चीनच्या हेनान प्रांतातील रहिवासी असलेली २७ वर्षीय ली यायुन इंटरनेटवर ली फुगुई नावाने ओळखली जाते. आज तिचे सोशल मीडियावर ७० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण या यशामागे एक संघर्षमयी गोष्ट लपलेली आहे. लीने वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी घरातील काम करायला सुरुवात केली आणि वयाच्या १५ व्या वर्षी तिच्या पालकांची काळजी घेण्यासाठी शाळा सोडली.
लीची आई पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहे, तर तिच्या वडिलांची मानसिक स्थिती ६ वर्षांच्या मुलासारखी आहे. लीने लहानपणापासूनच कुटुंबासाठी काम करायला सुरुवात केली. कधी सेल्सगर्ल म्हणून, कधी बार्बेक्यू स्टॉलवर आणि कधी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं.
वयाच्या १९ व्या वर्षी लीचं लग्न झालं. परंतु एका वर्षाच्या आत तिच्या पतीने तिच्या पालकांची काळजी घेण्यास नकार दिला, ज्यामुळे घटस्फोट झाला. २०२० मध्ये तिच्या आजीच्या निधनानंतर, लीने तिच्या आजोबांसोबत तिच्या पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली. तेव्हापासून तिने तिचं संपूर्ण आयुष्य तिच्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी समर्पित केलं.
ली आता गावांमध्ये छोट्या गाडीतून टोफू, कोल्ड नूडल्स, भाज्या आणि बेकरी प्रोडक्ट विकते. ती अनेकदा वृद्धांना मोफत वस्तू देते. "मी हे पैशासाठी करत नाही, मला फक्त त्यांचं जगणं सोपं करायचं आहे" असं ती नेहमीच म्हणते.
ली सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होतात. व्हिडिओमध्ये, ती वृद्धांसोबत गहू सुकवताना, फोन दुरुस्त करताना, त्यांना कॉल करण्यास मदत करताना दिसते. लोक तिला त्यांच्या मुलीसारखे वागवतात आणि कधीकधी तिला जेवणासाठी आमंत्रित करतात. इतरांची काम करणाऱ्या आणि आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या ली पासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.