एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल सर्व काही करणं शक्य होतं. उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील कटरा बाजार येथील रहिवासी असलेल्या यास्मिन बेगम यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. पतीने तिला सोडून दिल्यानंतर तिने हार मानली नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला. आज ती तिच्या शिवणकामाच्या व्यवसायातून लाखो रुपये कमावते आणि अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
यास्मिनने दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पतीने तिला आणि चार मुलींना सोडून दिलं. सुरुवातीला जीवन खूप कठीण वाटत होतं. घर चालवण्यासाठी पैसे नव्हते आणि आधारही नव्हता. पण तिने कोणावरही अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतला. तिला शिवणकाम आणि भरतकामाची आवड होती, म्हणून जुन्या शिलाई मशीनवर छोटे छोटे कपडे शिवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला परिसरातील महिला कपडे शिवण्यासाठी तिच्याकडे येत असत. हळूहळू लोकांना तिचं काम आवडू लागलं आणि ऑर्डर वाढू लागल्या.
१२ महिलांना दिला रोजगार
सुरुवातीला यास्मिन दिवसाला दोन ते तीन कपडे शिवत असे, जे घर चालवण्यासाठी पुरेसे नव्हते. पण जेव्हा कष्टाला फळ मिळालं तेव्हा काही पैसे वाचवले आणि एक नवीन शिलाई मशीन विकत घेतली. त्यानंतर, तिने तिच्या घरातील एका छोट्या खोलीत व्यवसाय सुरू केला. आता, गावातील इतर १० ते १२ महिला तिच्यासोबत काम करतात. यास्मिन केवळ स्वतःसाठीच कमवत नाही तर इतरांनाही रोजगार देते. ती ब्लाउज, सूट, पेटीकोट, कुर्ता-पायजामा, लहान मुलांचे कपडे शिवते.
दरवर्षी लाखोंची कमाई
सणासुदीच्या काळात तिला इतक्या ऑर्डर मिळतात की, तिला रात्रंदिवस काम करावं लागतं. आता तिचं मासिक उत्पन्न ४०,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे आणि ती दरवर्षी लाखो रुपये कमवते. यास्मिन म्हणते की, जेव्हा तिचा नवरा तिला सोडून गेला तेव्हा तिला तिचं आयुष्य संपल्यासारखं वाटलं होतं. पण एखाद्या व्यक्तीने दृढनिश्चय केला तर काहीही साध्य करता येतं. तिची मेहनत आणि समर्पण पाहून अनेक महिला तिच्याकडून प्रेरणा घेत आहेत.