प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या १५ वर्षीय पंगी करुणा कुमारीने आपली जिद्द आणि मेहनतीने असं काही करून दाखवलं आहे ज्याची कोणी कल्पनाच करू शकत नाही. करुणा दृष्टीहीन आहे. परंतु तिचं क्रिकेटवर इतकं प्रेम आहे की ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या ट्रायल्समध्ये तिने ७० बॉलमध्ये ११४ रन्स केले आणि पहिल्या महिला दृष्टीहीन टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. ही टूर्नामेंट ११ ते २५ नोव्हेंबर दरम्यान दिल्ली आणि बंगळुरूमध्ये, जिथे भारताचा सामना ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, इंग्लंड आणि अमेरिका सारख्या संघांशी होणार आहे.
"मला बॉल नीट दिसत नाही, पण..."
पंगी करुणा कुमारी म्हणते की, "मला बॉल नीट दिसत नाही, पण मी माझ्या मेंदूचा वापर करून त्याच्या आवाजाच्या आधारे तो कुठे आहे हे समजून घेते." हीच तिची सर्वात मोठी ताकद आहे. करुणाचा जन्म आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात झाला.
क्रिकेटचा प्रवास सुरू
अभ्यासादरम्यान येणाऱ्या अडचणींमुळे तिला शाळा सोडावी लागली, परंतु नंतर तिला दृष्टिहीन मुलांसाठी असलेल्या शाळेत प्रवेश मिळाला. तिथूनच तिचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. करुणा केवळ तिच्या पालकांनाच नव्हे तर संपूर्ण देशाला सन्मान मिळवून देत आहे. तिच्यापासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे.