Lokmat Sakhi >Inspirational > वर्ल्ड नंबर वन १ नोवाक जोकोविच घरात भांडी घासतो! विचारा त्यालाही, असली कामं पुरुषांना शोभतात का?

वर्ल्ड नंबर वन १ नोवाक जोकोविच घरात भांडी घासतो! विचारा त्यालाही, असली कामं पुरुषांना शोभतात का?

पुरुषासारखा पुरुष आणि काय घरात भांडी घासतो? असा प्रश्न करण्यापूर्वी हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 01:33 PM2021-09-21T13:33:20+5:302021-09-21T13:52:22+5:30

पुरुषासारखा पुरुष आणि काय घरात भांडी घासतो? असा प्रश्न करण्यापूर्वी हे वाचा..

world's number 1 tennis player Millionaire champion Novak Djokovic washes dishes at home! it says a lot about him and men and housework. | वर्ल्ड नंबर वन १ नोवाक जोकोविच घरात भांडी घासतो! विचारा त्यालाही, असली कामं पुरुषांना शोभतात का?

वर्ल्ड नंबर वन १ नोवाक जोकोविच घरात भांडी घासतो! विचारा त्यालाही, असली कामं पुरुषांना शोभतात का?

Highlightsभांडी घासणं हे एक मेडिटेशन आहे; पण ते कुणी असं जोकोविचसारखं समजून उमजून करीत असेल तर!

‘पुरुषांनी आता काय भांडीपण घासायची का? वर्क फ्रॉम होमपण करा आणि घरी भांडीपण घासा..’-अशा अर्थाचे अनेक विनोद आपल्याकडे लॉकडाऊन काळात व्हायरल झाले. मुळात आपल्याकडे पुरुषांनी घरकाम करणं, त्यातही ‘भांडी’ घासणं फारच कमीपणाचं मानलं जातं. घरी बस, भांडी घास, काही जमत नसेल तर असं पुरुषाला उद्देशून भांडणात सर्रास बोललं जातं. ते जिव्हारीही लागतं.
मुळात पुरुषांनी घरकाम करणं, स्वयंपाक करणं, जेवून झाल्यावर भांडी घासणं हे सारं म्हणजे काहीतरी ‘बायकी’, दुय्यम असं मानलं जातं. जे काही निवडक घरात ही कामं करतात, त्यापैकी काही सोशल मीडियात जाहिरातही करतात बघा, मी घरात भांडीपण घासतो. मी किती मदत करतो घरात.
आपल्याकडेच हे घडतं का? तर असंही नाही. भारतीय उपखंडात हे घडतंच, पण एकूण जगभरच पुरुषांनी घरकाम ही काही फार ‘हजम’ हाेनेवाली बात नाही.
त्यात मग असा एखादा व्हिडिओ येतो की त्याचं कौतुक करावं की त्याची टिंगल करावी की नक्की कसं रिॲक्ट व्हावं हेच अनेकांना कळत नाही.

त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नोवाक जोकोविचच्या बायकोने, जेलेनाने अलीकडेच ट्वीट केलेला त्याचा एक व्हिडिओ.
जोकोविच टेनिसचा सम्राट. कोट्यधीश माणूस. जगभर लोकप्रिय. एक-दोननाही २० वेळा ज्यानं चॅम्पिअनशिप घरी आणली असा हा ‘यशस्वी’ कर्तबगार पुरुष.
तर अमेरिकन ओपन सामना तो हरला. हरला म्हणून खूप चिडला. रडलाही. जाहीरपणे रडला. पुन्हा तेच.
चॅम्पियन माणूस सामना हरतो म्हणून रडतो काय? पुरुषासारखा पुरुष आणि कसला रडतो असं म्हणत त्याला अनेकांनी नाकं मुरडली.
पण त्यानं मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की, होतं असं. येतं माणसाला कधीकधी रडू. त्यात ॲबनॉर्मल असं काही नाही.
आणि हे सारं समाजमाध्यमात चर्चेच्या केंद्री असतानाच, जेलिनानं जोकोविचचा एक छोटा व्हिडिओ ट्वीट केला.
त्यात स्पष्ट दिसतंय की, जोकोविच भांडी घासतोय. चांगली खळखळून धुतोय हातातली पॅन.
व्हिडिओ शेअर करताना जेलिना म्हणते, ‘नोवाक थर्ड शिफ्ट. रात्री मॅच खेळून घरी आल्यावर तो असं ‘मेडिटेशन’ करतो.’
व्हिडिओ अर्थातच व्हायरल झाला. न्यू जर्सीच्या घरात जोकोविच भांडी घासतोय, नवरा बायको सर्बियन भाषेत काहीतरी बोलताय, गप्पा मारत काम चाललेलं आहे. बायको व्हिडिओ शूट करतेय.
त्यावर एका युजरने विचारलंच जेलिनाला की, तो भांडी घासतोय तर मग तू काय करतेस?
तिनंही शांतपणे उत्तर दिलं, ‘चांगल्या बायकोसारखी मी पाहतेय, शूट करतेय त्याला काम करताना!’
-कल्पना करून पाहा हे इतकं साधंसोपं वाचताना तरी खरं वाटतं का? जगज्जेता टेनिसपटू, मॅच झाल्यावर घरी येतो. मैदानातली हार-जीत असतेच सोबत, पण शांतपणे भांडी घासतो.
ना त्याची लोकप्रियता आड येते, ना कर्तबगारी, ना पैसा.
हे सारं आपल्या समाजात घडू शकतं?

आपल्याकडे पुरुषाची कर्तबगारी तो किती पैसे कमावतो याच्याशी जोडली जातेच, पण तो पुरुष आहे. तो काय घरात भांडी घासणार, कप-बशा विसळणार का? ही बायकांची कामं ही आपली जुनाट मानसिकता. ती कधी बदलणार? जेवढा यशस्वी कुणी घराबाहेर, तेवढा त्याचा घरात रुबाब, त्याच्या हातात सगळं घरच्यांनी आणून द्यायचं. आयतं.
आणि आपण असं सारं वागतो याचं त्याला काहीच वाटत नाही.
जोकोविचचा हा एक साधा व्हिडिओ, तो या जुनाट मानसिकतेला सवाल करीत नाही तर तोडून टाकतो तो त्या समजुती.
छान आपलं घर समजून मस्त घरकाम करतोय.
असं म्हणतात, भांडी घासणं हे एक मेडिटेशन आहे; पण ते कुणी असं जोकोविचसारखं समजून उमजून करीत असेल तर!
 

Web Title: world's number 1 tennis player Millionaire champion Novak Djokovic washes dishes at home! it says a lot about him and men and housework.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.