Lokmat Sakhi >Mental Health > फार बोअर झालं, डिप्रेशनच आलंय, नक्को जीव झाला असं म्हणता, मात्र खरा ‘आजार’ भलताच तर नाही!

फार बोअर झालं, डिप्रेशनच आलंय, नक्को जीव झाला असं म्हणता, मात्र खरा ‘आजार’ भलताच तर नाही!

नक्की आपल्याला काय होतंय हे न समजून घेता, काहीबाही निदान स्वत:च करुन आळशीपणा आणि कारणं सांगा मोडवर तर आपण नाही, विचारा स्वत:ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 03:16 PM2021-03-30T15:16:48+5:302021-03-30T15:22:56+5:30

नक्की आपल्याला काय होतंय हे न समजून घेता, काहीबाही निदान स्वत:च करुन आळशीपणा आणि कारणं सांगा मोडवर तर आपण नाही, विचारा स्वत:ला!

depression, fatigue is serious mental problems, self diagnosis is not good. | फार बोअर झालं, डिप्रेशनच आलंय, नक्को जीव झाला असं म्हणता, मात्र खरा ‘आजार’ भलताच तर नाही!

फार बोअर झालं, डिप्रेशनच आलंय, नक्को जीव झाला असं म्हणता, मात्र खरा ‘आजार’ भलताच तर नाही!

Highlights"उठा आणि कामाला लागा", इतका साधा मंत्र सुद्धा अनेकदा आपल्या आयुष्यात कामास येतोय, ह्याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकेल. पुन्हा कधीही लो वगैरे वाटलं, फटीग आलाय असं वाटलं, तर स्वतःला हेच आधी बजावायचं.

प्राची पाठक

मला नां जाम फटीग आलाय, मी फार बोअर झालेय, फार लो वाटतंय, आज बॅटरी डाऊन आहे, मी तर डिप्रेस झालेय, खूप स्ट्रेस आलाय.... ही फार सहजच उच्चारायची वाक्यं आहेत. ह्या वाक्यांमधल्या सगळ्या शरीर मनाच्या लक्षणांना आपण इंग्रजी शब्द सहजच वापरून टाकतो. मी आज नाराज झालेय, मी आज जास्त श्रम केलेत, म्हणून थकले आहे, माझ्या मनावर ताण आलाय... असे शब्द आपण सहसा वापरत नाही. फटीग येणे, बोअर होणे, स्ट्रेस, डिप्रेशन, लो वाटणं बॅटरी डाऊन वगैरे बोलायला सुद्धा आपल्याला नकळत कुठेतरी स्टायलिश वाटत असतं. आपल्याला जे वाटतंय ते इतर भाषेच्या आधाराने आपण कधी आणि कसं सांगतो, ह्याचाही तज्ज्ञांनी अभ्यास केलेला असतो. कधी आपण जे शब्द सहजच वापरून मोकळे होतो, त्यांचा खरा अर्थ, त्यांचे खरे "डायनॅमिक्स" आपल्याला कळले तर आपण ते शब्द इतके सहजच वापरणार नाही. जसं की डिप्रेशन. तात्पुरत्या थकव्याला, एखाद्या लो फिलिंगला, थोड्याश्या ताणाला आपण सहजच डिप्रेशन आलंय, असं निदान करून टाकतो. डिप्रेशन हे इतकं सहज सोपं नाही. तो एक गंभीर मानसिक विकार आहे. अनेकदा आपण आपल्यातल्या आळशी वृत्तीला देखील डिप्रेशन आलंय म्हणून गोंजारत बसतो.

तसंच काहीसं मानसिक थकव्याचं असतं. याला आपण चटकन नाव देऊन टाकतो, काय फटीग आलाय. चकचकीत काँक्रीट रस्त्यावर एकदम नवी कोरी हाय फाय मॉडेलची गाडी चालवत जाणं, इतकं "स्मूथ' तर आपलं आयुष्य कधीच नसतं. त्यात खाचखळगे, खराब रस्ते, बिघडलेली खटारा गाडी असे कॉम्बो असतातच. कधी तर खटारा गाडी देखील मिळत नाही. सायकल वापरायची किंवा पायी जायची तयारी ठेवावी लागते. कधी चिखल तुडवत बिन चपलेचं देखील जावं लागू शकतं. कधी रस्ता उत्तम असेल, पण तो उन्हाने रापला असेल आणि आपली चप्पल इतकी चांगली नसेल की ते ऊन सहन करू शकेल. कधी रस्ताही उत्तम असेल आणि आपल्याकडे भारीतले शूज असतील. पण परिस्थितीच वेगळी असेल. भर पावसात आपल्याकडे लेदर किंवा कापडी शूज असतील, तर उत्तम रस्त्यावर देखील चालतांना प्रॉब्लेम येईलच! त्या त्या वेळी ही परिस्थिती कठीण असेलही. पण तो आपल्या प्रवासाचा केवळ एक भाग असतो. असा प्रवास म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य नसेल. तो तर अगदी तसाच असा संपूर्ण प्रवास देखील नसतो!

