फिरण्याची आवड असली की माणूस सर्वच गोष्टी विसरून जातो. त्याला वयाचं बंधन राहत नाही. फक्त जगण्याचा मनमुराद आनंद घेणंच त्याला माहित असतं. अशीच एक भन्नाट गोष्ट आता समोर आली आहे. वयाची ऐंशी ओलांडलेल्या दोन बहिणींचा उत्साह कमाल आहे. या वयातही त्या फिरण्याचा आनंद घेत आहे आणि त्यांच्या पुढच्या पिकनिकचं प्लॅनिंग करत आहेत.
केरळच्या त्रिशूरमध्ये राहणाऱ्या वलसला मेनन (८६) आणि त्यांची बहीण रमानी मेनन (८४) यांनी फिरण्यासाठी वयाला कोणतंही बंधन नसतं हे सिद्ध केलं आहे. "आता आमची पावलं मंदावली आहेत. आम्हाला टेकड्या चढताना थोडा त्रास होतो, पण तरीही आम्हाला आणखी ठिकाणं एक्सप्लोर करायची आहेत, स्थानिक लोकांना भेटायचं आहे आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे" असं त्रिशूरमधील वलसला मेनन यांनी म्हटलं आहे. आताच त्या दोघी युरोपची ट्रीप करून आल्या आहेत.
बकेट लिस्टमध्ये होतं स्वित्झर्लंड
प्रत्येक प्रवास हा त्यांच्यासाठी मेडिटेशनसारखा असतो, त्यांना सर्व आजार विसरण्यास मदत करतो. त्या त्यांची 'बकेट लिस्ट' नेहमीच तपासत असतात. "आम्ही आमच्या युरोप ट्रीप दरम्यान आठ देशांना भेट दिली. मी जेव्हा काश्मीरला फिरायला गेले होते तेव्हापासूनच स्वित्झर्लंड माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं. म्हणून, तिथे जाण्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. आमचा नातू गौतम जर्मनीमध्ये काम करतो. त्याने या ट्रीपचं प्लॅनिंग केलं कारण त्याला त्याचं कामाचं ठिकाण पाहायचं होतं" असं रमानी यांनी म्हटलं आहे.
वयाच्या सत्तरीनंतर सुरू केला प्रवास
वलसला या त्रिशूर येथील अकाउंट जनरल (एजी) कार्यालयात काम करत होत्या. तरुण असतानाच त्यांच्या पतीचं निधन झालं. निवृत्तीनंतर त्या आपल्या बहिणीसोबत राहायला आल्या. याच काळात प्रवास करण्याचं, वेगवेगळी ठिकाणं फिरण्याची इच्छा पुन्हा जागृत झाली. वयाच्या सत्तरीनंतर बहिणींनी प्रवास करण्यास सुरुवात केली. "'अध्यात्मिका प्रबोधन संगम' या एका आध्यात्मिक ग्रुपसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत भारतातील काशी, बद्रीनाथ आणि द्वारका यासह अनेक पवित्र स्थळांना भेट दिली" असं वलसला यांनी सांगितलं.
जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन
बहिणींनी आपल्या कुटुंबियांसह कंबोडिया, सिंगापूर, व्हिएतनाम, नेपाळ, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका यासह अनेक देशांना भेट दिली आहे. त्यांचा हा उत्साह पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. परदेशी लोकांनी आदराने स्वागत केलं तेव्हा दोन्ही आजींना खूप आनंद झाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. वलसला आणि रमानी या दोघींकडे जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यांचं लाईफस्टाईल देखील उत्तम असल्याने त्यांना सामान्य आजारांपासून दूर राहण्यास मदत झाली असल्याचं देखील नातेवाईकांनी म्हटलं आहे.