जेव्हा तुम्ही मोठी स्वप्नं पाहता तेव्हा तुम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील रहिवासी अनुष्का जयस्वालनेही हेच सिद्ध केलं आहे. २०१७ मध्ये दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये प्लेसमेंट सुरू होती. अनुष्काला चांगली नोकरी मिळण्याची आशा होती, पण तिने एकही ऑफर स्वीकारली नाही. अनुष्काचं एकच ध्येय होतं ते म्हणजे तिला शेतीमध्ये काहीतरी मोठं करायचं होतं.
अनुष्काने सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये फ्रेंचचा अभ्यास केला, परंतु तिथे तिला समाधान मिळाले नाही, म्हणून ती तिच्या घरी परतली. तिच्या आयुष्यात एक महत्त्वाचा क्षण आला जेव्हा तिने तिच्या गच्चीवर टोमॅटोसह काही रोपं लावली. तिला कामाचा आनंद मिळू लागला आणि ती शेतीचा करिअर म्हणून विचार करू लागली. आज ती दरवर्षी तब्बल १ कोटी कमावते.
शेतीमध्ये आवड
भावाने अनुष्काला यासाठी प्रोत्साहन दिलं. त्याच्या प्रोत्साहनामुळे तिने नोएडा येथील इन्स्टीट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये हॉर्टिकल्चरचा कोर्स केला. शेतीशी संबंधित इतर अनेक कोर्स पूर्ण केल्यानंतर शेतीमध्ये आवड आणखी वाढली. २०२० मध्ये एक एकर जमिनीवर पॉलीहाऊस फार्म सुरू केलं. गेल्या पाच वर्षांत तिने लखनौ आणि आसपासच्या भागात तिच्या खास भाज्यांमुळे नावलौकिक मिळवला आहे.
२०० टनपेक्षा जास्त शिमला मिरचीचे उत्पादन
अनुष्काने काकड्यांची शेती सुरू केली. तिने ५१ टन उत्पादन मिळवले. पारंपारिक शेतकऱ्यांनी मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा हे जवळजवळ तिप्पट आहे असा तिचा दावा आहे. सुरुवातीच्या यशाने प्रोत्साहित होऊन, तिने लाल आणि पिवळ्या शिमला मिरच्या देखील लावल्या. तिने एक एकर जमिनीवर ३५ टन शिमला मिरची पिकवली, जी तिने सरासरी ८० ते १०० रुपये प्रति किलो या किमतीत विकली. आता ती दरवर्षी २०० टनपेक्षा जास्त शिमला मिरचीचे उत्पादन करते.
२५-३० कामगारांना रोजगार
अनुष्का ६ एकरपेक्षा जास्त जमिनीवर भाजीपाला पिकवते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३-२४ मध्ये तिचा टर्नओव्हर १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तिच्या भाज्या ब्लिंकिट आणि बिग बास्केट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तसेच लुलू हायपरमार्केट सारख्या दुकानांमध्ये विकल्या जातात. तिच्या भाज्या दिल्ली आणि वाराणसीमधील बाजारपेठांमध्ये देखील निर्यात केल्या जातात. ती २५-३० कामगारांना रोजगार देते, ज्यात बहुतेक महिला असतात.
