Join us

Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 14:20 IST

IPS Shalini Agnihotri : शालिनीने कोणालाही न सांगता, मोठ्या शहरात कोचिंगची मदत न घेता स्वतःहून यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तिने ऑल इंडिया २८५ रँक मिळवला आणि आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील रहिवासी शालिनी अग्निहोत्रीने असंख्य अडचणींवर मात करत खूप मेहनतीने मोठं यश मिळवलं आहे. शालिनीचे वडील हिमाचल रोडवेजमध्ये बस कंडक्टर होते. घरची परिस्थिती बेताची होती. अशा परिस्थितीत शालिनीने कोणालाही न सांगता, मोठ्या शहरात कोचिंगची मदत न घेता स्वतःहून यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तिने ऑल इंडिया २८५ रँक मिळवला आणि आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

एका मुलाखतीत शालिनीने सांगितलं की, एका वेदनादायक अनुभवानंतर हे स्वप्न साकार झालं. एकदा ती तिच्या आईसोबत प्रवास करत होती, तेव्हा कोणीतरी तिच्या आईशी गैरवर्तन केलं. त्यावेळी शालिनीला असहाय्य वाटत होतं. त्याच दिवशी तिने ठरवलं की तिला अशा पदावर पोहोचायचं आहे जिथून ती या व्यवस्थेत बदल घडवू शकेल. त्या क्षणाने तिच्या आयुष्याची दिशा ठरवली.

धर्मशाळा येथून शालेय शिक्षण घेतलेली शालिनी सुरुवातीपासूनच अभ्यासात हूशार होती. दहावीत ९२% आणि बारावीत ७७% गुण मिळवल्यानंतर तिने हिमाचल प्रदेश विद्यापीठातून कृषी विषयात पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पण तिच्या मनात नेहमीच नागरी सेवांमध्ये सामील होण्याचे ध्येय होतं.

स्वतः अभ्यास केला, ऑनलाईन मदत घेतली आणि कधीही तिचा फोकस ढळू दिला नाही. २०११ मध्ये तिने पहिल्यांदाच यूपीएससी उत्तीर्ण केली आणि आयपीएस म्हणून निवड झाली. तिने पुढच्या वेळी पुन्हा परीक्षा दिली आणि पुन्हा यशस्वी झाली.

आज शालिनी फक्त एक अधिकारी नाही तर मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस करणाऱ्या हजारो तरुणांना प्रेरणा देत आहे. शालिनीने तिच्या कठोर परिश्रमातून हे सिद्ध केलं आहे की, कोचिंग आवश्यक नाही, परंतु जर हेतू स्पष्ट असेल तर प्रत्येक ध्येय साध्य करणं सोपं होतं. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी