Join us

जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:00 IST

केरळची मालविका जी नायर, ऑल इंडिया रँक ४५ मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) सामील होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी एकूण १,००९ उमेदवार यशस्वी झाले आहेत. या परीक्षेत असे अनेक उमेदवार देखील बसले होते जे आधीच प्रशासकीय सेवेत कार्यरत होते आणि चांगल्या रँकसाठी पुन्हा परीक्षेत बसले होते. त्यापैकी एक म्हणजे केरळची मालविका जी नायर, जिने ऑल इंडिया रँक ४५ मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) सामील होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

मालविकासाठी हा प्रवास सोपा नव्हता. मालविकाने सांगितलं की, तिच्या मुलाचा जन्म ३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला आणि अवघ्या १७ दिवसांनी २० सप्टेंबर रोजी तिने सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा दिली. त्यावेळी ती शारीरिकदृष्ट्या कमकुवत होती, परंतु तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने तिने हे आव्हान स्वीकारलं.

कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य

मालविकाने यापूर्वी २०२२ च्या परीक्षेत १७२ वा रँक मिळवला होता. ती सध्या आयआरएसमध्ये अधिकारी आहे आणि चाईल्ड केयर लिव्हवर आहे. तिने पत्रकारांना सांगितलं की, "हा माझा शेवटचा प्रयत्न होता आणि देवाच्या कृपेने मी आयएएस होऊ शकले. हा खूप कठीण प्रवास होता, परंतु गेल्या वेळचा अनुभव आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं."

पती आयपीएस अधिकारी

मालविकाचे पती नंदगोपाल एम हे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या ते मलप्पुरममध्ये प्रशिक्षण घेत आहेत. मालविका म्हणते, "नवजात बाळाची काळजी आणि अभ्यास यात संतुलन राखणं खूप आव्हानात्मक होतं. पण माझ्या पतीने आणि कुटुंबाने मला प्रत्येक पावलावर साथ दिली. विशेषतः मुलाखतीची तयारी करण्यात माझ्या पतीने महत्त्वाची भूमिका बजावली." 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी