Join us

सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:35 IST

Varsha Patel : वर्षा पटेलचं लहानपणापासूनच अधिकारी होण्याचं मोठं स्वप्न होतं, परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.

मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) २०२४ चा निकाल १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाला, ज्यामध्ये मैहर येथील रहिवासी वर्षा पटेल हिने डेप्युटी सुपरिटेंडेट ऑफ पोलीस (DSP) पद मिळवलं. वर्षाची ही प्रेरणादायी गोष्ट फक्त यशच नाही तर संघर्ष, संयम आणि कुटुंबाचं महत्त्व देखील दर्शवतं. वर्षा अनेकांसाठी आता आदर्श ठरली आहे.  

वर्षा पटेलचं लहानपणापासूनच अधिकारी होण्याचं मोठं स्वप्न होतं, परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. २०१५ मध्ये वडिलांचे निधन झालं, त्यानंतर कुटुंबाला दमोह सोडून मैहरला यावं लागलं. परिस्थिती प्रतिकूल होती, तरीही वर्षाने अभ्यास सुरू ठेवला आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिली.

२०२४ ची परीक्षा वर्षासाठी खूप खास

२०१७ मध्ये वर्षाचं लग्न वाराणसीमध्ये संजय पटेलशी झालं. संजयने नोकरी सोडली आणि पत्नीला नीट तयारी करता यावी यासाठी इंदूरला पाठवलं. दरवर्षी वर्षा परीक्षा द्यायची, पण यश मिळालं नाही. २०२४ ची परीक्षा वर्षासाठी खूप खास होती. या काळात ती गर्भवती होती.

नवजात मुलीला कुशीत घेऊन मुलाखत

२२ जुलै २०२५ रोजी वर्षाने सी-सेक्शन ऑपरेशनद्वारे मुलगी श्रीजाला जन्म दिला. अवघ्या २६ दिवसांनी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी मुलाखतीची तारीख होती. जखमा अद्याप पूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या, तरीही वर्षा तिच्या नवजात मुलीला कुशीत घेऊन मुलाखतीसाठी पोहोचली.

वर्षा झाली डीएसपी

१२ सप्टेंबर २०२५ रोजी निकाल आला तेव्हा वर्षा डीएसपी झाली. विशेष म्हणजे तिने महिला वर्गात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या संघर्ष आणि समर्पणामुळे आज लोक तिला "सुपर मॉम" म्हणून ओळखतात. कठीण परिस्थिती आणि अपयश येत असताना धैर्य आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं हे वर्षा पटेलने दाखवून दिलं आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी