सौंदर्याला अनेकदा त्वचेच्या रंगाच्या चौकटीत बसवले जाते. उजळ रंग म्हणजे सुंदर आणि गडद रंग म्हणजे कमी आकर्षक. हा विचार समाजातून कमी होत चालला आहे. त्याची तीव्रता कमी झाली असली तरी आजही अनेकांच्या विचारशैलीत त्याचा समावेश आहे. (You are black, not beautiful.. People taunted Miss Pakistan, she gave a sharp reply..)मात्र आजकाल लोकांच्या ट्रोलिंगला मुहतोड जवाब दिला जातो. कलरिझम विरुद्ध आवाज उठवला जातो.
अलीकडेच मिस युनिव्हर्सपाकिस्तान २०२५ रोमा रियाज हिने या विचारसरणीला ठामपणे आव्हान दिलं आहे.
रोमा रियाज ही ब्रिटिश-पाकिस्तानी मॉडेल असून तिने नुकतंच मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. तिच्या निवडीच्या क्षणापासूनच सोशल मीडियावर मोठा वाद सुरु झाला. काहींनी तिच्या रुपावर टीका करत ती “ पाकिस्तानी सौंदर्याचे प्रतीक नाही” असे वक्तव्य केले. काहींनी तर तिच्या गडद त्वचेवरुनही प्रश्न उपस्थित केले. तिच्याच देशातील लोकांनी तिला कुरुप म्हटले. तसेच ती पाकिस्तानी दिसत नाही. तिचा रंग गडद आहे असेही पाकिस्तानी लोकांनी म्हटले.
त्यावर रोमाची प्रतिक्रिया अनेकांचे तोंड बंद करणारी ठरली. रोमा म्हणाली, माझ्या त्वचेच्या रंगासाठी मी माफी मागणार नाही. माझ्या रंगावर प्रश्न उठवण्याचा कोणाला अधिकार नाही. त्यानंतर, तिच्या या शब्दांनी हजारो महिलांना नव्या प्रकारे स्वतःकडे पाहायला शिकवलं, असे नेटकऱ्यांनी म्हटले. रोमा म्हणाली की,आपल्याला गोऱ्या रंगाचं इतकं कौतुक का आहे, आपण विसरतोय का आपल्या कातडीचा रंग. माझा रंग जसा आहे तसा आहे, त्यात अपमान वाटण्यासारखं काहीच नाही.
कलरिझम ही केवळ एक सौंदर्यविषयक चर्चा नाही, तर समाजातील असमानतेचं प्रतिबिंब आहे. गडद रंगाला हीन मानणारी मानसिकता दूर करण्यासाठी रोमासारख्या धैर्यवान स्त्रियांची गरज आहे. तिने जे म्हटलं, ते फक्त तिच्या व्यक्तिमत्त्वाचं विधान नव्हे, तर हजारो मुलींच्या मनातील भावना आहे.
दक्षिण आशियातील लोकांना या गोष्टी कायमच सहन कराव्या लागतात असे ही ती म्हणाली. मात्र “सुंदर दिसण्यासाठी तुला बदलायची गरज नाही, तू जशी आहेस तशीच परिपूर्ण आहेस.” असा संदेश सगळ्या महिलांना देत रोमाने केलेले विधान फार लोकप्रिय ठरले.
