून घेऊ शकता. पर्यावरणावर थेट दिसणारा ताण कमी. कपड्यांचा कचरा, पसारा नाही. एरवीच्या महागड्या फॅशनेबल कपड्यांसाठी ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना हे कपडे त्यांच्यावर कसे दिसतील, ते ट्राय करण्याची संधी ह्यात आहे. अगदीच वाटलं तर ह्या डिजिटल कपड्यांची प्रत्यक्ष कपड्यांसाठी ऑर्डर देऊन ते बनवूनदेखील घेता येतील. त्यात हवी तितकी आणि हवी तशी व्हरायटी ट्राय करता येईल.
हे सगळं चित्र एकदम भारी वाटत असलं तर त्यात काही निसरड्या जागा आहेत. डिजिटल असो की प्रत्यक्ष असो, मौज-मजा-मस्ती करायला कोणाची हरकत नसतेच. फक्त त्याची झिंग लिमिटमध्ये ठेवायची की झालं!


व्हर्च्युअल कपड्यांना भूलता; पण...


एक म्हणजे आजवर तुम्ही व्हर्च्युअल जगात हवे तसे वावरू शकत होतात. नावाची, गावाची, नोकरीची, शिक्षणाची वगैरे कशाचीही खरी-खोटी माहिती देऊन तुम्ही आभासी जगात वावर वाढवू शकत होतात. आता तर फोटोत दिसणारे तुमचे कपडेदेखील खरे की खोटे, असा प्रश्न पडायला वाव आहे. जे आपल्याकडे नाही, जे आपल्याला परवडत नाही, पण मिरवायची हौस फक्त. मग या ट्रेंडला किती बळी जायचं ह्याचं पक्कं भान असेल तरच या भानगडीत पडावं. मजा, सहजच केलेली एक गंमत म्हणून त्यात पडलात, तर आपली मर्यादा सतत आपल्याला माहीत असायला हवी. इथे आपल्याला हौसेसाठी पैसे मोजायचे आहेत. म्हणजे ते पैसे कुठून आणणार? आपल्याला आपल्याभोवती सगळं व्हर्च्युअल, खोटं जग स्वतःभोवती उभं करून घ्यायचं आहे? बाजारात हजारो ट्रेंड हजारो कारणांसाठी येतील. त्यातील कशाकशाला आपण बळी पडणार आहोत?



डिजिटल शो-शा आणि मैत्री


डिजिटल ट्रेंडच्या, व्हर्च्युअल कपड्यात, फोटो पोस्टमध्ये सामील नाही झालो त्या ट्रेंडमध्ये, तर आपले खऱ्या आयुष्यातले मित्र-मैत्रिणी तुटणार आहेत का? आपल्याला कोणी त्यासाठी नावं ठेवणार आहेत का? आपली टिंगलटवाळी होणार का? एक ट्रेंड गेला की कोणीतरी जगात कुठेतरी बसून स्वतःच्या फायद्यासाठी आणलेला दुसरा ट्रेंड फॉलो करणं हे आपलं आयुष्य आहे का? फोटो मॉर्फ करणं, फोटोशॉप शिकणं, फोटो एडिट करणं आणि डिजिटल टेलर बनणं यात खूप फरक आहे.

डिजिटल टेलर नावाचं प्रोफेशन

हे कोणाचं प्रोफेशन असू शकतं. एखाद्या फॅशन डिझाइनरचं, एखाद्या टेलरचं ते जास्तीचं काम असू शकतं. त्याचे त्यांना पैसे मिळू शकतात. हे एक नवीनच काम आता सुरू होतं आहे. फॅशन करताना, त्याकडेही लक्ष ठेवा.


(प्राची मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राची अभ्यासक आहे.)
 

Web Title: digital fashion, digital designer , virtual world and fomo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :digitalडिजिटल