Join us

अभिमानास्पद! दुर्गम भागातल्या शेतकऱ्याच्या लेकीची कमाल, हार्वर्डची शिष्यवृत्ती मिळवत अर्थशास्त्राची घेतेय पदवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 20:21 IST

सीमा कुमारीने संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

झारखंडमधील दाहू या छोट्याशा गावची लेक सीमा कुमारीने संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. घरची बेताची परिस्थिती, असंख्य अडचणी असूनही तिने उत्तुंग भरारी घेत दमदार कामगिरी केली आहे. दाहू गावातील या लेकीने केवळ तिच्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण झारखंड आणि भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

एका छोट्या गावातून आलेल्या सीमाने हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवली आणि आता ती अर्थशास्त्रात पदवी मिळवणार आहे. तिचा हा संघर्षमयी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. हार्वर्ड विद्यापीठातील तिच्या या कामगिरीवरून हे सिद्ध होतं की, कठोर परिश्रम कधीही वाया जात नाहीत. झारखंडची मुलगी सीमा कुमारी हार्वर्ड विद्यापीठात कशी पोहोचली ते जाणून घेऊया....

आई-वडील होते शेतकरी

सीमा कुमारीचा जन्म झारखंडमधील दाहू गावात झाला, जिथे फारसा विकास झालेला नाही. तिचे आईवडील शेतकरी आहेत आणि तिच्या कुटुंबात शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. गावात अनेक गोष्टींची कमतरता असूनही सीमाला लहानपणापासूनच शिक्षणाची, खेळाची आवड होती.

सीमाला खेळ आणि शिक्षणात रस

सीमाच्या आयुष्यात मोठा बदल झाला जेव्हा ती YUWA NGO मध्ये सामील झाली आणि फुटबॉल खेळायला लागली. युवा संस्था झारखंडमधील मुलींना खेळ आणि शिक्षणाद्वारे सक्षम बनवते. २०१२ मध्ये या फुटबॉल संघात सामील झाल्यानंतर, सीमाने खिलाडूवृत्तीसह नेतृत्व कौशल्ये विकसित केली. फुटबॉल खेळण्यासोबतच तिने अभ्यासही सुरू ठेवला. 

फुटबॉल कोच म्हणून काम करून फीसाठी जमा केले पैसे

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. सीमाने फुटबॉल कोच म्हणून काम केलं आणि आपल्या फीसाठी पैसे जमा केले, शिक्षण घेतलं. सीमाच्या कठोर परिश्रमाचं आणि समर्पणाचं फळ तिला अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाल्यावर मिळालं. पण तिची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे तिला हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राची पदवी पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. सीमा आता अर्थशास्त्रात पदवी मिळवणार आहे. तिच्या कुटुंबीयांना तिचा खूप अभिमान वाटत असून तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी