भारतीय महिला घर, कुटुंब आणि समाजातील अडथळे पार करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. याच दरम्यान तेन्झिन यांग्की यांनी अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा इतिहास रचला आहे. यूपीएससी सीएसई २०२२ मध्ये ५४५ वा रँक मिळवणं हे त्यांच्यासाठी केवळ एक स्कोअरकार्ड नव्हतं तर अरुणाचल प्रदेशातील हजारो मुलींसाठी ते एक खुलं आव्हान होतं की, मोठी स्वप्न पाहणं हा काही गुन्हा नाही.
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा देखील यामुळे इम्प्रेस झाले आहेत. भावी पिढ्यांना मार्ग दाखवण्यासाठी अंधारात सर्वात आधी चालणारी एकमेव मशालवाहक म्हटलं. जेव्हा तेन्झिन यांग्की ३६% महिला अधिकाऱ्यांसोबत हैदराबाद पोलीस एकॅडमीमध्ये दाखल झाल्या, तेव्हा ती एक क्रांती होती. भारताच्या मुली आता देशाची सेवा करण्यासाठी फ्रंटलाईनवर आहेत हा संदेश दिला.
तेन्झिन यांग्की राष्ट्रीय सेवेत असलेल्या कुटुंबातून येतात. वडील थुप्टेन टेम्पा हे माजी आयएएस अधिकारी आणि मंत्री होते. तेन्झिन यांची आई देखील निवृत्त सरकारी सचिव आहेत. घरी प्रशासकीय शिस्तीचं वातावरण असूनही, यांग्कीने यांनी अवघड मार्ग निवडला. २०१७ मध्ये एपीपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा त्यांचा मागील अनुभव राष्ट्रीय सेवेबद्दल आणि परीक्षेच्या तयारीबद्दलची त्यांची आवड दर्शवितो. त्यांनी आपल्या पालकांचा वारसा पुढे चालवला, आयपीएस अधिकारी बनून कौतुकास्पद कामगिरी केली.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी तेन्झिन यांग्की यांच्या यशावर एक खास पोस्ट शेअर केली. यांग्की यांचं कौतुक केलं. तेन्झिन यांग्की यांच्यापासून अनेक महिलांना आता प्रेरणा मिळत आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अशक्यही गोष्टी शक्य करता येतात हे दाखवून दिलं आहे.
