पंजाबच्या एका गरीब कुटुंबातील तीन बहिणींनी UGC NET परीक्षा एकत्रितपणे उत्तीर्ण केली आहे. रिम्पी कौर, बीअंत कौर आणि हरदीप कौर अशी या बहिणींची नावं आहेत. मनसा येथील या बहिणींनी वेगवेगळ्या विषयांमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतलेली ही परीक्षा दिली होती. २२ जुलै रोजी UGC NET चा निकाल जाहीर होताच त्यांच्या कुटुंबात फार आनंद झाला. मुली अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत.
परिस्थिती बेताची असतानाही मुलींनी हार मानली नाही. कधीकधी त्यांच्याकडे जेवण्यासाठी देखील पैसे नसायचे. कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी हे यश मिळवलं. फक्त सेल्फ स्टडीकरून त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत. मोठी बहीण रिम्पी कौरने कॉम्पूटर सायन्समध्ये NET उत्तीर्ण केली आहे. बीअंत कौरने इतिहासात आणि हरदीप कौरने पंजाबी भाषेत ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिघींनीही पहिल्यांदाच UGC NET परीक्षा दिली होती.
UGC NET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर असिस्टेंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करू शकतात. ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी पात्र ठरणाऱ्यांना संशोधन आणि पीएचडी करण्यासाठी दरमहा पैसे देखील मिळतात. २८ वर्षीय रिम्पी कौरने मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन्स (MCA) केलं आहे. बीअंत कौर २६ वर्षांची आहे. तिने इतिहासात मास्टर ऑफ आर्ट्स (MA) केलं आहे आणि हरदीप कौरने पंजाबीमध्ये MA केलं आहे. या तिन्ही बहिणींना एक लहान भाऊ देखील आहे. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे.
आई करते मजुरी
रिम्पी, हरदीप आणि बीअंत यांची आई मनजीत कौर या मजुरी करतात. रोज दुसऱ्यांच्या शेतात काम करण्यासाठी जातात. कुटुंबाने खूप कष्ट करून शिक्षणाचा खर्च केला. आर्थिक परिस्थिती वाईट असली तरी शिक्षण सोडलं नाही. आता तिन्ही बहिणींना असिस्टेंट प्रोफेसर म्हणून नोकरी हवी आहे.
मुलींना व्हायचंय पालकांचा आधार
रिम्पीने सांगितलं की, आमच्या पालकांनी आम्हाला मुलांसारखं वाढवलं. त्यांनी आमच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांना आम्ही स्वावलंबी व्हावं असं वाटत होतं. आम्ही नेट उत्तीर्ण होण्यासाठीही खूप कष्ट केले. आता नोकरी मिळवून पालकांना मदत करायची आहे. दोन वर्षे एका खासगी शाळेत शिक्षिका होती परंतु यूजीसी नेट परीक्षेची तयारी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडली. पालकांनी त्यांचं कर्तव्य बजावलं, आता त्यांना आधार देण्याची आमची वेळ आहे.