Join us
Daily Top 2Weekly Top 5

Namami Bansal : परिस्थितीवर मात, मेहनतीची साथ! भांडी विकणाऱ्याच्या मुलीची गरुडझेप, जिद्दीने झाली IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 14:40 IST

Namami Bansal : नमामि बन्सल यांचा जन्म उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला. त्यांचे वडील राजकुमार बन्सल शहरात भांड्याचं एक छोटं दुकान चालवतात.

उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या एका छोट्या गल्लीतून बाहेर पडून देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नसतो. पण जर ध्येय मजबूत असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर परिस्थितीही मार्ग दाखवते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे आयएएस अधिकारी नमामि बन्सल यांची. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी परिस्थितीची नाही तर हिमतीची गरज असते.

नमामि बन्सल यांचा जन्म उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला. त्यांचे वडील राजकुमार बन्सल शहरात भांड्याचं एक छोटं दुकान चालवतात. या दुकानातून मिळणारं उत्पन्न घरखर्च चालवण्यापुरतंच मर्यादित होतं. मोठी स्वप्ने पाहण्यासाठी त्यांच्याकडे ना पैसा होता, ना कोणत्याही सुखसोयी. मात्र नमामि यांच्यामध्ये शिकण्याची प्रचंड जिद्द होती, जी त्यांच्यात बालपणापासूनच दिसून येत होती.

शालेय जीवनापासूनच नमामि अभ्यासात अतिशय हुशार होत्या. त्यांनी १० वी मध्ये ९२ टक्के आणि १२ वी मध्ये ९५ टक्के गुण मिळवले. उत्तम गुणांमुळे त्यांची निवड दिल्लीच्या प्रतिष्ठित 'लेडी श्रीराम कॉलेज'मध्ये झाली. कोणत्याही विद्यार्थ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असते, पण नमामि यांच्यासाठी ही एका नवीन जबाबदारीची सुरुवात होती. तिथून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली.

अभ्यासासोबतच नमामि नेहमी आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीचाही विचार करत असत. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण सुरूच ठेवलं आणि एम.ए. (MA) मध्येही चमकदार कामगिरी केली. मुक्त विद्यापीठातून एम.ए. मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळालं, जे तत्कालीन राज्यपाल के.के. पॉल यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. हा क्षण त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद होता.

कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नमामि यांनी शिक्षणानंतर नोकरी सुरू केली. याच काळात त्यांच्या मनात देशाची सेवा करण्याचं स्वप्न अधिक प्रबळ झालं. त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी बनायचं होतं. नमामि यांनी हार मानली नाही. त्यांनी नोकरी सांभाळूनच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. कोणतेही कोचिंग न लावता स्वतः पुस्तकं वाचली, स्वतःच्या नोट्स काढल्या आणि दररोज आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत राहिल्या. 

दिवसभर नोकरी केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे हा त्यांचा नित्यक्रम झाला होता. अखेर २०१७ मध्ये त्यांच्या कष्टाला फळ मिळालं. चौथ्या प्रयत्नात नमामि बन्सल यांनी यूपीएससी परीक्षेत संपूर्ण देशात १७ वा क्रमांक पटकावला आणि त्या आयएएस अधिकारी बनल्या. हा विजय केवळ त्यांचा नव्हता, तर मर्यादित साधनांमुळे आपल्या स्वप्नांना मुरड घालणाऱ्या त्या सर्व लोकांसाठी हा एक आशेची किरण ठरला आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी