प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. ओडिशातील चंपाझार गावात राहणाऱ्या २६ वर्षीय संगीता मांझी ही गृहिणी आता एक यशस्वी उद्योजिका झाली आहे. यामुळे संगीताचं आयुष्यच बदलून गेलं आहे. वयाच्या २० व्या वर्षी तिने प्राथमिक शाळेतील शिक्षाशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांच्या सहा जणांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
२०१७ मध्ये संगीता प्रदान आणि संयुक्त राष्ट्र महिलांच्या सेकंड चान्स एज्युकेशन कार्यक्रमांतर्गत 'सारथी' बनली, ज्याचा उद्देश कौशल्य विकासाद्वारे महिलांना सक्षम करणं हा होता. कोरोनाच्या साथीदरम्यानच तिने मुलाला जन्म दिला. यानंतर स्थानिकांना आवडणारा पफ्ड राईस म्हणजेच कुरमुरे खाऊन प्रेरित होऊन तिने स्वतःचं उत्पादन युनिट सुरू करण्याचा विचार केला. प्रदानच्या रंग दे उपक्रमातून ३० हजार कर्ज घेऊन तिने पफ्ड राईस रोस्टर मशीन खरेदी केली.
व्यवसायाची मासिक उलाढाल ४० हजार
सुरुवातीला गावकऱ्यांनी व्यवसाय चालवण्याच्या महिलेच्या क्षमतेबद्दल शंका घेतली. पण संगीताने हार मानली नाही. जिद्दीने ती पुढे गेली. YouTube ट्यूटोरियलद्वारे हा व्यवसाय शिकली आणि हे काम सुरळीत चालण्यासाठी एका अनुभवी कामगाराला नियुक्त केलं. आज तिच्या व्यवसायाची मासिक उलाढाल ४० हजार आहे. ज्यातून तिला २२ हजारांचा साधारण नफा होतो.
मुलाच्या शिक्षणासाठी घेतला पुढाकार
संगीता तिच्या उत्पादनांचं मार्केटिंग करण्यासाठी फेसबुक आणि व्हॉट्सएप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करते, तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी तिने पुढाकार घेतला आहे. तसेच ती आपल्या कुटुंबाला देखील मदत करते. व्यवसायातील यशाव्यतिरिक्त, संगीता तिच्या समुदायातील इतर महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देते. महिला सक्षमीकरणाबद्दल सांगते. काहीही अशक्य नसल्याचं ती नेहमीच म्हणत असते.