जिद्द आणि स्वप्नांना कोणतीही सीमा नसते. माणूस कोणत्याही परिस्थितीत असला, तरी त्याने हिंमत हारली नाही आणि जिद्द कायम ठेवली, तर तो अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज साध्य करू शकतो. ओडिशामधील बालंगीर येथील १८ वर्षांच्या पायल नागची कहाणी याच जिद्दीचं सर्वोत्तम उदाहरण आहे.
बँकॉकमध्ये पार पडलेल्या 'वर्ल्ड आर्चरी पॅरा सीरिज २०२६' च्या फायनलमध्ये पायलने जगातील नंबर-१ पॅरा आर्चर आणि स्वतःची आदर्श असलेल्या शीतल देवीला १३९-१३६ अशा फरकाने हरवून सुवर्णपदक जिंकलं. पण हा विजय केवळ एका सामन्याचा नसून त्या मुलीचा आहे जिने आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटांवर मात केली आहे.
पायलच्या संघर्षाची गोष्ट
लहानपणी एका अपघातात ११,००० व्होल्टच्या हाय-टेंशन वायरच्या संपर्कात आल्यामुळे पायलने आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमावले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिला अनाथालयात पाठवण्यात आलं. परंतु, तिने हार मानली नाही. तिथे तिने तोंडात पेन पकडून चित्र काढायला सुरुवात केली आणि इथूनच तिच्या आयुष्याला नवं वळण मिळालं.
असं बदललं नशीब
पायलची मेहनत आणि जिद्द पाहून जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील आर्चरी अकादमीचे प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांनी तिला प्रशिक्षणासाठी बोलावलं. प्रशिक्षकांनी सांगितलं की, त्यांनी पायलचा चित्र काढतानाचा एक व्हायरल व्हिडीओ पाहिला होता आणि त्यानंतरच त्यांनी तिच्याशी संपर्क साधला. हात-पाय नसताना बाण चालवणं अशक्य वाटत होतं, परंतु खास डिझाइन केलेले सेटअप आणि सततच्या मेहनतीच्या जोरावर पायलने स्वतःला तयार केलं. पायल सांगते की, सुरुवातीला तिला तिरंदाजीबद्दल काहीही माहिती नव्हती, पण कुलदीप सरांनी तिला शिकवलं आणि पुढे नेलं.
सुवर्णपदक जिंकलं
बँकॉकमधील फायनलमध्ये जेव्हा पायलचा सामना तिच्याच आदर्शाशी (शीतल देवी) झाला, तेव्हा तिने उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला. या विजयासह पायल ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणारी जगातील पहिली 'क्वाड्रूपल एम्प्युटी' (ज्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाहीत अशी व्यक्ती) पॅरा आर्चर बनली आहे. विजयानंतर जेव्हा पोडियम सेरेमनीमध्ये राष्ट्रगीत वाजत होतं, तेव्हा पायलला तिची व्हीलचेअर वळवता येत नव्हती, तेव्हा शीतल देवी स्वतः पुढे आली आणि तिने पायलला मदत केली. हा क्षण स्पोर्ट्समनशिपचं एक सुंदर उदाहरण ठरला.
