डॉ. नीलिमा पांडे (अध्यक्ष, साकार संस्था)
कुठेतरी एक बालक झुरते आहे पालकांसाठी! कुठेतरी एक दाम्पत्य आसुसले आहे बालकासाठी! दत्तक विधानाचा सेतू ह्या दोघांना एकत्र आणतो! साकार नावाच्या संस्थेत काम करणाऱ्या, त्यासाठी झटणाऱ्या सर्व महिला हेच करतात. नवजात अर्भकाला जन्माला घालूनही त्याचा सांभाळ करण्यास असमर्थ असलेल्या मातेला, काही वेळेला मातापिता दोघांनाही आणि काही वेळेला पित्यालाही आपलं बाळ अव्हेरावं लागतं. तेव्हा त्या बाळांना मायेची उब देणाऱ्या, दूध पाजणाऱ्या, त्यांचं हवं नको बघणाऱ्या छत्रपती संभाजी नगर येथील "साकार" संस्थेतील यशोदा माता. त्या आपल्या पोटच्या पोराप्रमाणे या बाळांचा सांभाळ करतात, त्यांना बाळसं कसं धरेल यासाठी झटतात, त्यांच्या आरोग्याची निगा राखतात आणि त्याला प्रेमळ आई-बाबा मिळो यासाठी प्रार्थनाही करतात!
साकार संस्थेत या यशोदा मातांनी संगोपन केलेल्या ६८८ बालकांपैकी ४३० हून अधिक बालकांचे योग्य कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले आहे. तीस वर्षांपूर्वी साकार संस्थेचं लावलेले हे रोपटे. सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेने शहरातील समविचारी व्यक्तींचा एक गट एकत्र आला आणि नकोश्या बालकांच्या जीवनात, सुख, आनंद फुलविण्याचं व्रत त्यांनी अंगीकारलं. हा समूह निराधार बालकांचे कायदेशीर दत्तक विधान करून त्यांना योग्य कुटुंबात पुनर्स्थापित करण्यासाठी झटू लागला.हीच मराठवाड्यातील पहिली शासनमान्य दत्तक विधान करणारी संस्था "साकार" म्हणून उदयास आली.
महिला बालविकास क्षेत्रात कार्य करण्याचा सेवाधर्म, समर्पणाच्या भावनेने स्वीकारून समाजास गुणवत्ता पूर्ण सेवा देण्यास हा समूह कटिबद्ध झाला. सुरुवातीच्या काळात मुंबई येथील इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ ऍडॉप्शन अँड चाईल्ड वेलफेअर या महिलाप्रणित संस्थेचा एक उपविभाग म्हणून कार्य १९९४ साली सुरू झाले. त्यावेळी दत्तक घेणे म्हणजे परक्याचं आपलंसं करणे ही संकल्पना मराठवाड्यासारख्या, पारंपरिक विचारसरणीने जखडलेल्या भागात रुजविणे हेच मोठे महत प्रयासाचे काम होते. संस्थेसमोर उभे ठाकलेले हे महान आव्हान सुकर झाले ते आपल्या शहरातील प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सविता पानट यांच्या पुढाकाराने! डॉ. म. ह. सावजी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुभाष श्रॉफ यांच्याबरोबरच डॉ.संजीव सावजी, डॉ.सविता पानट, प्रा. डॉ. नीलिमा पांडे, प्रज्ञा देशमुख, विजय जावरे आणि ऍड. कोरे, ही सगळी मंडळी मोठ्या हिरीरीने कामाला लागली.डॉ. सविता पानट, प्रा.नीलिमा पांडे या संस्थेच्या वाढ आणि विकासात आजही सक्रिय आहेत. दत्तक कार्याच्या प्रचार आणि प्रसाराशिवाय बाळ दत्तक घेण्याचा विचार आणि आचार, अपत्य विरहित दांपत्यांनी अंगीकारणे शक्यच नव्हते.
