कोणत्याही व्यवसायासाठी केवळ पैसा नाही, तर एका वेगळ्या विचाराची गरज असते. जगातील अनेक दिग्गज उद्योजकांनी ही गोष्ट वारंवार सांगितली आहे. असाच काहीसा पराक्रम उत्तर प्रदेशातील रहिवासी पूजा कौलने करून दाखवला आहे. तिने गाढविणीच्या दुधापासून स्किनकेअर स्टार्टअप सुरू केले. विशेष म्हणजे या व्यवसायाची सुरुवात अवघ्या २६ हजार रुपयांपासून केली होती, जे पैसे तिने गोव्याला फिरायला जाण्यासाठी साठवले होते. आज पूजा आपल्या या व्यवसायातून वर्षाला लाखो रुपये कमवत आहे.
पूजा कौल 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' (TISS) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होती. एक दिवस ती महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये सरकारी बसने प्रवास करत होत. त्यावेळी तिला कॉलेज प्रोजेक्टचे टेन्शन होतं. हा एक 'पायलट स्टडी' प्रोजेक्ट होता, ज्याने करिअरला दिशा दिली. तिची नजर गाढवांकडे गेली. जे आपल्या मालकासोबत चालले होते. हे पाहून तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.
गाढविणीचं दूध हे पोषक तत्वांनी युक्त असल्याचं म्हटलं जातं. यातूनच पूजाच्या 'ऑर्गेनिको' (Organiko) या स्टार्टअपचा जन्म झाला. ही एक सामाजिक संस्था आहे, ज्याद्वारे गाढविणीच्या दुधाचा वापर करून हाताने बनवलेली सस्टेनेबल स्किनकेअर उत्पादने तयार केली जातात. हे दूध केवळ वेगळंच नाही, तर पोषकतत्व भरपूर असतात. आयुर्वेदात याचा वापर श्वसन आणि पोटाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
सध्याच्या स्किनकेअर उद्योगात, जखमा भरणे आणि वृद्धत्व रोखण्याच्या गुणधर्मांमुळे याला मोठी मागणी आहे. पूजाने विचार केला की, हे दूध थेट पिण्यासाठी विकण्यापेक्षा त्याचा वापर स्किनकेअर उत्पादनांमध्ये केला तर एक मोठी बाजारपेठ तयार होईल. पूजाला घरी साबण बनवण्याचा छंद होता. आपल्या आजी आणि आईकडून शिकलेल्या कलेचा वापर करून तिने गाढविणीच्ं दूध आणि आयुर्वेदिक तेलांपासून केमिकल फ्री'हँडमेड' साबण बनवायला सुरुवात केली. हे साबण त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
आज 'ऑर्गेनिको'कडे हाताने बनवलेल्या साबणांपासून फेस पॅकपर्यंत अनेक उत्पादनं आहेत. आता ती सनस्क्रीन, क्रीम आणि सीरम क्षेत्रात विस्तार करण्याची योजना आखत आहे. पूजा सांगते की, त्या दरमहा ५०० पेक्षा जास्त उत्पादनं विकत. एका उत्पादनाची किंमत ३५० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहे. यातून ती वर्षाला लाखो रुपयांची कमाई करत आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायामुळे तिने गाढव पाळणाऱ्या अनेक कुटुंबांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिलं आहे.
