अझहर शेख
सरकारी नोकरीचा मोह कुणाला पडत नाही? त्यात सरकारी नोकरी मिळणं अवघड. पण संधी आहे असं दिसताच त्यांनी टपाल खात्यात नोकरीसाठी अर्ज केला.
बीई झालेलं होतं, इंजिनिअर म्हणून काम करताच आलं असतं. पण ही संधी आहे तर ग्रामीण डाकसेवक म्हणून टपालखात्यात अर्ज करु असं ठरवून मयुरी अरविंद कोठावदे यांनी हिंमत केली. आणि आता ‘पोस्टमन’ म्हणून मागील तीन वर्षांपासून त्या नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात टपाल बटवडा करत आहेत.
ही गोष्ट आहे, मूळ धुळ्याच्या रहिवासी असलेल्या मयुरी अरविंद कोठावदे यांची! ‘बीई’पर्यंतचे (इलेक्ट्रॉनिक-टेलिकम्युनिकेशन) शिक्षण त्यांनी घेतले. घरची परिस्थिती जेमतेम. दोन भाऊ, एक बहीण अशी ही चार भावंडे. मागील तीन वर्षांपासून ग्रामीण डाकसेवक म्हणून धुळे जिल्ह्यात त्या टपालखात्यात त्यांन नोकरी केली. उच्च शिक्षण घेतले असल्यामुळे पाच वर्षांनंतर त्यांनी खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना पोस्टमन पदावर २०२३ साल नाशिकला बढती मिळाली.
त्या सांगतात, पती अरविंद हे मार्केटिंगची नोकरी करतात. लग्नानंतर त्यांना पतीची भक्कम साथ लाभली. शासकीय नोकरी असल्याने त्यांनी गांभीर्य ओळखून खातेअंतर्गत परीक्षा देण्यास सांगितले. तसेच आई, वडील, सासू-सासरे यांनीही तितकेच बळ दिले. यामुळे त्यांची खडतर वाटचाल सोपी झाली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बदली नाशिकला झाली; मात्र तेव्हाही कुटुंबीयांनी विशेषत: त्यांच्या पतीने साथ दिली आणि नाशिकला नोकरीला पाठविले.
मयुरी यांना सहा वर्षांची मोठी मुलगी व एक वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी गर्भवती असतानासुद्धा शहरात टपालाच्या बटवड्याचे कर्तव्य पार पाडले. मुख्य टपाल कार्यालयांतर्गत एकूण चार महिला पोस्टमन सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये यांचाही समावेश होतो. मागील तीन वर्षांपासून त्या पोस्टमनचे कर्तव्य पार पाडत आहेत.
मयुरी सांगतात, स्त्री-पुरुष हा भेद समाजाने आता करायला नको. समाजाने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा; कारण महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेली नाही. यामुळे महिला दिन दरवर्षी जरी साजरा होत असला तरी महिलांविषयीचा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल, तेव्हाच हा दिन सार्थकी लागेल.