क्रीडा जगतात अनेक प्रेरणादायी गोष्टी नेहमीच समोर येत असतात. पोलंडची पॅरा-एथलीट रोझा कोझाकोव्स्काने अशीच एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. सकाळी हॉस्पिटलच्या बेडवर असलेल्या रोझाने २०२५ च्या न्यू वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये संध्याकाळी गोल्ड मेडल जिंकून जगाला चकित केलं.
३० सप्टेंबर रोजी सकाळी रोझा अचानक हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध पडली. उलट्या आणि अशक्तपणा असल्याने उपचारासाठी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की तिला विश्रांतीची खूप आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीत खेळांमध्ये भाग घेणं धोकादायक असू शकतं.
खेळायचं हे मनाशी पक्क ठरवलं
रोझाने खेळायचं हे मनाशी पक्क ठरवलं होतं. तिने डॉक्टरांना सांगितलं, "मी येथे फक्त उपस्थित राहण्यासाठी नाही तर खेळण्यासाठी आले आहे." त्यानंतर तिने डॉक्टरांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची विनंती केली आणि ती थेट स्टेडियममध्ये गेली.
रोझाने जिंकलं गोल्ड मेडल
संध्याकाळी, रोझाने महिलांच्या F-32 क्लब थ्रोमध्ये भाग घेतला. तिचं शरीर खूपच कमकुवत होतं, परंतु तिच्यात खेळण्याची जिद्द होती. तिने 29.30 मीटर थ्रो केला, जे तिच्या स्वतःच्या जागतिक विक्रमापेक्षा थोडेसं कमी होतं, परंतु मेडल जिंकण्यासाठी पुरेसं होतं. तिच्या थ्रोने या चॅम्पियनशिपमध्ये एक नवीन रेकॉर्ड केला. या थ्रोमुळे तिने गोल्ड मेडल जिंकलं आहे.
भारतीय डॉक्टरांचे मानले आभार
"हे पदक भारतीय डॉक्टर आणि त्यांच्या टीमला समर्पित आहे. त्यांनी घेतलेली काळजी आणि पाठिंब्याशिवाय मी मैदानावर परत येऊ शकले नसते" असं म्हटलं आहे. रोझाला लहानपणी ब्लड डिसऑर्डर होता, ज्यासाठी तिने केमोथेरपी घेतली. नंतर लाइम आजारामुळे तिला अर्धांगवायू झाला. असं असूनही तिने हार मानण्यास नकार दिला आणि २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये मेडल जिंकले. रोझा जगातील सर्वोत्तम पॅरा-अॅथलीट्सपैकी एक आहे.