Lokmat Sakhi >Inspirational > धडाकेबाज! गडचिरोलीतील आदिवासी सरपंचाचा गावच्या विकासासाठी लढा

धडाकेबाज! गडचिरोलीतील आदिवासी सरपंचाचा गावच्या विकासासाठी लढा

Bhagyashri Manohar Lekhami : अनेक आव्हांनाना तोंड देत आपल्या गावच्या विकासाठी लढणारी भाग्यश्री मनोहर लेखामी हिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:18 IST2025-04-04T17:16:11+5:302025-04-04T17:18:45+5:30

Bhagyashri Manohar Lekhami : अनेक आव्हांनाना तोंड देत आपल्या गावच्या विकासाठी लढणारी भाग्यश्री मनोहर लेखामी हिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

young Adivasi sarpanch Bhagyashri Manohar Lekhami in Gadchiroli fears neither Naxalites nor the cops | धडाकेबाज! गडचिरोलीतील आदिवासी सरपंचाचा गावच्या विकासासाठी लढा

धडाकेबाज! गडचिरोलीतील आदिवासी सरपंचाचा गावच्या विकासासाठी लढा

समाजाच्या, गावच्या विकासासाठी फार कमी लोकं धडपडत असतात. दुर्गम भागात तर परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक आव्हांनाना तोंड देत आपल्या गावच्या विकासाठी लढणारी भाग्यश्री मनोहर लेखामी हिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. नक्षलग्रस्त भागातील लोकांना नवी दिशा देण्याचं कौतुकास्पद काम ती सध्या करत आहे. 

भाग्यश्री लेखामी ही गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील २३ वर्षीय सरपंच आहे. नक्षलग्रस्त अशा गडचिरोली जिल्ह्यातील नऊ गावांची जबाबदारी तिच्यावर आहे. मडिया आदिवासींकडून सतत प्रेम आणि आदर मिळत असल्याने तिला हे काम खूप महत्त्वाचं वाटत आहे. भाग्यश्रीने दिलेल्या माहितीनुसार, "कोठी ग्रामपंचायतीत २००३ पासून सरपंचाची नेमणूक झाली नव्हती. यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असे. सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच ग्रामीण प्रकल्पांची जबाबदारी घेतली होती, परंतु शौचालय, शाळा आणि रस्ते केवळ कागदावरच होते." 

"भ्रष्ट अधिकारी फसवणूक करायचे. तहसील कार्यालय २५ किलोमीटर अंतरावर होते. कित्येक तासांच्या प्रवासानंतर जेव्हा आम्ही जमिनीच्या कागदपत्रांसाठी तिथे जायचो, तेव्हा आम्हाला परत पाठवलं जायचं किंवा दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितलं जायचं. आम्हाला अशा एका सरपंचाची नितांत गरज होती, जे अशा कामात स्थानिक आणि प्रशासन यांच्यामधील दुवा असतील. आमच्या गरजांसाठी लढण्यासाठीही आम्हाला कोणाची तरी गरज होती." 

"आमच्याच घरात आम्हाला वाईट वागणूक का दिली जाते?"

"आम्हाला अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली जाते. आमचे कपडे, आमचे अन्न, आमची जीवनशैली यावरुन अधिकारी आम्हाला बोलतात आणि आम्ही सर्व नक्षलवादी असल्याचा आरोप करतात. आमच्या समाजातील पुरुष सदस्यांना अनेकदा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून त्रास दिला जातो. आमची स्वत:ची जमीन असताना, आमच्याच घरात आम्हाला इतकी वाईट वागणूक का दिली जाते?"

एकमताने सरपंच म्हणून निवड 

२०१९ मध्ये भाग्यश्रीने समाजासाठी काही स्वप्न पाहिली. ग्रामसभेत तिची एकमताने सरपंच म्हणून निवड करण्यात आली. बॉक्सर आणि व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून प्रशिक्षण घेतलं होतं म्हणून क्रीडा प्रशिक्षक बनण्याचं तिचं ध्येय होतं. सरपंच पद स्विकारण्यापूर्वी मनाची तयारी करण्यासाठी तिने थोडा वेळ घेतला, नंतर मात्र कधीही मागे वळून पाहिलं नाही.

शिक्षण, आरोग्य सेवा, वीज उपलब्ध करून देण्यासाठी धडपड

भाग्यश्री गावातील लोकांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि वीज उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यास मदत झाली आहे. गडचिरोलीच्या काही भागांत अजूनही वीज पोहोचलेली नाही. सरकारी योजनांचा वापर करून ती गावात वीज पोहोचवण्यासाठी धडपडत आहे. रस्ते, घरं, शौचालय, पाणीपुरवठा, वीजपुरवठा यासाठी ती दिवसरात्र काम करत आहे. 
 

Web Title: young Adivasi sarpanch Bhagyashri Manohar Lekhami in Gadchiroli fears neither Naxalites nor the cops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.