Join us

पाकिस्तानच्या पहिल्या महिला टॅक्सी ड्रायव्हर; गाडी चालवणाऱ्या गोड आजीचा Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:13 IST

Zahida Kazmi : पाकिस्तानच्या एका गोड आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या एका गोड आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जाहिदा काझमी असं या आजींचं नाव असून त्या पाकिस्तानच्या पहिल्या महिला टॅक्सी ड्रायव्हर आहेत. त्यांचा कंटेंट क्रिएटर मुलगा माजिद अली याने अबोटाबादच्या गजबजलेल्या रस्त्यांवर टोयोटा चालवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आणि अवघ्या काही मिनिटांत या व्हिडीओने इंटरनेटवर लोकांची मनं जिंकली आहेत. 

गाडी चालवतानाच्या या गोड आजींनी सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं आणि या व्हिडीओला जवळपास २० मिलियन व्ह्यूज मिळाले. ७५ वर्षीय जाहिदा काझमी यांच्यासाठी गाडी चालवणं हे काही नवीन नाही. त्यांनी फार आधीच गाडी चालवायला सुरुवात केली होती. पण तेव्हा ती त्यांची गरज होती. १३ व्या वर्षी लग्न झालेल्या काझमी १९७२ मध्ये अबोटाबादहून कराचीला राहायला गेल्या. 

वयाच्या २० व्या वर्षी त्या विधवा झाल्या आणि आपल्या मुलांसह एकटीने परिस्थितीचा सामना करावा लागला. १९८७ मध्ये सरकारी रोजगार योजनेमध्ये त्यांना हप्त्यांमध्ये पिवळी टॅक्सी खरेदी करण्याची परवानगी दिली तेव्हा काझमी यांनी परंपरा मोडली आणि पाकिस्तानच्या पहिल्या महिला टॅक्सी ड्रायव्हर बनल्या. २०२१ च्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, प्रत्येक व्यवसायात महिला होत्या पण टॅक्सी ड्रायव्हर नव्हत्या.

आजींचे पती स्वतः टॅक्सी ड्रायव्हर होते, त्यांनीच त्यांना गाडी चालवायला शिकवलं होतं. ज्यामुळे पुरुषप्रधान व्यवसायात पाऊल ठेवण्याच्या त्यांच्या धाडसाचा पाया रचला होता. द प्रिंटशी बोलताना, आजींचा मुलगा अली म्हणाला की, त्यांची आई आता व्यवसाय म्हणून टॅक्सी चालवत नाही, ती फक्त जेव्हा तिला हवं तेव्हाच थोडा वेळ टॅक्सी चालवते.

"आम्हाला तिचा अभिमान आहे आणि आम्हाला कधीही भीती वाटली नाही. ती उत्तम प्रकारे गाडी चालवते आणि लोकांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आहे असंही मुलाने सांगितलं. महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पुरुषप्रधान जगात त्यांना अनेकदा संरक्षणासाठी बुरखा घालून प्रवास करावा लागायचा.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीपाकिस्तान