त्यासाठी शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञांना सुरू झालेल्या दत्तक सेवेबाबत सजग करणे, विवाहानंतर अर्भकाची चाहूल न लागलेल्या कुटुंबात दांपत्यांना दत्तकाचा पर्याय सुचवून तो अंगिकारण्यासाठी त्यांना प्रेरित करणे अशा महत्त्वाच्या कार्यात डॉ. सविता पानट यांचे मोठे योगदान होतेच. याशिवाय कुमारी मातांच्या अपत्यांना संस्थेमध्ये प्रवेश देऊन त्या नवजात शिशुंना सुरक्षा प्रदान करणे आणि त्या कुमारी मातेची आणि तिच्या पालकांची त्यांच्यावर ओढवलेल्या संकटातून सुटका करण्याचे जिकरीचे कार्य पुढे सविता पानट यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या महिला स्वयंसेवकांच्या समूहाने केले. या महिलांनी सुरवातीच्या काळात स्वतःला झोकून देऊन जो समाजसेवेचा वसा हाती घेतला, त्यामुळेच आज एक नावलौकिक घेऊन संस्था नावारूपाला आली.
या महिला स्वयंसेवकात, नीलिमा सुभेदार, ॲड. अर्चना गोंधळेकर, मंगल साधू , आशा नानीवडेकर, सीमा पारटकर, सुचित्रा देशपांडे आणि राधिका मुळे या सर्व महिलांचा आवर्जून उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. याबरोबरच पल्लवान्कुरचे सुहास वैद्य यांचेही मोलाचे योगदान संस्थेच्या पुढील वाटचालीत लाभले. प्रारंभीच्या काळात कुमारी मातेच्या किंवा नैसर्गिक पालकांची मनस्थिती हळुवारपणे हाताळून त्यांच्या दुःखावर फुंकर घालत त्यांनी ताबा सोडलेल्या अर्भकाच्या आरोग्याला अग्रक्रम दिला. या बाळांचे दत्तक कुटुंबात सादात्मिकरण होण्यासाठी दत्तकेच्छूक पालकांचे समुपदेशन करण्यातही ही महिला शक्ती व्यस्त राहत असे.
अनेक आव्हाने पेलत शासनाच्या नियमांचे काटेकोर रित्या पालन करत कमी वजनाचे, झुडपात सापडलेले, रेल्वेच्या डब्यात सापडलेली, अशा एक ना अनेक विदारक परिस्थितीतून प्रवेशित बालकांना प्रेमाचं कुटुंब मिळवून देण्यात संस्थेला यश प्राप्त झाले. गेली ३० हून अधिक वर्षे हे काम सुूरु आहे. दोन वर्षावरील बालकांसाठी संस्थेत त्यांच्या लहान सहान गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि बालमनावर योग्य ते संस्कार करण्यासाठी आयांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जातेच. महिला स्वयंसेवकांचे कामही अत्यंत मोलाचे आहे.
क्षितिज हा उपक्रम २००१ साली सुरू करण्यात आला. आत्तापर्यंत साडेतीन लाखाहून अधिक कुमारवयीन मुला-मुलींना याचा लाभ झाला आहे. प्रकल्पाची सुरुवात महिला वर्गानेच केली. वैशाली अवलगावकर, डॉ.स्मिता अवचार, डॉ. रोशन रानडे, मोना भुमकर, नीलिमा देशपांडे, उज्वला निकाळजे, नीना निकाळजे, अर्चना धोपे, विजु भोपे, डॉ. संजीवनी मुळे, वैशाली आठवले यांनी या प्रकल्पात काम केले.
सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या स्तरातील विद्यार्थ्यांसाठी लक्ष्य उपक्रम सुरु करण्यात आला.या प्रकल्पाचे नेतृत्व गौरी शब्दे करत आहेत.‘साकार’चे काम सुरु राहण्यासाठी अनेकांचे हातभार लागले. डॉ. सविता पानट, गौरी शब्दे, हेमा अहिरवाडकर, डॉ. वीणा पानट, सोनाली धोपटे यासाऱ्यांसह सर्व महिला स्वययसेविका लहान बाळांचं जगणं सुखकर साकार करण्यासाठी झटत आहेत. या संस्थेच्या कार्याला आर्थिक मदत करुन तुम्हीही हातभार लावू शकता.
संपर्क : साकार संस्थाhttps://sakar.org.in/91-9673101760 / 0240 2347099