भारताच्या १८ वर्षीय शीतल देवीने चीनमधील ग्वांगझू येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शीतल देवी हातांशिवायही अचूक निशाणा साधून गोल्ड मेडल जिंकणारी पहिली पॅरा तिरंदाज ठरली आहे. शीतल देवीने तुर्कीची नंबर १ तिरंदाज ओझनूर क्यूर गिर्डीचा पराभव करून गोल्ड मेडल जिंकलं.
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताची शीतल देवी आणि तुर्कीची ओझनूर क्यूर गिर्डी यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. विजेतेपदाच्या पहिल्या फेरीत दोन्ही पॅरा तिरंदाजाने २९-२९ असा स्कोर केला. त्यानंतर शीतलने दुसऱ्या फेरीत आघाडी घेण्यास सुरुवात केली, सलग तीन वेळा १०-१० शॉट्स मारत ३०-२७ अशी आघाडी घेतली.
SHEETAL DEVI IS WORLD PARA CHAMPION! 🥇🇮🇳
— World Archery (@worldarchery) September 27, 2025
18-year-old beats the reigning champion Oznur Cure in Gwangju.#WorldArchery#ParaArcherypic.twitter.com/d5jDmdYkhq
तिसऱ्या फेरीत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली आणि ती २९-२९ अशा बरोबरीत संपली. चौथ्या फेरीत शीतलने एकूण २८ गुण मिळवले, तर तुर्कीची खेळाडू ओझनूर क्यूर गिर्डीने २९ गुण मिळवले. चार फेऱ्यांनंतरही एकूण स्कोर ११६-११४ होता, शीतल अजूनही दोन गुणांनी आघाडीवर होती.
सामन्याच्या अंतिम फेरीवर सर्वांचे लक्ष होतं, जिथे १८ वर्षीय शीतल देवीने उत्कृष्ट ऐतिहासिक कामगिरी करत तिच्या तीन शॉट्समध्ये एकूण ३० गुण मिळवून गोल्ड मेडल जिंकलं. पाचव्या फेरीच्या शेवटी शीतलचा स्कोर १४६ होता, तर तुर्कीची खेळाडू ओझनूर क्यूर गिर्डी १४३ गुणांसह सिल्व्हर मेडल जिंकण्यात यशस्वी झाली. शीतल ही या स्पर्धेत हात नसलेली एकमेव पॅरा-तिरंदाज आहे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी शीतल पाय आणि हनुवटीचा वापर करते.