प्रयागराजच्या निवेदिता यांनी बुद्धिमत्ता आणि जिद्दीने एक नवा अध्याय लिहिला आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने निवेदिता दुबे यांची भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या सदस्य (मानव संसाधन) पदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती केवळ त्यांच्या करिअरमधील मोठं यश नाही, तर या प्रतिष्ठित संस्थेच्या बोर्डात सामील होणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
निवेदिता दुबे ३१ मार्च २०३० पर्यंत या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सांभाळतील. शहरातील अशोक नगरच्या रहिवासी असलेल्या निवेदिता यांनी १९८७ मध्ये 'सेंट मेरीज कॉन्व्हेंट' (SMC) मधून शालेय शिक्षण आणि प्रयागराज विद्यापीठाच्या प्रतिष्ठित 'मेयो सेंट्रल कॉलेज'मधून शिक्षण पूर्ण केलं. त्या सुरुवातीपासूनच अत्यंत हुशार होत्या. त्यांनी विद्यापीठाच्या ख्यातनाम 'मोनिरबा' व्यवस्थापन संस्थेतून १९९४ मध्ये एमबीएची पदवी संपादन केली.
मानसशास्त्रज्ञ वडिलांकडून मिळालं निर्णयक्षमतेचं बाळकडू
निवेदिता यांचे वडील 'एसएसबी'मध्ये (SSB) मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडूनच निवेदिता यांना कठीण परिस्थितीतही शांत राहून अचूक निर्णय घेण्याचं कौशल्य वारसाहक्काने मिळालं. १९९५ मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या निवेदिता यांच्याकडे करिअरच्या सुरुवातीलाच देशातील सर्वात व्यस्त अशा आयजीआय (IGI) विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी एएआय (AAI) मध्ये 'लीड एचआर' म्हणून संघटनेला नवी दिशा दिली.
देशातील मुलींसाठी प्रेरणास्थान
पूर्व क्षेत्राच्या प्रादेशिक कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी पूर्व भारतातील विमानतळांच्या कामकाजात केवळ कार्यक्षमताच आणली नाही, तर तो विभाग तोट्यातून बाहेर काढून नफ्यात आणला. देशाच्या विमान क्षेत्रातील धोरणनिर्मिती आणि मानव संसाधन विकासाची धुरा आता अशा महिलेच्या हातात आहे, जिची मुळं संस्कारांशी जोडलेली आहेत आणि विचार आधुनिक आहेत. निवेदिता दुबे यांचा हा प्रवास देशातील अशा कोट्यवधी मुलींसाठी प्रेरणादायी आहे, ज्या आपल्या पात्रतेच्या जोरावर शिखरावर पोहोचण्याचं स्वप्न पाहतात.
जया वर्मा ठरल्या होत्या पहिल्या महिला 'सीआरबी'
अशाच प्रकारचं एक मोठं यश २०२३ मध्येही प्रयागराजच्या वाट्याला आलं होतं. त्यावेळी प्रयागराजच्याच जया वर्मा सिन्हा यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि सीईओ बनून इतिहास रचला होता. विशेष म्हणजे त्यांनीही आपलं शिक्षण सेंट मेरीज कॉन्व्हेंट आणि प्रयागराज विद्यापीठातूनच पूर्ण केलेलं आहे.