जेंव्हा जेंव्हा आपण "मला फार फटीग आलाय", असं वाक्य सहजच वापरतो, तेंव्हा तेंव्हा आपण हेच भान ठेवलं पाहिजे. तो थकवा मानसिक आहे की शरीराचा, ते आधी स्वतःला विचारायचं. शरीराचा थकवा आराम करून, झकास झोप काढून जाऊ शकतो. मानसिक थकवा मात्र खरोखर थकवा आहे की आपला आळस की आपले मूड स्विंग, ताण की सगळं एकत्रच, हे स्वतःला कोणतीच सवलत न देता विचारायचं. अनेकदा आपण काहीच करण्या- बोलण्यासारखं सुचत नसेल, तर त्यालाही फटीग म्हणतो. कधी आपल्याला आपल्या रुटीनचा कंटाळा आलेला असतो. कधी आपल्याला कमी वेळात जास्त कामं पडतात. कधी काही पेचातून मार्ग काढत बसावं लागतं. अशा सर्व तात्कालिक कारणांचं बिल मात्र आपण फटीग, स्ट्रेस, डिप्रेशन ह्या शब्दांच्या नावाने फाडत असतो. हे फार लोडेड शब्द आहेत. एखाद वेळी गुडघ्याला जरासं खरवडतं. म्हणून लगेच आपण

"आता नी रिप्लेसमेंटची वेळ आलीये" किंवा

"आता नां गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल", असं बोलत नाही.

एखादा डास चावून लहानसा फोड आला, तर आपण

"मला ना कॅन्सरची गाठ झालीये", असं निदान करून टाकत नाही. तेच सूत्र फटीग, स्ट्रेस, डिप्रेशन वगैरे शब्द वापरतांना पाळलं पाहिजे.

आपण फार चटकन ठरवून टाकतो की मला जाम बोअर होतंय. पण मुळात आपण जे निदान स्वतःच स्वतःबद्दल चटकन करून टाकतो, तिथे थोडा पॉज घेऊन बघा. खोल श्वास घेऊन डोळे मिटून जरासा विचार करा.

१.  आपल्याला त्या-त्या वेळी जे काही वाटत असतं, ते कंटाळा, आळस या गटातलं आहे का? 

२. आपण शरीर हालचाल होईल, खाल्लेलं अन्न नीट पचेल, असं शरीर कष्टाचं काही काम केलंय का? किती व्यायाम आपण रोज करतो? आपला आहार कसा असतो? झोप कशी असते? त्यात काय सुधारणा करता येईल? ते स्वतःला विचारा.

३.  काही नवीन शिकून बघा. आपल्या नेहमीच्या रुटीनपेक्षा काही वेगळं करा. वेगळ्या लोकांना भेटा, त्यांच्याशी बोलून बघा. रुटीनमध्ये ठरवून केलेले बदल, चांगल्या आरोग्य सवयी ह्यांच्यामुळे देखील आपल्या मनाच्या लहान सहान कुरबुरी दूर निघून जातील. 

४. आपल्याला फ्रेश वाटेल. सदा रडं बनून हे नाही, ते नाही, हे मिळालं की मी ते करेन असल्या अटी शर्ती बसल्या-बसल्या स्वतःवर लादल्या, तर आयुष्याची गाडी आणखीनच चिखलात रुतेल.

५. "उठा आणि कामाला लागा", इतका साधा मंत्र सुद्धा अनेकदा आपल्या आयुष्यात कामास येतोय, ह्याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकेल. पुन्हा कधीही लो वगैरे वाटलं, फटीग आलाय असं वाटलं, तर स्वतःला हेच आधी बजावायचं. उठ -कामाला लाग!

 

(लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीव शास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

 

Web Title: depression, fatigue is serious mental problems, self diagnosis is not good.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.