Join us

कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 19:44 IST

Wing Commander Vyomika Singh : व्योमिका सिंह यांच्या बालपणाशी संबंधित अनेक मनोरंजक आणि प्रेरणादायी गोष्टी आई-वडिलांनी सांगितल्या आहेत.

विंग कमांडर व्योमिका सिंह आज भारतीय सुरक्षेचा एक मजबूत आधारस्तंभ बनल्या आहेत. त्यांच्या संघर्षाच्या आणि समर्पणाच्या गोष्टींची आज देशभरात चर्चा रंगली आहे. व्योमिका सिंह यांच्या बालपणाशी संबंधित अनेक मनोरंजक आणि प्रेरणादायी गोष्टी आई-वडिलांनी सांगितल्या आहेत. व्योमिका यांचे वडील आरएस निम आणि आई करुणा सिंह या दोघांनाही मुलीच्या यशाचा अभिमान वाटत आहे. दहावीत असल्यापासूनच व्योमिका यांचं पायलट होण्याचं स्वप्न होतं.  सुरुवातीला त्यांनी हे त्यांच्या पालकांना सांगितलं नाही.

व्योमिका यांचे पालक म्हणाले की, व्योमिका कधीही सामान्य मुलांसारखी वागली नाही. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या उपक्रमात भाग घ्यायची - मग ते खेळ असो, वादविवाद असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा असो. ती नेहमीच प्रत्येक बाबतीत अव्वल राहिली. ती खूप वेगळी होती, सामान्य मुलांपेक्षा खूप वेगळी. ती शाळेत नेहमीच पहिली यायची. खेळांमध्येही भाग घ्यायची. एकदा तिने एका स्पर्धेत भाग घेतला ज्यामध्ये ती जिंकली. यानंतर तिला वीस हजार आठशे रुपयांचं बक्षीस मिळाले. आजतकने व्योमिका यांच्या पालकांशी खास संवाद साधला.

"मुलगी आणि मुलगा हा फरक कशाला करायला हवा?"

व्योमिका एकदा पायऱ्या चढताना शिट्टी वाजवत होती, तेव्हा तिच्या आईने तिला अडवून सांगितलं की मुलींनी असं करू नये, तेव्हा व्योमिकाने उत्तर दिलं - मुलगी आणि मुलगा हा फरक कशाला करायला हवा? मुलीही त्यांना हवे ते करू शकतात. व्योमिकाचा हाच विचार आणि आत्मविश्वास तिच्या यशाची गुरुकिल्ली बनला. जेव्हा व्योमिकाने हवाई दलात भरती होण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला हे तिच्या आईपासून लपवून ठेवायचं होतं अशी माहिती वडिलांनी दिली. 

भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक

"डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"

व्योमिका यांनी आधी त्यांच्या वडिलांशी याबद्दल चर्चा केली होती आणि म्हणाल्या होत्या की, डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही. जेव्हा व्योमिका यांनी सर्व टेस्ट पास केल्या आणि त्यांची हवाई दलात निवड झाली, तेव्हा त्यांनी ही आनंदाची बातमी पहिल्यांदा आपल्या आईला सांगितली. पण सुरुवातीला त्यांच्या आईचा यावर विश्वास बसला नाही. 

बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटूंबियांना अभिमान

"मुली कोणापेक्षाही कमी नाहीत"

आई म्हणाली की, हे सर्व अचानक घडलं, आम्हाला या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला. व्योमिका तिच्या आजूबाजूच्या लोकांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणास्थान आहे. मुली कोणापेक्षाही कमी नाहीत, हा संदेश तिने दिला आहे. व्योमिका यांना प्रत्येक पावलावर त्यांच्या पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. व्योमिका सिंह यांची यशोगाथा ही एका संघर्षशील आणि सक्षम महिलेची कहाणी आहे, जी केवळ भारतीय सैन्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर त्या सर्व महिलांसाठी प्रेरणा आहे ज्या त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अडचणीचा सामना करतात. 

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्लाभारतीय जवान