Lokmat Deepotsav 2019: Meet Pandavani singer Tejanbai in this Diwali issue | लोकमत दीपोत्सव 2019: या दिवाळी अंकात भेटा पंडवानी गायिका तीजनबाईंना
लोकमत दीपोत्सव 2019: या दिवाळी अंकात भेटा पंडवानी गायिका तीजनबाईंना


-वंदना अत्रे

तीजनबाईच्या घराजवळ गाडी थांबली तेव्हा माझ्याबरोबर असलेला झाकीर हुसेन नावाचा तरुण पत्रकार गाडीतून उतरता - उतरता पुटपुटला..
‘मालूम नही मॅडमजीका बोलनेका मूड है या नही..!’
‘मतलब? इतना सफर करके आये है, और मॅडम बात नही करेगी हमसे?’ मी जवळ जवळ ओरडलेच..
मला नाशिकहून भल्या पहाटे 2 वाजता, धो धो पावसात गाडी पकडून रायपूरपर्यंत केलेला अठरा तासांचा प्रवास आठवला. गेला तासभर भिलाईहून निघाल्यापासून सुरू असलेल्या आमच्या गप्पा आणि मुलाखतीची तयारी आठवली. आणि आता मुलाखतीचा क्षण आल्यावर हा प्राणी भलतेच काही धक्कादायक ऐकवत होता. आणि मग मला काही वेळापूर्वी झालेले त्याचा आणि त्याच्या दुस-या  एका पत्रकार मित्राचा संवाद आठवला. आदल्या दिवशी बाईंनी एका अतिशय नामवंत अशा इंग्लिश पाक्षिकाच्या प्रतिनिधींना तब्येतीचे कारण देत वाटण्याच्या अक्षता लावल्याचे तो पत्रकार झाकीरला सांगत होता.
एखाद्या कलाकाराच्या दाराशी मुलाखतीसाठी जाऊन ती न घेताच परत जाण्याचा  दुर्मीळ  अनुभव आपल्या खाती जमा होतो की काय अशी भीती वाटून सर्व जीव गोळा करून मी त्या तीजनबाईच्या घराच्या त्या उघड्या व्हरांड्यात बसले होते.
आदल्या रात्री रायपूरमध्ये पाऊस पडला होता; पण इथे मात्र  उन्हाचा कडाका होता. बाईंचे जेवण संपेपर्यंत पाण्याचे ग्लास आणि पाठोपाठ चहा समोर आला. पण त्यातील काहीही त्या क्षणी नको होतं. समोर एकच लाख मोलाचा प्रश्न होता, तीजन बोलणार की नाही आपल्याशी?
साडीच्या पदराला ओले हात पुसत, हातात विड्याचे पान घेऊन बाई बाहेर आल्या त्या क्षणी झाकीर त्यांच्या पायाशी वाकला. नमस्कार करण्यासाठी. पंडवानी नावाच्या कलाप्रकाराचा आणि त्यातही तीजनबाईंनी दिलेल्या योगदानाचा अभ्यास करणारे विनोद तिवारी नावाचे अभ्यासक आमच्या बरोबर होते. तेही छत्तीसगडी भाषेत काहीतरी बोलत त्यांच्या पायापाशी वाकले, आता मला मागे राहून चालणार नव्हते..
आमच्या या नमस्कारांनी चमत्कार केला का ठाऊक नाही; पण घसा खाकरत बाई गप्पा मारायला तयार झाल्या..
काही मिनिटांसाठी बोलेन या अटीवर सुरू झालेल्या या गप्पा मग जवळ जवळ दीड तास चालल्या. थोड्या छत्तीसगडी भाषेत थोड्या हिंदीमध्ये. 
इंग्लिश भाषेत पूर्ण एक वाक्यसुद्धा बोलता न येणारी, शाळेची पायरीसुद्धा न चढलेली, स्वत:च्या हातावरचे स्वत:च्या नावाचे गोंदण बघून तशी सही करायला शिकलेली ती साठीच्या आसपासची स्त्री इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती भवनाच्या भेटीचे किस्से ऐकवत होती. ते ऐकवता-ऐकवता महाभारतातील सुडाचे राजकारण आणि त्याने घडवलेल्या विनाशाबद्दल व्यथित होत होती. आणि काही क्षणातच अमिताभ बच्चनच्या घरी जाण्याची आपली संधी कशी हुकली याची हळहळ व्यक्त करीत होती..
आम्ही ज्या घरात बसलो होतो त्याच्या आसपासची सगळी घरे तीजनबाईची.
तिची मुले, नातवंडे, जावई, जवळची आणि दूरची भावंडे असा सगळा गोतावळा त्या घरांमधून राहतो. त्या मोकळ्या-ढाकळ्या व्हरांड्यामधून बाईंची घारीची नजर सगळीकडे फिरत असते. 
आमच्या गप्पा सुरू असताना मधेच त्या गलोल घेऊन गुपचूप निघालेल्या दोन चार मुलांवर डाफरल्या आणि मग तोंडात तंबाखूचा तोबरा घेऊन आलेल्या जावयाला त्यांनी तंबी भरली.
त्या भल्या मोठय़ा परिवारावर असलेली त्यांच्या सत्तेची सावली स्पष्टपणे जाणवत होती. तसंच जाणवत होतं ते स्वत:च्या वेगळेपणाबद्दल त्यांना असलेलं भान. शिक्षण न घेता सगळं महाभारत स्मरणाच्या कुपीत असल्याचा रास्त अभिमान, स्रिया ज्या कापालिक शैलीच्या पंडवानीच्या वाट्याला कधीच गेल्या नाहीत तीच शैली खांद्यावर घेत जगभरात मिरवणारी धिटाई व आत्मविश्वास आणि स्त्री समानताबिमानतेच्या गोष्टीचा वारासुद्धा कानावरून गेलेला नसताना आपल्या एकटीच्या बळावर सगळ्या कुटुंबाला, पुढच्या पिढय़ांना सन्मानानं जगण्याच्या वाटेवर आणून ठेवणारा करारी निर्धार..
हे आणि बरंच काही त्यांच्या वावरण्यातून आणि बोलण्याच्या स्वरातून व्यक्त होताना बघताना जाणवलं. कित्येक वर्षात इतकी खंबीर आणि आत्मनिर्भर स्री बघितलीच नव्हती आपण.
व्यवहारांच्या अनेक गोष्टी बोलता बोलता त्या पुन्हा पुन्हा टेकतात कृष्णाच्या बासरीवर. रात्री अज्ञातातून ऐकू येणा-या  त्याच्या स्वरांवर.
तेव्हा तीजन नावाच्या एका एरवी सामान्य वाटणा-या स्त्रीच्या मस्तकावर असलेले ते अदृश्य डौलदार मोरपीस आपल्यालापण दिसू लागते..! 
आणि गप्पा रंगतात.
त्याविषयी अधिक नक्की वाचा.
लोकमत दीपोत्सव 2019 या लोकमतच्या लवकरच प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकात..

 

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 vratre@gmail.com
-----------------------------------

 


 
प्रसिद्धी लवकरच !
     
अधिक माहिती आणि अंकाची मागणी नोंदवण्यासाठी ऑनलाइन   
    खरेदी-deepotsav.lokmat.com

     व्हॉट्सअँपवर मागणी नोंदवण्यासाठी- 9552550080 
इमेल- sales.deepotsav@lokmat.com
     मूल्य- 200 रुपये.
    आपला अंक आजच राखून ठेवा ! 


         

Web Title: Lokmat Deepotsav 2019: Meet Pandavani singer Tejanbai in this Diwali issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.