Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:11 IST

आकृती शुक्ला हिने राज्यात तिसरा रँक पटकावत 'डेप्युटी एसपी' पद मिळवलं आहे, तर तिची वहिनी श्रेया शर्मा हिने ३७ व्या रँकसह 'कमर्शियल टॅक्स ऑफिसर' बनून कुटुंबाचा गौरव वाढवला आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य गोष्टी सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. नणंद आणि भावजयीच्या जोडीने एकत्र यशाचा झेंडा फडकवला आहे. UPPSC मध्ये इतिहास रचला आहे. प्रयागराजच्या आकृती शुक्ला हिने राज्यात तिसरा रँक पटकावत 'डेप्युटी एसपी' (DSP) पद मिळवलं आहे, तर तिची वहिनी श्रेया शर्मा हिने ३७ व्या रँकसह 'कमर्शियल टॅक्स ऑफिसर' बनून कुटुंबाचा गौरव वाढवला आहे.

ही गोष्ट केवळ दोन पदांची नसून, स्वप्नांवरील अढळ विश्वास आणि कौटुंबिक सहकार्याची आहे. श्रेया शर्मा बंगळुरूमध्ये 'सीएजी' (CAG) कार्यालयात ऑडिटर म्हणून कार्यरत होत्या, पण त्यांच्या मनात प्रशासकीय सेवेबद्दल नेहमीच ओढ होती. लग्नानंतर जेव्हा त्या सासरी आल्या, तेव्हा त्यांना नणंद आकृती शुक्लाच्या रूपाने एक उत्तम 'स्टडी पार्टनर' मिळाली. दोघांनी केवळ नोट्सच शेअर केल्या नाहीत, तर एकमेकींचा आत्मविश्वासही वाढवला. आज जौनपुर आणि प्रयागराजमधील हे कुटुंब आपल्या या दोन बहादूर अधिकाऱ्यांच्या यशावर अभिमान व्यक्त करत आहे.

ऑडिटरच्या नोकरीपासून टॅक्स ऑफिसरपर्यंतचा प्रवास

श्रेया शर्मा यांच्यासाठी हे यश त्यांच्या तिसऱ्या प्रयत्नाचं फळ आहे. रेल्वे कर्मचारी संजय शर्मा आणि निर्मला शर्मा यांची मुलगी असलेल्या श्रेया बंगळुरूमध्ये ऑडिटर होत्या. नोकरी असूनही प्रशासकीय सेवेत जाण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यांचे पती अमित शुक्ला (AI इंजिनिअर) आणि सासरच्या मंडळींनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. लग्नानंतर श्रेया यांनी नणंद आकृतीसोबत तयारी सुरू केली, जो त्यांच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' ठरला.

जिद्द आणि मार्गदर्शनाच्या जोरावर यश

प्रयागराजच्या आकृती शुक्लाने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ऐतिहासिक यश मिळवलं आहे. तिचे वडील अखिलेश कुमार शुक्ला संरक्षण विभागातून निवृत्त झाले आहेत, तर आई कांचन शुक्ला गृहिणी आहेत. आकृतीसाठी हा प्रवास सोपा नव्हता. संघर्षाच्या काळात अनेकदा तिला वाटलं की आपण हे करू शकणार नाही. वहिनी श्रेया घरी आल्यानंतर घराचं वातावरण एखाद्या 'अकॅडमी'सारखं झालं. दोघी तासनतास चर्चा करायच्या आणि एकमेकींच्या चुका सुधारायच्या. कुटुंबानेही या दोघींना घरकामातून मुक्त ठेवून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची संधी दिली.

तयारीदरम्यान एकदा आकृती पूर्णपणे खचली होती आणि तिने अभ्यास सोडण्याचा विचार केला होता. अशा कठीण काळात तिचे काका शेषधर शुक्ला (निवृत्त पीसीएस अधिकारी) तिच्या मदतीला धावून आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि वहिनीच्या साथीमुळे आकृती आज राज्याच्या टॉपर्सच्या यादीत झळकली आहे.

यशाचा मंत्र

समाजात नणंद-भावजयीच्या नात्याबद्दल अनेकदा नकारात्मक धारणा असतात, पण आकृती आणि श्रेयाने त्या सर्व खोट्या ठरवल्या आहेत. दोघांनी एकमेकींच्या नोट्स वापरल्या, मॉक इंटरव्यूचा सराव केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकींचा विश्वास कमी होऊ दिला नाही. आता वहिनी श्रेया टॅक्स विभागाची धुरा सांभाळणार आहे, तर मुलगी आकृती पोलीस सेवेच्या माध्यमातून समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sister-in-law duo shines: DSP and Tax Officer, a success story!

Web Summary : Sister-in-laws, Akruti Shukla became DSP & Shreya Sharma, a tax officer, cracking UPPSC. They supported each other, turning their home into an academy, showcasing family support and shared dreams.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी