Join us

२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:19 IST

मुलीसह नीट परीक्षेची तयारी केली आणि १४७ गुण मिळवून स्वप्न पूर्ण केलं. 

शिकण्यासाठी आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. तामिळनाडूतील एका ४९ वर्षीय फिजिओथेरपिस्टने सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या जागेवर प्रवेश मिळवून हे सिद्ध केलं. अमुथवल्ली मणिवन्नन यांनी आपल्या दृढ निश्चयाने स्वप्नं पूर्ण करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. मुलीसह नीट परीक्षेची तयारी केली आणि १४७ गुण मिळवून स्वप्न पूर्ण केलं. 

अमुथवल्ली यांना तेनकासीजवळील विरुधुनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांग कोट्यातून (पीडब्ल्यूडी) एमबीबीएसची सीट मिळाली, तर मुलगी एमबीबीएस प्रवेशासाठी जनरल काउंसलिंग राउंड सुरू होण्याची वाट पाहत आहे. नीट यूजीच्या दुसऱ्या प्रयत्नात मुलीने ४५० गुण मिळवले आहेत. मुलीपासून प्रेरित होऊन त्यांनी देखील नीटची तयारी सुरू केली. 

“माझ्या मुलीला नीटची तयारी करताना पाहून माझ्या महत्त्वाकांक्षा पुन्हा जागृत झाल्या आणि ती माझी सर्वात मोठी प्रेरणा होती. मी तिची पुस्तकं घेतली आणि परीक्षेची तयारी केली” असं अमुथवल्ली यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) विद्यार्थिनी एम. संयुक्ता हिने कोचिंग क्लासेस घेतले आणि यामुळे तिच्या आईलाही मदत झाली. 

“माझे वडील व्यवसायाने वकील होते आणि त्यांना मेडिकलमध्ये रस नव्हता पण माझ्या आईचं बॅकग्राऊंड मेडिकल असल्याने ती हे सगळं समजून घेऊ शकली” असं मुलीने सांगितलं. अमुथवल्ली म्हणाल्या की, त्यांनी ३० वर्षांपूर्वी एमबीबीएस कोसर्स प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी ते शक्य झालं नाही. त्याऐवजी त्यांना फिजिओथेरपीचा अभ्यास करावा लागला. आता ३० वर्षांनी स्वप्न पूर्ण झालं आहे. 

संयुक्ताने तिला तिच्या आईसोबत एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकायचं नाही असं म्हटलं आहे. यावर अमुथवल्ली यांनी प्रतिक्रिया देत "माझ्या मुलीची फक्त एकच अट होती की मी ज्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेत आहे तिथे प्रवेश घेऊ नये. कदाचित मी पाच वर्षे तिची मजा-मस्ती खराब करू नये, बरोबर ना?" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी