जर एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी असेल आणि तुम्ही त्यासाठी खूप कष्ट करत असाल तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळते असं म्हणतात. असंच काहीसं वीणा साहूमडेसोबत झालं आहे. बलोड जिल्ह्यातील जमरुवा गावातील शेतकरी चेतन साहूमडे यांची लेक वीणा हिचं लष्करात भरती होण्याचं मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. आता ती अंबाला येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहे.
देशातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना वीणा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहे. तीन महिन्यांच्या ड्युटीनंतर वीणा जेव्हा घरी आली तेव्हा संपूर्ण गावाने तिचं जोरदार स्वागत केलं. या आनंदाच्या क्षणी शेतकरी आई-वडिलांसह वीणाचेही डोळे पाणावले. "हे आनंदाश्रू आहेत. मुलगी लेफ्टनंट झाल्याने आम्हाला खूप जास्त आनंद झाला आहे. कुटुंबासह तिने संपूर्ण गावाचीच मान अभिमानाने उंचावली आहे" असं वीणाच्या वडिलांनी म्हटलं.
छत्तीसगडमधील एका दुर्गम खेड्यातून आलेल्या वीणाचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय होता. तिला आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु तिने कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. १२ वर्षांची असताना ती शाळेत जाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर सायकल चालवायची. उच्च शिक्षणासाठी देखील तिला प्रवास करावा लागला.
"आम्ही पाच बहिणी आहोत आणि मुलींची लग्नं लवकर व्हावीत अशी अनेकदा अपेक्षा असते, पण माझ्या वडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. मी सध्या अंबाला येथे मिलिटरी नर्सिंग ऑफिसर म्हणून तैनात आहे. मी १६ सप्टेंबरला रुजू झाले. तीन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर माझं काम सुरू झालं."
"मला असं वाटतं की, यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली ही तुमची मेहनत आहे. संघर्षाबद्दल बोलायचं झालं तर मला सुरुवातीपासूनच अभ्यासाची आवड होती. माझे वडील उच्च शिक्षण घेऊ शकले नाहीत. पण त्यांनी मला नेहमीच प्रेरणा दिली" असं वीणाने म्हटलं आहे. सर्व पालकांनी आपला मुलींना शिकवलं पाहिजे असं वीणाच्या पालकांनी म्हटलं आहे.